आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाश्वत विकासासाठी डाॅ.आंबेडकरांचा सम्यक विचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बौद्ध धम्माचा गाभा भोगविलासाचा अव्हेर म्हणजेच तृष्णाक्षय करणे हा आहे. हवामान बदलाचे वास्तव लक्षात घेता २१ व्या शतकात शाश्वत विकास प्रणालीला अनन्यसाधारण स्थान आहे. प्रज्ञा, करुणा व शील या त्रयीद्वारे माणूस भोगवादाच्या गर्तेतून मुक्त होऊ शकतो. 

 

आ ज जगासमोरील अव्वल समस्या आहे ती हवामान, जलवायू परिवर्तनाची! ४६० कोटी आयुर्मानाच्या पृथ्वीला आजवर अनेक स्थित्यंतरातून जावे लागले. शोध, अविष्कार, प्रयोग, कल्पकता, उद्याेग जगताचा मिलाफ घडवून, प्रतिसृष्टी निर्माण(?) करण्याचा कैफ चढवून निसर्गाच्या गुंतागुंतीची परस्परावलंबी रचना, नि जीवन समुच्चयात अविवेकी, अनाठायी हस्तक्षेप करून भयानक संकट ओढवून घेतले. हवामान बदलाचा मानव व पृथ्वीच्या सुरक्षेवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांचा प्रश्न सर्वोच्च आहे. तेवढाच कळीचा प्रश्न सामाजिक आर्थिक विषमता व विसंवादाचा .   


२०१७ साली जगावर वंश, धर्म, जात, परकीय द्वेष यांसारख्या संकुचित विभाजनवादी नि आक्रमक राष्ट्रवादाचे सावट पसरले आहे. जात-वंश-वर्ण-वर्ग-पुरुषसत्ताक व्यवस्था हे तर जगभर विषमतेचे मुख्य कारण आहेच. भरीसभर म्हणजे सरंजामी, भांडवली, राजकीय अर्थकारणाने श्रमजीवी जनसमुदायाला आपल्या कह्याकब्जात ठेवण्यासाठी सर्रास बळाचा वापर केला, आजही करत आहेत. दुसऱ्या महायुद्धातील हिंसा नि वंश संहाराच्या परिणामी मानव समाजाच्या वाटचालीबाबत काही मुलगामी प्रश्न विचारले जातात. औद्योगिक क्रांतीनंतर सरंजामी भांडवली सत्ताधीशाचे, महाजन अभिजन वर्गाचे चैन-चोचले पुरे करण्यासाठी नाना तऱ्हेच्या वस्तू व सेवांचे उत्पादन वाढवले गेले. अर्थात त्यांच्या दिमतीला असलेल्या संघटित कामगार, नोकरशाही, सैन्यदल, पोलिस  आणि मध्यम वर्गाला वस्तू व सेवांच्या विपुलतेचा लाभ मिळाला. 


गेल्या ५०-६० वर्षांत भांडवलाला, विशेषतः वित्तीय भांडवलाला जगभर मुक्त संचाराची मुभा मिळाली. २००८ च्या आर्थिक घसरणीनंतर वित्तीय भांडवलशाहीचा डोलारा टिकणार नाही, त्याच्या अंगभूत मर्यादा आहेत, हे सामान्य लोकांना जाणवू लागले. उत्तरोत्तर प्रचलित विकासाचे विनाशकारी स्वरूप दररोज उघड होत आहे. आधुनिक औद्योगिक अर्थरचना, जीवनशैली व उत्पादन पद्धती ही निसर्ग आणि मानवासाठी हानिकारक असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले. तापमानवाढीमुळे होणारा हवामान बदल हा मानवासमाेरील माेठा  प्रश्न असल्याचे कुणी नाकारणार नाही. पॅरिस परिषदेत भारतासह सर्वच राष्ट्रांनी अाणाभाका घेतल्या खऱ्या मात्र प्रश्न त्याबरहुकूम कृती होण्याचा आहे! महत्प्रयास व मिन्नतवारीने संमत झालेला ठराव/करार अमेरिकेचे (नंतर) निवड झालेले राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी धुडकावून लावला! गांधीप्रणीत स्वदेशी व स्वावलंबनाचा मार्ग व गरजा सीमित करून निसर्गाशी तादात्म्य राखत जगण्याची जीवनशैली खेरीज जगाला तरणोपाय नाही. हीच बाब महात्मा फुले ‘स्त्री-पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, अवघे जगावे समाधानाने‘ या वचनात अधोरेखित करतात. 


