आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंची भूमिका 'नरो वा कुंजरो वा'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मानसशास्त्रीय युद्धाचे एक तंत्र असते. या युद्धातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महत्त्वाच्या शत्रूशिवाय अन्य शत्रूविषयी प्रचार केल्यास त्यांचा पक्ष गाफिल राहतो आणि नेते साशंक राहतात. याचे कारण एवढेच की, आजचा मित्र उद्या शत्रू बनू शकतो म्हणून हा प्रचार फार बारकाव्याने व तोलून-मापून करावा लागतो आणि उद्धव ठाकरे यांनी अत्यंत अफलातून पद्धतीने या तंत्राचा वापर केला आहे. हे तंत्र वापरून त्यांनी राज ठाकरे यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा केला आहे. राज ठाकरे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले तरी त्यांच्यापुढे समस्या निर्माण होणार आहे आणि नाही दिले तरी.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पहिल्याच बैठकीत त्यांनी नाराजांनी पक्ष आत्ताच सोडून जावे, असे परखडपणे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनीच आपल्या मुखपत्रात राज आणि उद्धव एकत्र येणार का, या प्रश्नाला उत्तर देताना टाळी एका हाताने वाजेल काय, असा प्रश्न करीत दोघांना एकत्र बसवून हा प्रश्न विचारा, असे सांगून मनसे-शिवसेनेच्या एकत्रीकरणाकडे एक पाऊल पुढे टाकले.

‘सामना’तील मुलाखतीत उद्धव आणि राज भविष्यात एकत्र येतील काय, या प्रश्नाच्या उत्तरात उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही माझ्याकडे कसे मागू शकता? पण उत्तरच हवे असेल तर त्यासाठी तुम्ही दोघांना म्हणजे आम्हाला एकत्र आणून समोरासमोर बसवा. बाजूबाजूला बसवा. आणि मग, तुम्ही एकत्र येणार काय? हा प्रश्न दोघांना एकत्र विचारलात तर बरे होईल. या प्रश्नाचे उत्तर दोन्ही बाजूंवर अवलंबून आहे, एका बाजूवर नाही. एकत्र येण्यापूर्वी दूर का गेलो याचा विचार होणे गरजेचे आहे असे म्हटले. पुढे त्यांनी मराठी एकजुटीची वज्रमूठ फोडणारा आपला शत्रू आहे की आपणच आपले शत्रू, याचा विचार प्रत्येकाने, खासकरून आम्ही दोघांनी केला पाहिजे. मी तरी तोच विचार करतोय, असे सांगून त्यांनी राज ठाकरे यांच्या कोर्टात बॉल टाकला आहे. राज ठाकरे टाळी वाजवण्यासाठी पुढे आलेल्या हातातील धनुष्यबाण आपल्या हातात घेतात की पुढे आलेल्या हातात इंजिन देतात हे लवकरच कळेल. परंतु काहीही निर्णय घेतला तरी तो राज ठाकरे यांच्यासाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे. राज ठाकरे यांनी उद्धव यांच्या हाकेला ओ दिली तर जो मराठी तरुण त्यांच्या मागे शिवसेना सोडून आला, त्याला राज यांनी विश्वासघात केल्यासारखे वाटेल.

दुसरीकडे मराठी मतदारांपुढेही उद्धव यांनी मराठी मतांची फूट टाळण्यासाठी आपण एक पाऊल पुढे आलो असल्याचे दाखवून दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी 100 पावले टाकण्याचे वक्तव्य करणा-या राज ठाकरे यांनी उद्धवच्या हाकेला ओ देऊन एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला नाही तर ते मराठी माणसाचे शत्रू असल्याचे चित्र शिवसेनेतर्फे मतदारांपुढे तयार करण्यात येईल. याचा मोठा फटका राज ठाकरे यांनाच बसणार आहे. शिवसेनेकडून मराठीचा मुद्दा हायजॅक करून राज ठाकरे यांनी आपले राजकारण सुरू केले. या राजकारणाचा त्यांना चांगलाच फायदाही झाला. मुंबईसह राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकात मनसेने आपली ताकद दाखवली. मुंबई महानगरपालिकेवर भाजप-शिवसेना कशीबशी आपली सत्ता राखू शकली.

लोकसभेच्या निवडणुकीत मनसेचा खासदार निवडून आला नसला तरी भाजप आणि शिवसेनेला त्याचा चांगलाच फटका बसला होता. विधानसभेतही भाजप-शिवसेनेची सत्ता मनसेमुळेच येऊ शकली नाही. सध्याच्या विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या 47 तर शिवसेनेच्या आमदारांची संख्या 45 आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला आठ जागांवर पाच हजारांपेक्षा कमी फरकाने तर सात जागांवर 10 हजारांपेक्षा कमी फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. शिवसेनेलाही नऊ जागांवर पाच हजारांपेक्षा कमी मतांनी तर 13 जागांवर 10 हजारांपेक्षा कमी मतांनी पराभव पत्करावा लागला होता. ही सगळी मते मनसेने खाल्ली असल्याचे बोलले जाते. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकांच्या निकालानंतर मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून मनसेने मराठी मते कशी खाल्ली याची प्रचिती आली.

मनसे हा शहरी पक्ष आहे. राज ठाकरे यांचा प्रभाव शहरातील तरुणाईवर मोठ्या प्रमाणावर असल्यानेच मुंबई, नाशिक, ठाणे अशा मोजक्याच ठिकाणी त्यांची ताकद आहे. याचाच फटका याच भागातील 24 मतदारसंघांत भाजपला बसला. मनसेने मुंबईत 18 लाख मते मिळवली होती. त्यामुळेच शिवसेना-भाजप सत्तेपासून दूर राहिले. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी ही बाब ओळखली होती. त्यामुळेच त्यांनीच सर्वप्रथम शिवसेना-भाजप-रिपाइंमध्ये मनसेला घेण्याचे सूतोवाच केले होते. शिवसेना-भाजप युतीमध्ये मनसे आल्यास विधानसभेत या महायुतीला 60 ते 65 जागा तर लोकसभा निवडणुकीत दहा ते बारा जागांवर लाभ होऊ शकतो. महायुतीतील एक सदस्य रामदास आठवले यांनी मात्र राज यांना युतीत घेऊ नये असा पवित्रा घेतला होता आणि आजही ते आपल्या या पवित्र्यावर कायम आहेत.

राज ठाकरे जर महायुतीत गेले तर राज्यभर पक्ष वाढवण्याचे त्यांचे स्वप्न भंग होऊ शकते. युतीत गेल्यास त्यांच्या वाट्याला फक्त काहीच जागा म्हणजेच 70-80 जागा येतील. ज्या ठिकाणी मनसेची ताकद आहे, अशाच जागा त्यांच्या वाट्याला येतील. राज ठाकरे यांना जेथे आपली ताकद नाही तेथे ताकद वाढवून मनसेची एक वेगळी शक्ती निर्माण करावयाची आहे. युतीत गेल्यास ही बाब शक्य होणार नाही. युतीतील एक सदस्य म्हणूनच त्यांना राहावे लागेल आणि युतीबरोबर फरपटतही जावे लागेल. राज ठाकरे यांना ही स्थिती चांगलीच ठाऊक आहे. त्यामुळेच सध्याच्या परिस्थितीत ते नरो वा कुंजरो वा स्थितीत राहतील असे वाटते. कारण याच भ्रम निर्माण करण्याच्या स्थितीचा त्यांना फायदा होणार आहे.