आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीराज बाबांच्या ‘पूर्ती’ला वरुणराजाचा ‘ब्रेक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पंधरवड्यात मुख्यमंत्री चव्हाणांचा पश्चिम विदर्भ दौरा निश्चित होता. वचनपूर्ती जनजागरण यात्रेच्या प्रारंभासाठी ते अकोला व वाशीम जिल्ह्यातील कारंजात येणार होते. मात्र, पृथ्वीराज बाबांच्या वचन‘पूर्ती’ दौ-याला वरुणराजाने ‘ब्रेक’ लावला. मुख्यमंत्र्यांनी अकोल्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यापूर्वीच केंद्र व राज्याच्या योजनांची वचनपूर्ती झाल्याचे सांगण्यासाठी ते येणार होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर नामुष्की ओढवली असती. वरुणराजाने मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात आडकाठी करून त्यांनी ‘लाज’ राखल्याची चर्चा होती.


काँग्रेसने यापूर्वी अकोल्यात विभागीय वचनपूर्ती मेळावा घेतला. चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून अकोल्यात दोन वेळा आले आहेत. दोन्ही दौ-यात त्यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला होता. त्या आश्वासनांच्या पूर्तीची अकोलेकरांना आजही प्रतीक्षा आहे. सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांची भली मोठी यादी वाचून दाखवली. आपण आलो म्हणजे अकोल्याच्या सर्व समस्या दूर करूनच जाऊ, अशा आवेशात पृथ्वीराज चव्हाण यांनी एका महिन्यात सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आता त्याला सहा महिन्यांचा कालावधी लोटला एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची अकोल्यात येऊन आश्वासन देण्याची मोठी परंपरा आहे. मनपाच्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी स्वराज्य भवनात जाहीर सभा घेऊन काँग्रेसच्या हातात सत्ता दिली तर शहर दत्तक घेऊन कायापालट करण्याची भाषा बोलले होते. काँग्रेसच्या हातात सत्तेची सूत्रे दिल्यावर मात्र अधोगतीच झाली. त्यानंतर मनपा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेऊन पुन्हा स्व. विलासराव देशमुख यांचा कित्ता गिरवला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत शहर दत्तक घेण्याचा पुनरुच्चार केला. भारिप-बमसंच्या सहकार्याने पुन्हा सत्ता काबीज केली. मात्र, अकोल्याचे दुर्भाग्य काही बदलेले नाही. शहराच्या समस्यांमध्ये भर पडली असून सत्ताधा-यांच्या गटबाजीला उधाण आले. काँग्रेस व भारिप-बमसंच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे दत्तक घेण्याची भाषा बोलणा-या मुख्यमंत्र्यांनी अकोला शहर वाळीत टाकले की काय, असा प्रश्न निर्माण होतो. अकोला जिल्ह्यातही अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. मार्चमध्ये चव्हाण अकोल्यात येऊन गेले. भेटीदरम्यान सर्व प्रश्न एका महिन्यात मार्गी लावण्याचे अभिवचन दिले होते. त्या आश्वासनांची परिपूर्तता दूरच, साधा पाठपुरावाही नाही. मुख्यमंत्री असो की मंत्री, आश्वासनाची भूमिका चोखपणे बजावतात. मात्र, त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.