आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजवादी समाजरचनेचे अध्वर्यू महात्मा बसवेश्वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक महान क्रांतिकारक आणि सुधारक संत महात्मा बसवेश्वरांचे समग्र जीवनच क्रांतिकारी होते. मरगळलेल्या समाजजीवनाला नवे संजीवक सामर्थ्य देण्याचे एेतिहासिक कार्य महात्मा बसवेश्वरांनी पूर्णत्वाला नेले. धर्माच्या नावाखाली चाललेल्या कर्मठपणाला व बुवाबाजीला कडवा विरोध करीन, खरा धर्म काय आहे हे सांगण्याचे तसेच जातिभेद, अस्पृश्यता, उच्च-नीचभाव यासारख्या समाजघातक रूढींना मूठमाती देऊन समाजात समता प्रस्थापित करण्याचे, स्त्रियांना समाजात समानतेचे, प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देण्याचे, कायकवे कैलास (श्रम हाच कैलास) असा उपदेश करून समाजाला उद्योगशील बनवण्याचे, भक्तीचे व साहित्याचे दालन समृद्ध करण्याचे, समता-स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मूलभूत सूत्रावर आधारलेली अनुभव मंटप या नावाची आदर्श संस्था स्थापन करण्याचे मौलिक कार्य महात्मा बसवेश्वरांनी केले.

महात्मा बसवेश्वरांचे जन्मस्थान बागेवाडी (जि. बागलकोट, कर्नाटक) येथून जवळच असलेल्या कृष्णा आणि मलप्रभा नद्यांच्या संगमावरील कुंडल संगम, हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र समजले जाते. या क्षेत्रात संगमदेव मुनींचा आश्रम होता. महात्मा बसवेश्वरांच्या बालपणीच त्यांचे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने तेव्हा संगमदेव मुनींनी आपल्या आश्रमात बसवेश्वरांना आश्रय देऊन त्यांचे पालनपोषण केले. महात्मा बसवेश्वरांनीदेखील संगमदेव मुनींच्या आश्रमात १५ वर्षे वास्तव्य करून वेद, उपनिषदे, षड््दर्शन, इतिहास, पुराणे आदी हिंदू धर्मशास्त्रांचा तसेच बौद्ध व जैन धर्मग्रंथांचाही गाढा अभ्यास करून त्यात प्रावीण्य संपादन केले. संस्कृत आणि कन्नड या भाषेवरही प्रभुत्व सिद्ध केले. त्यांनी विविध धर्मपंथांच्या आचरणाचे, समाजव्यवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यानंतरच ते सर्वधर्म समभावाकडे आणि सामाजिक समतेकडे प्रभावित झाल्याचे दिसून येते.

बाराव्या शतकात जेव्हा स्पृश व अस्पृश्यतेच्या भावना अधिक तीव्र होत्या तेव्हा वेगवेगळ्या जातिधर्मातील लोकांना एके ठिकाणी आणून धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक चर्चा घडवून आणण्याचा अभिनव प्रयोग महात्मा बसवेश्वरांनी प्रत्यक्षात आणला. ज्ञानाची कवाडे सर्व जातिधर्मांतील लोकांसाठी खुली करण्याचा, उच्च- नीचतेच्या पारंपरिक कल्पनेला तडा देण्याचे कार्य त्यांनी केले. देव एकच असून त्याची नावे अनंत आहेत, असे त्यांचे मत होते. खऱ्या शिवभक्ताला जातपात स्पर्श करत नाही. कुंडल संगमदेवाचे वचन मानणारा अत्यंज असला तरी तो कुलवंतच होय, असे ते मानीत असत. अस्पृश्य कोण, त्याचे स्पष्टीकरण करताना हिंसा करणारा तो अस्पृश्य, माता-पित्यास हिणकस वागणूक देणारा अस्पृश्य होय, असे विश्लेषण महात्मा बसवेश्वरांनी केल्याचे दिसून येते. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात रुजवलेले विचार आजही पुन्हा विकसित करण्याचे आव्हान बसवेश्वरांच्या अनुयायांनी स्वीकारले पाहिजे. लौकिक अर्थाने महात्मा बसवेश्वरांचे अनुयायी न होता डोळसपणे त्यांच्या विचारांचा, कार्याचा वारसा जतन करण्याची खरी गरज आहे.

