आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेवटपर्यंत झुंजण्याची चिकाटी हेच याेगदान!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात सिंधूला रौप्य मिळाले तरी त्या रौप्याला सुवर्णाची किनार आहे. सिंधूच्या हाती रौप्य आले, पण तिने सोन्यासारखी झुंज दिली. सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिनाच्या खेळाचे कौतुक करायचे की सिंधूच्या झुंजीचे, असा प्रश्न या सामन्याचे समालोचन करणाऱ्या जाणकारांना पडला. सामन्याचे विश्लेषण करताना प्रत्येकाच्या तोंडी सिंधूचे नाव होते. सिंधूपेक्षा कॅरोलिना सर्वार्थाने श्रेष्ठ होती यात शंका नाही. तथापि, दहाव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने या पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूला प्रत्येक गुणासाठी झुंजायला लावले. कॅरोलिनावर किती ताण आला होता हे सामन्यानंतरच्या तिच्या प्रतिक्रियेवरून लक्षात येते. अत्यंत थंड डोक्याने खेळणारी कॅरोलिना सामना संपल्यावर स्वत:ला आवरू शकली नाही. तिच्या भावनांचा बांध फुटला. वरून थंड दिसणाऱ्या कॅरोलिनाच्या अंतरंगात केवढी भावनिक ऊर्जा साठवलेली होती ते त्यावरून दिसून आले. या ऊर्जेनेच तिला सुवर्ण मिळवून दिले. सिंधूकडेही अफाट ऊर्जा आहे. तिच्यातील ऊर्जा, किलिंग स्पिरिट, उघडपणे व्यक्त होत होते. हे ‘किलिंग स्पिरिट’ तिने शेवटपर्यंत राखले हे महत्त्वाचे.

भारतासाठी तर हे अधिक महत्त्वाचे आहे. अनेक खेळांमध्ये असे दिसते की विपरीत घडू लागले की भारतीय खेळाडू सामना सोडून देतात. हाय खातात. लढण्याची ईर्षा गमावतात. सिंधूने हे अजिबात होऊ दिले नाही. ती शेवटपर्यंत ताकदीने खेळत राहिली. कॅरोलिना सर्वच बाबतीत सरस होती. यामुळे सिंधूचा नाइलाज झाला. पहिला सेट सिंधूने घेतल्यावरही कॅरोलिना विचलीत झाली नाही. दुसऱ्या सेटमध्ये पहिल्याच चार सर्व्हिसेसमध्ये तिने सिंधूला आपले पाणी दाखवून दिले. त्यानंतर सिंधूने अथक झुंज दिली असली तरी कॅरोलिनाने सामन्यावरील पकड ढिली होऊ दिली नाही. कॅरोलिनाकडे अजोड कौशल्य आहे. तिच्या खेळाला नजाकत आहे. खरे बॅडमिंटन म्हणजे काय हे समजण्यासाठी कॅरोलिनाचा खेळ पाहावा. सिंधूही तिला दाद देत होती आणि ती सिंधूला. दोघीही एकमेकांच्या खेळाचा आदर करीत होत्या. सामर्थ्यवान प्रतिस्पर्ध्यावर मात केल्याचे समाधान कॅरोलिनाच्या चेहऱ्यावर होते. तिला सुवर्ण सहज मिळाले नाही आणि हाच सिंधूचा विजय आहे. इथे आठवण होते ती विम्बल्डनमध्ये झालेल्या स्टेफी ग्राफ व मार्टिना नवरातिलोव्हा यांच्यातील सामन्याची. स्टेफी प्रथमच अंतिम सामना खेळत होती. मार्टिनासमोर तिने अक्षरश: शरणागती पत्करली. सरळ दोन सेटमध्ये सामना काही मिनिटांत संपला. सिंधूने तसे होऊ दिले नाही. ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्याचे दडपण साधेसुधे नसते. पण सिंधू अजिबात विचलीत झालेली दिसली नाही. दुसऱ्या सेटमध्ये बरीच मागे पडल्यावर काही काळ तिच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसले, पण लगेच तिने स्वत:ला सावरले आणि त्वेषाने खेळू लागली. हा त्वेष, शेवटपर्यंत झुंजत राहण्याची चिकाटी हे सिंधूचे भारतासाठी योगदान आहे.

आपण हरलो असलो तरी आपला खेळ सरस झाल्याची जाणीव सिंधूला नक्की झाली. त्वेषाने भारलेला तिचा आक्रमक चेहरा आपण गेले काही दिवस पाहत आहोत, पण आज रौप्यपदक घेताना त्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित पसरले होते. सिंधूच्या चेहऱ्याला गोडवा आला होता, कारण सुवर्ण हुकले असले तरी ती मनापासून खेळली होती.
बातम्या आणखी आहेत...