Home | Divya Marathi Special | rafael nadal win the french open title

'द किंग ऑफ क्ले' नदाल !

सचिन निकम | Update - Jun 06, 2011, 08:47 PM IST

'द किंग ऑफ क्ले' अशी ओळख असलेला स्पेनचा दिग्गज टेनिसपटू आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या रॅफेल नदालने सहाव्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवीत बियाँ बोर्ग यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

  • rafael nadal win the french open title

    nadal_258_02'द किंग ऑफ क्ले' अशी ओळख असलेला स्पेनचा दिग्गज टेनिसपटू आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या रॅफेल नदालने सहाव्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवीत बियाँ बोर्ग यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

    टेनिस जगतात मानाचे समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंम्बल्डन आणि यूएस ओपन या चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा मान नदालने गेल्यावर्षी यूएस ओपन जिंकून मिळविला. चारही ग्रँडस्लॅम जिंकणारा नदाल हा सातवा खेळाडू ठरला आहे. तसेच ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक आणि चार ग्रँड स्लॅम जिंकणारा तो आंद्रे आगासीनंतर दुसरा खेळाडू आहे.

    स्वित्झर्लंडचा मातब्बर खेळाडू रॉजर फेडररला कडवी झुंज देऊन अव्वल स्थानी विराजमान झालेल्या नदालची बेसलाईनच्या मागून खेळत आपल्या ताकदवान फटक्यांनी अल्पावधीतच टेनिस जगतात दिग्गज खेळाडूंच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे. स्पेनमधील मजोरका येथे एका उद्योगपतीच्या घरी जन्मलेल्या नदालच्या घरात टेनिसची कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. नदालचे काका मिग्युएल नदाल हे व्यावसाय़िक फुटबॉलपटू होते. ते मलोरका, बार्सिलोना क्लबकडून आणि स्पेनच्या राष्ट्रीय संघाकडून खेळलेले होते आणि दुसरे काका टोनी नदाल हे टेनिसपटू होते. त्यांनी लहानपणीच नदालच्या अंगातील टेनिसची कला ओळखून वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्याला टेनिसचे धडे देण्यास सुरवात केली. वयाच्या आठव्या वर्षी नदालने बारा वर्षांखालील स्थानिक स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आणि तो एक चांगला फुटबॉल खेळाडू म्हणूनही उदयास येत होता. मात्र, टोनी नदाल यांनी रॅफेलकडून दोन्ही हाताने मारत असलेला फोरहँडचा फटका हेरला आणि त्याला टेनिसपटू बनविण्याचा निर्णय घेतला. शाळेत असताना नदालला फुटबॉल की टेनिस यापैकी एक खेळ निवडण्याची वेळ आली होती. तेव्हा त्याने टेनिसला प्राधान्य देत आपली आवड ही टेनिसच असल्याचे सांगितले. टेनिसमध्ये आपली कारकिर्द घडविण्यासाठी नदाल मजोरकाहून बार्सिलोना येथए स्थायिक झाला. त्यानंतर त्याने मागे वळून न पाहता ज्युनिअर स्पर्धा जिंकण्याचा सपाटाच सुरु केला. नदालने सतराव्या वर्षी विंम्बल्डनमध्ये दुसऱ्या फेरीत रॉजर फेडररचा पराभव करून विंम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या सर्वात तरूण खेळाडूचा मान मिळविला. यापूर्वी बोरिस बेकरने वयाच्या अठराव्या वर्षी हा मान मिळविला होता. वयाच्या 19 व्या वर्षी पहिल्यांदाच फ्रेंच ओपनमध्ये उतरलेल्या नदालने विजेतेपद मिळवीत टेनिस जगताला नवा क्ले किंग मिळवून दिला.

    नदालच्या या कामगिरीचे आतापर्यंत महान टेनिसपटूंनी प्रशंसा केली असून, तो प्रशंसेस पात्रही आहे. आतापर्यंत दहा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या नदाल अशीच कामगिरी करीत राहिला तर तो टेनिस कारकिर्दीत यशाचा सर्वोच्च टप्पा गाठेल एवढे नक्की.Trending