आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर त्यांच्या विचारांचा मागोवा घेत समाजप्रबोधनाच्या चळवळीत ज्यांनी ख-या अर्थाने स्वत:ला तन-मन-धनाने झोकून दिले त्या समाजप्रबोधनाच्या चळवळीतील अग्रेसर नाव म्हणजे प्रा. विलासदादा वाघ. त्यांचा जन्म 1 मार्च 1939 रोजी झाला. त्यांनी यंदा 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे.
विलासदादांचा सात-आठ जणांचा ग्रुप होता. त्यात प्रा. तेज निवळीकर, डॉ. पंडित विद्यासागर, नाटककार संजय पवार, डॉ. प्रदीप गोखले आदींचा समावेश होता. या सगळ्यांनी समजून सवरून आंतरजातीय विवाह केले. विलासदादांचा हा ग्रुप म्हणजे आंबेडकरी ध्येयाने प्रेरित झालेला. समाजप्रबोधनाच्या चळवळीत भरभक्कम पाऊल रोवणारा ठरला. या तरुणांनी पुण्यात बालगंधर्वमध्ये 1983मध्ये एक प्रदर्शन भरवले. त्या द्वारे ‘जातिनिर्मूलनाचे’ एक समग्र प्रबोधन या मंडळींनी समाजासमोर ठेवले. त्यानंतर विलासदादांनी अनेक आंतरजातीय विवाह लावले. वेळप्रसंगी पोलिस स्टेशन आणि न्यायालयातही त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. अर्थात या समाजकार्यात विलासदादांना त्यांच्या सहचारिणी उषातार्इंची खंबीर साथ होतीच.
विलासदादा पुणे विद्यापीठात प्रौढ शिक्षण विभागात प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले, तर उषाताई एम. एस्सी. (मॅथेमॅटिक्स) झालेल्या. त्याही विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. पण एकाच दिवशी विचारपूर्वक निर्णय घेऊन सामाजिक कार्यासाठी दोघांनीही नोक-या सोडल्या. त्याचबरोबर विद्यापीठाचे क्वार्टरही सोडले आणि फर्ग्युसन कॉलेजसमोरच्या झोपडपट्टीत राहायला आले. 1978 पासून त्यांनी या झोपडपट्टीत काम करायला सुरुवात केली होती. वडार समाजातील मुलांसाठी बालवाडी चालवली. देवदासींच्या मुलांसाठी वसतिगृह चालवले. रेडलाइट एरियातील वेश्यांचे उंबरठे झिजवत विलासदादा आणि उषाताई तिथली मुलं गोळा करू लागले. त्यांना शाळेत नेऊ लागले. त्यांच्यातला माणूस जागा करू लागले. बापाच्या नावाची जागा कोरी ठेवणा-या मुलांचे विलासदादा आणि उषाताई आईवडील झाले. असंख्य जिवांचा ते आधारवड ठरले. अनेकांना अंधश्रद्धेतून, धर्माच्या नावाखाली चालणा-या वाईट चालीरीतीतून त्यांनी वर आणलं. त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवलं.
नूरी नावाच्या मुलीला बालपणापासून विलासदादांनी लाडाकोडात वाढवले. तिचे शिक्षण केले. आज ती दोन मुलांची आई आहे. सुखाने संसार करत आहे. पुण्यात वेश्यांच्या मुलांसाठी सर्वेषा सेवा संस्थेची स्थापन केली. दोन आश्रमशाळा, चार वसतिगृहे व एक समाजकार्य महाविद्यालय अशा सात संस्थांचा डोलारा या दोघांनी महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा वसा घेऊन उभारलेला आहे. पुणे जिल्ह्यातील ‘भुकूम’ या गावी दलित कुटुंबांना घेऊन सामुदायिक शेतीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला.
सदाशिव पेठेत आणि तेही पुण्यात आंबेडकरी विचारांचे प्रकाशन उभे करणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. खूप त्रासातून विलास वाघ यांना मार्ग चोखाळावा लागला. आज सुगावा प्रकाशनाचा दीपस्तंभ मोठ्या दिमाखात पुण्यात उभा आहे. आज सुगावा प्रकाशनाचे नाव राष्ट्रीय स्तरावर गेले आहे. सुगावाचे पहिले पुस्तक ‘माझा अण्णाभाऊ साठे’, तर दुसरे पुस्तक रावसाहेब कसबे यांचे ‘आंबेडकर आणि मार्क्स’ हे होते. त्यानंतर अनेक दलित लेखकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केले. माझेही अनुवादित पुस्तक ‘तथागत गौतम बुद्ध आणि त्यांचे आदर्श भिक्षु’ त्यांनी प्रसिद्ध केले आहे. विलासदादांनी रंजनवादी असलेल्या कथा-कादंब-या प्रकाशित केल्या नाहीत. सुगावा प्रकाशनाच्या एका पुस्तकाचे नाव प्रकर्षाने घ्यावेसे वाटते, ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जलनियोजनाविषयी जे विचार मांडले त्यावर डॉ. सुखदेव थोरात यांनी लिहिलेले पुस्तक. देशाच्या जलनियोजन विकासात बाबासाहेबांचे खूप मोठे योगदान आहे. सुगावाने गं. बा. सरदारांचे ‘गांधी आणि आंबेडकर’ हेही पुस्तक प्रकाशित केले. कॉम्रेड शरद पाटील यांचे मार्क्सवाद आणि फुले-आंबेडकरवाद, दासशुद्रांची गुलामगिरी, अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र इ. ग्रंथ प्रकाशित केले. सुगावाने दलित साहित्य, स्त्रियांच्या विमोचनाचे साहित्य, आंबेडकरी साहित्य, बौद्ध साहित्य प्रकाशित करून प्रबोधनाची चळवळ सर्वव्यापी केली. म्हणूनच त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे, तर सुगावा मासिकाला इंटरनॅशनल मिशन कॅनडा-2003चा पुरस्कार मिळालेला आहे. अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले. प्रा. विलासदादा वाघ 2006 या वर्षी पुणे बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख होते. विलासदादा म्हणतात, ‘मी सेवादलात वाढलो, समाजवाद्यांत वावरलो, हे सारे खरे आहे; पण मूलत: मी आंबेडकरवादी आहे.’ आंबेडकर विचारांचे पाईक असलेल्या विलासदादांचे कार्य प्रबोधनाच्या चळवळीतील मैलाचा दगड ठरले आहे. विलासदादांच्या पंचाहत्तरीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.