आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताजा कलम : पावसाचा शिडकावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चातकही पाहत नसेल इतकी सामान्य माणूस आणि शेतकरी पावसाची वाट पाहत होता. मात्र, सर्वांची पुरती वाट लावण्याच्या इराद्यानेच जणू पाऊस वागत होता. यावर्षी पावसाने हवामान खात्यापासून तर भेंडवळच्या घटमांडणीपर्यत सर्वांचे अंदाज चुकवले. त्यामुळे प्रशासनाच्या तोंडचे पात्र पाणी पळाले होते. यापूर्वी कमी पावसाची वर्षे आलीच नाहीत, असे नाही; पण तेव्हा इतका भीषण दुष्काळ कधीच आला नव्हता. यावर्षी मात्र पावसाने कहरच केला आहे. विदर्भ आणि विशेषत: मराठवाड्यात पाऊस नसल्याने भीषण परिस्थिती आहे. पावसाअभावी उद्योग आणि उसाला पाणी कपात करण्याच्या घोषणाही झाल्या. त्यावर बराच गदारोळ आणि राजकारण झाले. अजूनही ते थांबलेले नाही. इकडे पावसाचा टिपूस नसताना तिकडे विरोधकांची सत्ताधार्‍यांवर गारपीट सुरू आहे. धरणातील पाण्याची आणि विरोधकांच्या आरोपांची पातळी झपाट्याने खालावली आहे. मराठवाड्यात तर जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरही जनावरांसाठी चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. तर इतका भीषण दुष्काळ असतानाही नाथाघरची उलटी खूण सुलटी व्हायला तयार नाही. दिवसेंदिवस दुष्काळाची छाया गडद होत असताना प्रशासनात मात्र नियोजनाचा दुष्काळ असल्याचे दिसून येते. राज्यात ‘देवेंद्रा’चे राज्य आल्यावर तरी चित्र बदलेल असे वाटले होते; पण प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही हे स्पष्टपणे दिसून आले. मराठवाड्यात केलेला कृत्रिम पावसाचा प्रयोगही सपशेल फसला. त्यामुळे तर प्रशासनाची चांगलीच गोची झाली. अखेर खर्‍या पावसालाच दया आली नि जाता जाता त्याने हजेरी लावली. सुरुवातीला पांडुरंगाचे पाय भिजवायलाही न आलेला पाऊस आता बैलांची शिंगे भिजवून चालला आहे. या पावसाने एकदम धरणातील पाण्याची पातळी वाढून जलाशये भरणार नसली तरी तेवढ्यानेही सामान्य माणूस आणि शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. निदान चारा-पाण्याचा प्रश्न नक्कीच सुटणार आहे.