आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवर्तकांचे समभाग तारण ठेवणे आणि त्यातील संभाव्य धोके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी जितके समभाग इश्यू केलेले असतात (म्हणजे त्यांचे इश्यूड कॅपिटल) त्याचा मोठा हिस्सा कंपनीच्या प्रवर्तकांकडे असतो. व्यवसायाच्या सुरुवातीला एकूण भांडवलापैकी त्यात प्रवर्तकांकडून सर्वात जास्त गुंतवणूक झालेली असते त्यामुळे ते साहजिकही असते. समभागधारकांना मताधिकार असतो बहुमताने निर्णय घेतले जातात. त्यामुळे कंपनीच्या एकूण समभागांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त समभाग प्रवर्तकांकडे असणे हे कंपनीवर आपले वर्चस्व राखण्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक असते. तथापि टाटा समूहाच्या काही कंपन्यांमध्ये खुद्द टाटांचा हिस्सा कमी आणि वित्तीय संस्थांचा जास्त असेही चित्र दिसेल. पण टाटा हे फार प्रतिष्ठित नाव असल्याने इतर कोणी त्यांच्या कंपनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तर वित्तीय संस्था टाटांच्या बाजूने उभ्या राहतात. त्यामुळे त्यांना धोका नसतो.


प्रवर्तकांकडे त्यांच्या कंपनीचे हे जे समभाग असतात ते प्रवर्तक तारण ठेवून त्या आधारे कर्ज घेऊ शकतात. स्वत:च्या वैयक्तिक गरजांकरिता कर्ज घेण्यासाठी प्रवर्तक समभाग तारण ठेवू शकतात. कंपनीला व्यवसाय विस्तारासाठी कर्ज हवे असते म्हणूनच ते बहुधा तारण ठेवले जातात. सहसा वित्तसंस्था कंपन्यांना कर्ज देताना ते कंपनीच्या मालमत्तेच्या तारणावर देतात. पण जर वित्तसंस्थांना कंपनीच्या कर्जाच्या परतफेड क्षमतेबाबत शंका वाटत असेल तर ते प्रवर्तकांची वैयक्तिक हमी घेतात तसेच त्यांना समभाग तारण ठेवण्यासाठी सांगतात. भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या ‘टेकओव्हर’बाबतच्या नियमानुसार जेव्हा प्रवर्तकांनी तारण ठेवलेल्या समभागांची संख्या 25,000 पेक्षा अधिक किंवा कंपनीच्या समभागधारणेपेक्षा एक टक्क्याने अधिक होते तेव्हा त्याची माहिती शेअर बाजाराला सात दिवसांच्या आत देणे कंपनीला बंधनकारक असते. जर ही माहिती दिली नाही तर सेबी कारवाई करू शकते. बहुधा सेबी काही दंड लावते.


प्रवर्तक स्वत:चे समभाग तारण ठेवून कंपनीच्या व्यवसाय विस्तारासाठी कर्ज घेतो ही खरे तर चांगली गोष्ट आहे. पण यात काही जोखमीच्या बाबी आहेत म्हणून किरकोळ गुंतवणूकदारांनी त्याबाबत माहिती घेणे व सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एका उदाहरणाच्या साहाय्याने हे बघूया. प्रवर्तकाने तारण ठेवलेल्या समभागांचे बाजारभावाने जे एकूण मूल्य आहे त्याच्या काही टक्के रक्कम वित्तसंस्था कर्ज म्हणून देते. समजा हे मूल्य 100 कोटी रुपये आहे व बँकेने त्याआधारे 80 कोटी रुपये कर्ज दिले आहे. पण काही कारणाने समभागाच्या किमतीत मोठी घसरण झाली व तारण ठेवलेल्या समभागाचे मूल्य केवळ 50 कोटी रुपये झाले तर कर्ज देणारी बँक प्रवर्तकाला आणखी समभाग तारण ठेवण्यास सांगेल किंवा कर्जाची परतफेड करा, असे सांगेल. प्रवर्तक हे दोन्ही करू शकला नाही तर तारण ठेवलेले समभाग बॅँक शेअर बाजारात विकू शकते. एकदम इतके समभाग विक्रीस आल्यामुळे त्यांचा भाव आणखी घसरतो व गुंतवणूकदारांना त्याचा फटका बसतो. शिवाय कंपनीचा ताबा प्रवर्तकाच्या हातातून निसटेल हाही धोका असतो.


आता जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चरबाबतचे वास्तवातले उदाहरण बघू. कंपनीच्या एकूण समभागांपैकी त्याचा 70.30 टक्के हिस्सा प्रवर्तकांकडे आहे. त्यांच्याकडे असलेल्या समभागांपैकी सुमारे 45 टक्के समभाग त्यांनी तारण ठेवलेले आहेत. या समभागांच्या किमतीत तीन महिन्यांत सुमारे 33 टक्के घसरण झाल्यामुळे त्यांना आॅगस्ट 2013 मध्ये आणखी 11.90 कोटी समभाग तारण ठेवावे लागले. आणखी समभाग तारण ठेवण्याऐवजी दुसरा मार्ग म्हणजे सहसा कंपन्या आपली काही मालमत्ता विकून हे कर्ज चुकवण्याचा प्रयत्न करतात. सुझलॉन, जेपी इन्फ्रा, इरा इन्फ्रा, हॉटेल लीलाव्हेंचर अशा काही कंपन्यांच्या प्रवर्तकांनी कर्जासाठी तारण ठेवलेल्या समभागांचे प्रमाण खूप जास्त आहे. यापैकी हॉटेल लीलाव्हेंचरबाबत एकूण समभागांपैकी त्यात प्रवर्तकांचा हिस्सा 59.77 टक्के आहे. या स्वत:च्या हिश्श्यापैकी 96.39 टक्के समभाग त्यांनी तारण ठेवलेले आहेत. कंपनीवर 4700 कोटींचे कर्ज आहे. हॉटेल चालवणे हा कंपनीचा मुख्य व्यवसाय. या व्यवसायाशी संबंध नसलेली म्हणजे नॉन-कोअर बिझनेससंबंधी आपली काही मालमत्ता विकून कंपनी काही कर्ज चुकते करत आहे. चेन्नई येथील आयटी पार्क त्यांनी विकलेला आहे. हैदराबाद येथील जमीन विकणार आहेत. तसेच त्यांना कर्ज देणा-या वित्तसंस्थांबरोबर त्यांनी कंपनी कर्ज पुनर्बांधणीची योजना आखली आहे. त्याची एक अट म्हणूनही त्यांना त्यांचे समभाग तारण ठेवावे लागलेले आहेत.


प्रवर्तकांनी शेअर्स तारण ठेवणे हे जोखमीचे आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचेही नुकसान होऊ शकते. डिमॅट खात्यात विकत घेतलेले कंपन्यांचे समभाग असतात. बॅँका त्याआधारे कर्ज द्यायला तयार असतात. त्याला लोन अगेन्स्ट शेअर्स म्हटले जाते. पण आपल्यासाठीही हाच धोका आहे. जर आपण तारण ठेवलेल्या समभागाचे मूल्य ठरावीक पातळीपेक्षा खाली गेले तर आपल्याला कर्ज चुकते करावे लागेल. आणखी काही तारण ठेवावे लागेल. दोन्ही करू शकलो नाही तर बॅँक आपले समभाग विकू शकते.