आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र काँग्रेसची गुजरातेत कसाेटी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणूक पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची, तर काँग्रेसच्या भवितव्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना मदतीस घेतले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांचा त्यात समावेश आहे. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी निवडणूक ठरू शकते ही. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर काम दाखवण्याची ही संधी म्हणावी लागेल. मोदी पंतप्रधान झाल्यानंतरची गुजरातेतील ही पहिलीच निवडणूक आहे. मोदी, शहांच्या दृष्टीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरदेखील चर्चा रंगत आहे. 


गुजरातमध्ये १९९५ पासून आजपर्यंत भाजप सत्तेत आहे. अपवाद फक्त १९९६ ह्या एक वर्षाचा. तेव्हा शंकरसिंग वाघेला काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले होते. केशुभाई पटेल यांच्यानंतर २००२ मध्ये मोदी मुख्यमंत्री झाले. २००२ पासून क्रमाक्रमाने अधिक जागा मिळवत मोदी २००७, २०१२ पासून पंतप्रधान होईपर्यंत मोदी मुख्यमंत्री होते. २००२ मध्ये ११६, २००७ मध्ये ११७ व २०१२ मध्ये १२८ जागा मिळवून मोदींनी गुजरात भक्कमपणे उभा केला. ‘विकास पुरुषा’ ची कल्पना निर्माण केली. त्यांचा पंतप्रधानपदाचा पाया गुजरातच होता आणि पुढेही त्यांना हवा आहे. आता त्यांना एकूण १८२ पैकी १५० जागा जिंकावयाच्या आहेत. अमित शहांनी तसे जाहीरही केले आहे. 


काँग्रेसला संधी आहे आणि नाहीसुद्धा. भाजपशी सामना कशा पद्धतीने करते यावर हे यश अवलंबून आहे. अहमद पटेल यांच्या राज्यसभेतील चुरशीच्या यशामुळे काँग्रेसने आपला सुस्तपणा सोडल्याचे दिसते. त्या दृष्टीने कदाचित काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्राच्या नेत्यांकडे जबाबदारी साेपवली.  खा. राजीव सातव, वर्षा गायकवाड (माजी मंत्री), आ. हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) हे गेल्या दोन महिन्यांपासून गुजरातमध्ये विभागवार दौरा करत आहेत.  छाननी समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली. पक्षातील उमेदवारांची निवड ही ‘छाननी समिती’ करते. त्या दृष्टीने ती महत्त्वाची ठरते. एक प्रकारे पक्षाचे यश ठरवण्याचे काम आहे हे थोरात यांच्याकडेच हाेते. १९८५ पासून सलग सातव्यांना आमदार म्हणून ते निवडून आले. सतत ४० वर्षे असा लौकिक सांभाळणे सोपे नाही. 

 
महाराष्ट्रातील नेत्यांच्या जोडीला सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आहेत. भाजप- काँग्रेसबरोबरच अमित शहा - अहमद पटेल यांच्या राजकीय स्पर्धेची किनार या निवडणुकीला आहे. दोघेही गुजरातचेच. कदाचित दोघांचाही मुख्यमंत्री होण्याचा विचार असू शकतो. २०१४ ची निवडणूक व नंतरच्या जवळ जवळ सर्व (दिल्ली - ‘ आप ’, बिहार - ‘ महागठबंधन ’ यांचा अपवाद सोडून) निवडणुका ‘भाजप’ने जिंकल्या आहेत. त्यामुळे अमित शहा आता ‘मास्टर स्ट्रेटिजिस्ट’ मानले जातात. अहमद पटेल पण सलग १९७७ पासून खासदार आहेत. १९७७ च्या आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत काँग्रेसला लोकसभेच्या १० जागा मिळाल्या, त्यात २६ वर्षांचे अहमद पटेल हे एक होते. मोदी-शहांपेक्षा जास्त राजकारण पटेलांनी पाहिले आहे. आता तर दोघांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अाज वातावरण पंतप्रधान मोदी यांचे आहे. मात्र, लोकशाहीत वातावरण बदलू शकते. गुजरातमध्ये भाजप २२ वर्षे सत्तेत आहे, पण ‘अँटी-इन्कम्बसी’चा फटका भाजपला बसू शकतो. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, ढिसाळ राज्यकारभार, पाटीदारांची आरक्षणाबाबतची नाराजी, दलितांवरील अत्याचार, अल्पसंख्याकांच्या बाबतीतील उघड दुजाभाव, भाजप नेते संजय जोशी यांची नाराजी या सर्व बाबी मोदींना प्रतिकूल ठरू शकतात. 


काँग्रेसजनांना अजून एक खबरदारी घ्यावी लागेल. ‘पोस्टट्रूथ’ कलेतील मोदींचे प्रावीण्य, ‘पोस्टट्रूथ’  म्हणजे खोटाच प्रचार, पण बेमालूपणे सत्य वाटला पाहिजे. कोणताही विषय असो. स्वातंत्र्यलढा, राज्यघटना, देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, नोटाबंदी, आर्थिक सुधारणा मुद्द्यांना काँग्रेसला तोंड द्यावयाचे आहे. ‘स्मार्ट धूळफेकी’ला गुजरातेतील जनता कशी तोंड देते त्याची ही सुरुवात आहे. 
कदाचित एखाद्या साध्या धक्क्याने साम्राज्य पतनाची सुरुवात होऊ शकते. १९८०  ला माधवसिंग सोळंकींनी १८२ पैकी १४८ जागा जिंकून काँग्रेसच्या यशाची (१९७७ च्या पराभवानंतर) सुरुवात केली होती. त्यांचे चिरंजीव भरतसिंग सोळंकी आता गुजरातचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पंतप्रधान मोदी व अमित शहा अविश्रांत परिश्रम घेताना दिसतात. त्यातूनच कदाचित अमित शहांनी ‘५० वर्षे राज्य करेल भाजप’ असे म्हटले आहे. असेच कष्ट राहुल गांधींना, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना घ्यावे लागतील. महाराष्ट्र व गुजरातचे जुने राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक संबंध आहेत. भौगोलिक सलगता, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यामुळे लाखो मराठी बांधव गुजरातमध्ये आहेत. त्यांच्या मतदानाचा परिणाम या निवडणुकीवर हाेऊ शकतो. विशेषत: गुजरातेतील कुरुक्षेत्रावर गेलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची कसाेटी पाहणारी ही निवडणूक अाहे. 


-प्रा. दुसाने  
dusane.nath@gmail.com

बातम्या आणखी आहेत...