आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलात असो वा रायपूरमध्ये, फायदा सरकार बनवणार्‍यांचाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आझाद हिंद एक्स्प्रेसमधून
70 च्या दशकात भारतात माओवाद्यांच्या देशी आवृत्तीने शिरकाव केला. बंगालमार्गे ते देशात आले. जंगलमार्गे त्यांचा विस्तार झाला व ते दक्षिणेपर्यंत पोहोचले. याच रस्त्यांवरील रुळांवर सध्या इलेक्शन एक्स्प्रेस पोहोचली आहे. बंगाल-छत्तीसगड-आंध्र प्रदेश. नक्षलवाद्यांनी सरकारशी दुश्मनी पत्करली आहे. दंडारण्य आखाडा बनले आहे. छत्तीसगडमध्ये रक्तपात वाढत गेला. या महिन्याच्या 13 तारखेला झिरम खोर्‍यात नक्षल्यांनी धुमाकूळ घातला. 15 जवान शहीद झाले. यामुळे सगळेच त्रस्त आहेत, तर फायदा काही मोजक्यांना आहे. त्यांनाच ज्यांचे सरकार आहे. मग ते जंगलात असो की रायपूरमध्ये. राज्य तयार झाले तेव्हा 16 जिल्हे होते. आज 27 आहेत. त्यापैकी अधिक बनवण्याचे कारण म्हणजे, नक्षल्यांना थोपवले जावे. पण फायदा काय... आसनसोलमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक बोलता बोलताच थांबले. ते छत्तीसगडच्या धमतरीमध्ये जन्म व लहानाचे मोठे झाले आहेत. नक्षल्यांना आंध्र प्रदेशातून पिटाळण्यात आले व त्यांना छत्तीसगडमध्ये आसरा मिळाला, असे ते म्हणाले. झारखंडमधून तर हल्लेखोर येतच आहेत, पण आता ओडिशामधूनही येऊन येथे हल्ले करून जात असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजूलाच बसलेले सुरेशकुमार म्हणाले, ‘पण विकास तर झाला आहे. तुम्हाला तो दिसूनही येईल. सगळ्यांना वीज, पाणीही मिळू लागले आहे. डॉ. रमणसिंह तिसर्‍यांदा मुख्यमंत्री बनले ते उगाचच का? एक रुपया किलोने तांदूळ देऊन लोकांना खुश करत आहेत. पण त्यामुळे लोकांना काम नकोसे झाले, हेही तेवढेच खरे आहे.’ कोळसा कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर शंकर कौल यांचा दावा वेगळाच आहे. ते म्हणतात, ‘जोगी रमणसिंह यांच्यापेक्षा आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबरच अधिक भांडतात. आपल्या पक्षाचे विरोधक बनले आहेत. नसता पक्षाला 2009 मध्ये केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले नसते. दहा भाजपला मिळाले. उरलीसुरली कसर नक्षल्यांनी पूर्ण केली. गेल्या वर्षीच्या हल्ल्यात पक्षाचे नेतृत्वच संपवून टाकले.’ प्रत्युष विरोध दर्शवत म्हणाले, ‘असे काही नाही. ज्या ज्या ठिकाणी प्रचारासाठी मोदी गेले, तेथे भाजपला नुकसान झाले. त्याउलट काँग्रेसच्या जागा 38 हून 39 झाल्या. लोकांनी काँग्रेसच्या नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. राहुल सगळ्यांना भावला. ’ वातावरण राजकीय बनले होते. रेल्वेच्या वेगासारखाच एक तालबद्ध आवाज कानी पडला.

सबले बढिया...छत्तीसगढिया...! समोर बसलेला एक जण मोबाइलवर व्हिडिओ पाहत होता. काही पुरुष व स्त्रिया काळ्या गणवेशात आहेत. खांद्यावर बंदुका लटकत आहेत. काही लांब उभे आहेत.. इतर हातात ढोल घेऊन गात होते. ‘सबले बढिया...छत्तीसगढिया... सबले बढिया...हो... सबले बढिया...! ’ गावातील लोकही तेथेच जमा झाले आहेत. ते त्यांच्यामागे कोरसमध्ये गाणे म्हणत आहेत. गाणे संपल्यावर तो म्हणाला,‘लोक गात होते, तेवढ्यात पोलिस आले. नऊ जण मारले गेले.’ मी विचारले,‘तुम्ही कोठून? आणि इकडे कसे?’ तो म्हणाला,‘बस्तरला जात आहे. आम आदमी पक्षाने सोनी सोरी यांना उमेदवारी दिली आहे.’ गाणे रिपीट मोडवर पुन्हा पुन्हा सुरूच होते. सबले बढिया...छत्तीसगढिया...
सबले बढिया...हो..!