हवामान बदलाचा गांभीर्याने विचार करून तापमान वाढ रोखल्याखेरीज मानवाचे भरणपोषण नि आरोग्यच नव्हे तर पृथ्वीची सुरक्षितता सुतराम शक्य नाही. यासाठी मानवाला जीवनशैलीत, सत्वर आमूलाग्र बदल करावा लागेल.विशेष करून जीवाष्म इंधनाचा वापर सत्वर कमी करणे अपरिहार्य आहे. तात्पर्य, कोळसा, तेल, वायू या इंधनाचा वापर जाणीवपूर्वक कमी केला पाहिजे. मानव व पशूंची प्राणी उर्जा व सर्वत्र उपलब्ध असलेली पवन व सौरऊर्जा हाच तापमान वाढीपासून वाचवणारा अक्षय ऊर्जा स्त्रोत आहे. या गर्तेतून बाहेर पडण्याचा प्रभावी मार्ग काय? अर्थात, लोक चळवळ, जन अांदोलन त्यासाठी व्यापक जनसंबोधन, जाणीव-जागृती अभियान गरजेचे आहे. सर्वप्रथम विकास म्हणजे काय, कुणाचा व कशाचा विकास ही बाब नीट समजावून घेणे, त्याचे नेमके आकलन होणे अत्यावश्यकच आहे. विकासाची मुख्य कसोटी समता व सातत्य असावी. प्रामुख्याने विकास निसर्गस्नेही, गरिबाभिमुख, स्त्रीकेंद्री असायला हवा. येथे हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे की, भारतीय संविधानाचे अधिष्ठान समता आहे. मात्र, आपल्या देशात दररोज विषमता वाढत आहे.  


भारताच्या व महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करता म. फुले यांना अभिप्रेत असलेली जैवशेती उत्पादन पद्धती, सर्वांना सामावणारी गुणवत्तापूर्ण सार्वजनिक शिक्षण व्यवस्था, शूद्र-अतिशूद्रांचे शोषण थांबवणारी अर्थव्यवस्था, श्रमप्रतिष्ठा देणारी समाजरचना ही आजच्या काळाची गरज आहे. नेमकी हीच बाब गांधींनी पुरस्कृत केली. त्यांनी सांगितले की, ‘स्वेच्छिक गरिबी, साधेपणा व स्वावलंबन हाच अर्थरचनेचा पाया असावा. डाॅ. बाबासाहेबांनी दलितांच्या उत्थानासाठी शिक्षणाला गुरुकिल्ली मानले. अर्थात ‘शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा’ हा त्यांचा मूलमंत्र आपण विसरलो. खरं तर डाॅ. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारून ऐहिक व आध्यात्मिक जीवन सुधारणेसाठी मध्यम मार्ग निवडला. बौद्ध धम्माचा गाभा भोगविलासाचा अव्हेर म्हणजेच तृष्णाक्षय करणे आहे. हवामान बदलाचे वास्तव लक्षात घेता २१ व्या शतकात शाश्वत विकास प्रणालीला अनन्यसाधारण स्थान आहे. प्रज्ञा, करुणा व शील या त्रयीद्वारे माणूस भोगवादाच्या गर्तेतून मुक्त होऊ शकतो. शाश्वत विकास हा आज परवलीचा शब्द असून जागतिक तापमानवाढीच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी बुद्धप्रणीत मध्यम (विकास)मार्ग ही आजची गरज आहे. सारांश, फुले, गांधी व आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी आपापले संकुचित स्वार्थ व हितसंबंध बाजूला ठेवून महामानवांच्या शिकवणुकीचे सार लक्षात घेऊन समतामूलक चिरस्थायी विकासासाठी प्रयत्न करणे, हेच त्यांना खरे अभिवादन. 
 

- प्रा. एच. एम. देसरडा (लेखक नामवंत अर्थतज्ज्ञ, राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य आहेत.)

बातम्या आणखी आहेत...