आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Professor Avinash Kolhe Article About Dr.Babasaheb Ambedkar

अस्पृश्य, श्रमिक, कष्टकरी, कामगारांचे बाबासाहेब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२१ ऑगस्ट १९१७ रोजी बाबासाहेब इंग्लंडहून मुंबईला परतले. तेव्हा भारतात काँग्रेसचा बोलबाला होता. पण त्यांना काँग्रेससोबत काम करायचे नव्हते. व्यवसाय म्हणून मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमध्ये १० नोव्हेंबर १९१८ ते ११ मार्च १९२० पर्यंत बाबासाहेबांनी ज्ञानदानाचे काम केले. तूर्त अस्पृश्यांसाठीच काम करायचे ठरवल्याने त्यांनी २७ जानेवारी १९१९ रोजी साउथबरो समितीला निवेदन दिले होते. शिवाय शाहू महाराजांच्या मदतीने ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ काढले. एका अग्रलेखात ते म्हणतात ‘भारत स्वतंत्र होण्यानेच सर्व कार्यभाग साधेल असे नाही. भारत हे असे राष्ट्र बनले पाहिजे की ज्यात प्रत्येक नागरिकाला धार्मिक‚ आर्थिक व राजकीय हक्क मिळाले पाहिजे. व्यक्तिविकासाला प्रत्येक नागरिकाला वाव मिळाला पाहिजे’. ५ जुलै १९२० रोजी बाबासाहेब उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यावर सहा महिन्यांनी मूकनायक बंद पडले. तीन वर्षांनी ३ एप्रिल १९२३
रोजी पुन्हा मुंबईला परतले. त्यानंतर बाबासाहेबांनी स्वत:ला देशाच्या सार्वजनिक जीवनात झोकून दिले.
अस्पृश्यांसाठी बाबासाहेबांचे राजकारण
अस्पृश्याेद्धारासाठी राजकीय हक्क मिळावेत अन् हे हक्क इंग्रज सरकारकडून मिळतील असे त्यांना ठामपणे वाटत होते. या हेतूने त्यांनी नागपूरच्या कामठी भागात अस्पृश्यांची पहिली ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस काँग्रेस’ ही राजकीय परिषद ८ व ९ ऑगस्ट १९३० रोजी भरवली. बाबासाहेबांनी २५ पानी छापील भाषण इंग्रजीत केले. ‘संपूर्ण स्वराज्य’च्या काँग्रेसच्या मागणीला विरोध करत ‘वसाहतीच्या स्वराज्याची’ मागणी त्यांनी केली होती. समाजाच्या प्रगतीसाठी इंग्रजांचे राज्य आणखी काही काळ राहावे, असे त्यांना प्रामाणिकपणे वाटत होते. ब्रिटीश सरकारात मजूर
पक्षाचे ‘रॅमसे मॅकडोनाल्ड’ पंतप्रधान होते. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेत जी चर्चा केली होती तिच्या
आधारे ‘जातीय निवाडा’ घोषित केला. हा निवाडा १७ ऑगस्ट १९३२ रोजी जाहीर करण्यात आला.
यामुळे दोन फायदे झाले. एक म्हणजे कायदे मंडळावर निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. अस्पृश्यांना स्पृश्य मतदारांवर विसंबून राहण्याची आता गरज उरली नव्हती. दुसरे असे की, अस्पृश्यांना दोन मतांचा अधिकार मान्य केला होता. अस्पृश्य मतदार आपल्या दोन मतांपैकी एक अस्पृश्य उमेदवाराला तर दुसरे स्पृश्यांना देऊ शकत होते.
भारत सरकार कायदा १९३५ हा कायद्यामुळे भारतातील प्रांतांना स्वायत्तता दिली. प्रांतातील सत्तेसाठी निवडणुका होणार होत्या ज्या १९३७ साली झाल्याही होत्या. काँग्रेस, मुस्लिम लीगसह इतर प्रादेशिक पक्षसुद्धा होते. बाबासाहेबांना मात्र काँग्रेसला आव्हान द्यायचे होते, व निवडणुकाही लढायच्या होत्या. १५ ऑगस्ट १९३६ रोजी त्यांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ घोषित केला. तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर इंग्लंडमधील मजूर पक्ष होता. त्यांना गोलमेज परिषदेच्या निमित्ताने चारपाच वेळा इंग्लंडला जाण्याचा योग आला. तेव्हा त्यांनी मजूर पक्षाच्या अनेक नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. भारतीय समाजातील सामाजिक व धार्मिक विषमता नष्ट झाल्याशिवाय वर्ग जाणीव निर्माण होणार नाही असे त्यांचे मत होते.
जात‚ पंथ‚ समुदाय असा कोणताही भेद न पाळता स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासदत्व सर्वांसाठी खुले ठेवले होते. हा पक्ष मजूरवर्गाच्या कल्याणाला प्राधान्य देत होता. पक्षाच्या नावात ‘दलित’ किंवा ‘अस्पृश्य’ असे शब्द न वापरता ‘मजूर’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला होता. या पक्षाचा ध्वज लाल रंगाचा होता व मधोमध ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ असे लिहिले होते. डाव्या बाजुला वरच्या कोपऱ्यात अकरा तारे दाखवले होते. हे अकरा तारे देशातील अकरा प्रांतांचे प्रतिनिधित्व करत होते. स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात शिक्षण मोफत व सक्तीचे असावे‚ प्रौढ साक्षरतेसाठी प्रयत्न केले जावे व अस्पृश्य समाजातील मुलांना तांत्रिक शिक्षण द्यावे वगैरे मागण्या होत्या. १७ फेब्रवारी १९३७ रोजी झालेल्या मतदानासाठी बाबासाहेबांनी सतरा उमेदवार उभे केले होते. त्यापैकी पंधरा निवडून आल्यामुळे बाबासाहेबांचा पक्ष क्रमांक दोनचा पक्ष ठरला. काँग्रेसने मुंबई प्रांतात बहुमत मिळवले. १९ जुलै १९३७ रोजी काँग्रेस नेते बाळ गंगाधर खेर मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले. बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे त्या खालोखाल जास्त आमदार असल्यामुळे बाबासाहेब विरोधी पक्षनेते झाले. बाबासाहेब १९२६ पासून मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात काम करत होते. त्यांनी मुंबई प्रांतिक विधिमंडळात कोकणातील खोती पद्धत नष्ट करणे, सावकारीवर नियंत्रण आणणे आणि महार वतन नष्ट करणे आदी तीन महत्त्वाचे विधेयके मांडली होती. बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने फक्त कामगारांच्या हिताचे कायदे केले नव्हते तर शक्य तिथे कामगार संघटनाही बांधल्या. रेल्वेत नोकरी करणारे अस्पृश्य कामगारांना संघटित करण्याच्या हेतूने बाबासाहेबांनी १२ व १३ फेब्रवारी १९३८ रोजी मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगारांची भव्य परिषद आयोजित केली होती. परिषदेला सुमारे वीस हजार तत्कालीन अस्पृश्य कामगारांची उपस्थिती होती.