महात्मा बसवेश्वरांनी श्रम हाच स्वर्ग, असल्याची प्रचिती वेळोवेळी दिली आहे. महात्मा गांधीजींनी मांडलेला श्रमही है श्रीराम हमारा, हा विचार महात्मा बसवेश्वरांच्या विचारांशी साधर्म्य दाखवणारा आहे, हे आवर्जून लक्षात ठेवले पाहिजे. नीतिमूल्यांसह उद्योग सतत करत जीवन जगणे हाच खरा स्वर्ग होय, ही महात्मा बसवेश्वरांची भूमिका होती. उद्योग आणि श्रमाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने ईश्वराची उपासना होते, असे मत त्यांनी मांडले आहे. तेव्हा प्रत्येकाने उद्योग करूनच पोट भरावे, कोणीही भिक्षा मागू नये, उद्योगाचे व श्रमनिष्ठेचे महत्त्व कार्ल मार्क्सच्या अगोदर सुमारे ७५० वर्षांपूर्वी प्रतिपादन करणारा जगाच्या इतिहासातील पहिला सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्ता म्हणून महात्मा बसवेश्वरांचा उल्लेख करावा लागेल. महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटप नावाची आदर्श संस्था स्थापन केली. रंजल्यागांजल्या व पददलितांना समानतेच्या सूत्रात बांधणारे केंद्र म्हणजे अनुभव मंटप होय. स्त्रियांची गुलामगिरी नष्ट करून त्यांना पुरुषांच्या बरोबरीने समान स्थान मिळाले पाहिजे. म्हणजेच नऊशे वर्षांपूर्वी महात्मा बसवेश्वरांनी समाजवादी समाजरचनेचा पाया घातला होता, हे स्पष्टच दिसून येते.

आज समाजवादाचा, मानवतावादाचा सर्वत्र बोलबाला होतो. परंतु त्यास प्रत्यक्ष कृतीद्वारे साकार करण्याचे महान कार्य महात्मा बसवेश्वरांनी केले. त्यांनी मांडलेले अनुभव मंटपाचे तत्त्वज्ञान रूढीप्रिय नसून ते आधुनिक विचारसरणीशी जुळणारे तर्कशुद्ध समानता मानणारे तत्त्वज्ञान आहे. महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून धार्मिक, नैतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि वाङ््मयीन, सांस्कृतिक क्षेत्रात सप्तक्रांती घडवून आणली. समानतेसाठी आंतरजातीय विवाह लावले. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीशी जुळणारे विचार महात्मा बसवेश्वरांनी नऊशे वर्षांपूर्वी मांडले होते हे विशेष होय. यातच त्यांच्या द्रष्टेपणाचे आणि पुरोगामित्वाचे खरे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते. अनुभव मंटपाच्या साह्याने महात्मा बसवेश्वरांनी कर्मकांडाच्या मगरमिठीतून धर्माची मुक्तता करण्यासाठी तसेच त्याला व्यावहारिक व लोकशाही विश्वधर्माचे स्वरूप देण्यासाठी महान ऐतिहासिक कार्य केले.

महात्मा बसवेश्वरांनी नऊशे वर्षांपूर्वी धार्मिक, सामाजिक, आर्थिक जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली. लोकांना आपल्या कृतिशील जीवन पद्धतीतून त्यांनी सत्कर्माचा, सात्त्विकतेचा, मांगल्याचा, समतेचा, न्यायाचा अमृतकुंभ दिला. बसवेश्वरांचे डोळस अनुयायी त्यांच्या जीवनातील चैतन्याचा स्पर्श खऱ्या रूपाने कृतीमध्ये उतरवणे ही भूमिकाच जीवनात आणण्यात सार्थकता मानतील. भगवान बुद्ध आणि महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची समतेची दिंडी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समर्थपणे खांद्यावर घेतल्याचे दिसून येते.

प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे,
लातूर.
बातम्या आणखी आहेत...