आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळिशीतील ‘चतुरंग’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'1974 मध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर स्थापन झालेल्या ‘चतुरंग’ या सांस्कृतिक संस्थेला नुकतीच चाळीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. चतुरंगने आपल्या स्थापनेपासून आजवर तब्बल 1346 उपक्रम राबवले आहेत. चतुरंग संस्थेच्या विविधांगी कार्याचा परिचय करून देणारा हा लेख.'

आपले मूळ गाव पोटापाण्यासाठी, करिअरसाठी सोडून मोठ्या शहरात आलेली माणसे एकदा त्या शहरात स्थिरावली की केवळ उन्हाळी सुट्या वा सणसमारंभ यापुरतीच गावी परतत असतात. आपण सोडलेलं गाव शहराच्या मानानं कुठवर पुढे आले आहे, त्याच्या गरजा काय आहेत हे शहरातली ही चाकरमानी मंडळी विचारातही घेत नाहीत. मात्र याला अपवाद मुंबई येथील ‘चतुरंग’ संस्थेचा. मुंबईची सांस्कृतिक जडणघडण करण्याबरोबरच या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आपण मुळात जेथून आलो तो कोकण परिसरही शिक्षणाच्या दृष्टीने विकसित करायचा विडा उचलला. 1974मध्ये स्थापन झालेल्या चतुरंग संस्थेला नुकतीच चाळीस वर्षे पूर्ण झाली.
कोकण म्हणजे निसर्गाचं वरदान लाभलेला महाराष्टÑाचा समृद्ध प्रदेश. पण नारळी-पोफळी-फणसाच्या बागांच्या आड या कोकणातील अनेक गावांमध्ये एक कटू वास्तव बघायला मिळते ते म्हणजे, तेथल्या मुलांपर्यंत न पोहोचलेल्या शाळा वा शाळा पोहोचल्या तरी मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची नसलेली इच्छाशक्ती आणि गरिबी. चाळीस वर्षांपूर्वी हे चित्र अधिक गडद होते. त्यामुळे नोकरीसाठी मुंबईत आलेल्या विद्याधर निमकर, विनायक काळे आदींनी केवळ आपल्यापुरती नोकरी न करता आपल्या गावांसाठीही काहीतरी करायचे ठरवले. त्या वेळी नोकरीमध्ये फार पगारही नसे. त्यामुळे गावाचा विकास करायचा या उद्देशाने एकत्र आलेल्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम करून त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून गावासाठी पैसा वापरायचा, असे ठरवले. तसेच विविध कंपन्यांशी बोलायचे ठरवले. शाळेमध्ये येणार्‍या मुलाला गरिबीमुळे अनशापोटी बसावे लागते, हे लक्षात आल्यानंतर त्याला दूध-चिक्कीचा पुरवठा करण्यापासून निर्धार निवासी वर्ग घेण्यापर्यंत चतुरंगने काम सुरू केले. त्यात नापास होणार्‍या मुलांचा वर्ग हा एक विशेष उपक्रम म्हणता येईल. नापास होणार्‍या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यापासून त्यांना उत्तीर्ण व्हायच्या क्षमतेपर्यंत आणण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते दरवर्षी झटत असतात. त्यामुळे त्यांच्या कोकणातील निवासी वर्गांना आजपर्यंत मिळणार्‍या प्रतिसादात नेहमीच सातत्य राहिले आहे. शिवाय गावातील शिकणार्‍या मुलांपर्यंत चांगली वृत्तपत्रे पोहोचविण्याचाही उपक्रम या संस्थेने राबवला. हे सगळे करताना संस्थेत मात्र कुठलेही ‘पदाधिकारी’ नाहीत. लहानांपासून थोरांपर्यंत विविध वयोगटातील कार्यकर्ते असलेल्या या संस्थेला कुठलाही अध्यक्ष नाही, ना कुणी सचिव, ना कुणी कार्यवाह. त्यामुळे दरवर्षी निवडणुका घेऊन पदे लाटण्याचा प्रकार या संस्थेत घडत नाही. संस्थेने कोकणात सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच मुंबई, गोवा, नागपूर अशा विविध ठिकाणी अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत. त्यात त्रिवेणी, शास्त्रीय गायन मैफल, एक कलाकार एक संध्याकाळ, कलाकारांसोबत वर्षा सहल अशा अनेक उत्तमोत्तम उपक्रमांची उदाहरणे देता येतील. विशेष म्हणजे या सगळ्या कार्यक्रमांचे आयुष्य संस्थेने निश्चित केले आहे. ठरावीक काळानंतर एखादा कार्यक्रम कंटाळवाणा वा कालबाह्य होऊ शकतो, याची जाणीव ठेवत तो बंद करून त्याऐवजी दुसरा उपक्रम सुरू करण्याची निर्मितीक्षमताही संस्थेने जपली आहे. त्यामुळे नव्या पिढीशीही या संस्थेला सहज जुळवून घेता आले आहे. संस्थेच्या या कार्याचे एकेकाळी कवी कुसुमाग्रजांनीही मनापासून कौतुक केले होते. आजही या संस्थेशी गेल्या अनेक वर्षांपासून विश्वास मेहंदळे, सुनील बर्वे, संजय मोने, सुकन्या मोने, मंगला खाडिलकर आदी दिग्गज ऋणानुबंध जोडून आहेत. सुनील बर्वे यांनी तर चतुरंगबाबत फार बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणतात, ‘माझी आई चतुरंगच्या त्रिवेणी या कार्यक्रमात सहभागी व्हायची. तिच्यामुळे मी माझ्याही नकळत या संस्थेशी जोडलो गेलो आहे. त्यामुळे या संस्थेच्या कुठल्याही उपक्रमात सहभागी होताना मला नेहमीच सर्जनशील असा आनंद मिळाला आहे.’ संजय मोनेदेखील सांगतात, ‘कार्यक्रमाचा जीव छोटा असेल तर उगाचच बडेजाव मिरवत त्या कार्यक्रमाला खर्चिक करण्याचा संस्थेचा स्वभाव नाही. त्यामुळे चतुरंगचे कार्यक्रम नेहमीच नीटनेटके होत आले आहेत.’ मान्यवरांनी दिलेल्या या कौतुकाच्या शब्दांचा ठेवा चतुरंग आजही जपून आहे. शिवाय विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्‍या दिग्गजांना जीवनगौरव पुरस्कार देऊन संस्थेने आजवर गौरवले आहे. त्यात लता मंगेशकरांसारख्या मान्यवरांचा समावेश आहे. कुठलेही अनुदान न घेता, कुठलीही वर्गणी कार्यकर्त्यांकडून न घेता ही संस्था गेली चाळीस वर्षे अव्याहतपणे काम करते आहे. त्यांच्या या चांगल्या कामास लोकही त्यामुळे सतत सकारात्मक प्रतिसाद देत आले आहेत. भविष्यात संस्था कोकणामध्ये तेथीलच शिक्षक व पालकांना प्रशिक्षित वा समुपदेशन करून त्यांची शिक्षणाविषयीची अनास्था दूर करण्याचे प्रयत्न करणार आहे, जेणेकरून पालक पाल्यास शाळेत जाण्यास प्रोत्साहन देतील व शिक्षकही डोळसपणे शिकवू शकतील. या संस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी कुठलाही फॉर्म भरावा लागत नाही, की कुठली फी भरावी लागत नाही, ना कुठल्या पदासाठी निवडणूक लढवावी लागत. तसा नियमच संस्थेमध्ये नाही. तरीदेखील केवळ संघटनाच्या जोरावर संस्थेने आपली अशी वाट तयार केली आहे, ज्या वाटेवर आज अनेक जण सक्षमरीत्या प्रवास करीत आहेत. तरुणांना हवेहवेसे वाटतील, असे उपक्रम सतत अपडेट करीत राहिल्यानेदेखील तरुणवर्ग या संस्थेत मोठ्या प्रमाणात सामील होतो आहे. त्यामुळे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा वसा तरुण कार्यकर्ते हौसेने व आत्मीयतेने चालवत आहेत, हेच या संस्थेच्या तारुण्याचे यश आहे. बदलत्या काळानुसार उपक्रमांमध्ये सजगता आणणं या वैशिष्ट्यामुळेच चतुरंगमध्ये आजही उल्हास भरून आहे. नवी पिढीदेखील चतुरंगमध्ये मनापासून सामील होते आहे, सामाजिक बांधिलकी जपते आहे. आजवर तब्बल 1346 उपक्रम या संस्थेने राबवले आहेत, ते याच वैशिष्ट्यांच्या जोरावर. त्यामुळे चतुरंग भविष्यातही सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीत चांगली भर घालत राहणार, याबाबत शंका नाही.

(priyanka.dahale@dainikbhaskargroup.com)

छायाचित्रात... चतुरंग संस्थेच्या वतीने आयोजित अभिमानमूर्ती या कार्यक्रमात माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन आपल्या सत्कारानंतर भाषण करताना.