आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"अशांत बादल' खलिस्तानच्या दिशेने निघालेेले वादळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबमध्ये मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी सोमवारी पंजाबी जनतेची जाहीर माफी मागितली. एक वर्षापासून पंजाबमध्ये पवित्र गुरुग्रंथसाहिबचा अवमान करणाऱ्या घटना घडल्या. त्यातून हिंसाचार झाला. दिवाळीला झालेल्या सरबत खालसामुळे परिस्थिती आणखी बिघडली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जाहीर माफी मागावी लागली.
पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाशसिंग बादल हे नेल्सन मंडेला आहेत, असे विधान केले होते. या विधानाची भरपूर खिल्ली उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रकाशसिंग बादल हे लोकप्रिय नेते आहेत. पण या लोकप्रियतेचा दोन्ही नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी गैरअर्थ घेतलेला दिसतो. त्यामुळेच या दोघांपुढे कठीण परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

"सबका साथ-सबका विकास' असा नारा देऊन मोदी सरकार सत्तेवर आले तसेच पंजाबमध्ये २००७ ला "शीख अस्मितेची जपणूक आणि पंजाबचा विकास' अशी दुहेरी स्वप्ने दाखवून शिरोमणी अकाली दल-भाजपचे सरकार सत्तेवर आले. विकासाची स्वप्ने सरकार पूर्ण करू शकलेले नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढतोय. शेतकरी आंदोलन करीत आहेत. व्यापार वाढवण्यासाठी "व्हायब्रंट पंजाब'सारखे कार्यक्रम होत आहेत. मात्र, त्यानंतर सरकारविरोधातील आंदोलने थांबत नाहीत.

पंजाबची राजकीय सत्ता जशी प्रकाशसिंग बादल यांच्या हातात आहे तशीच धार्मिक सत्ताही त्यांच्यात हातात आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीवर बादल यांचे नियंत्रण आहे. या धार्मिक सत्तेला आव्हान दिल्याने बादल सरकार हादरून गेले आहे. दिवाळीच्या निमित्ताने अमृतसरच्या सुवर्णमंदिरात शीख धर्माचा पारंपरिक मेळावा होतो. या मेळाव्यात श्री अकाल तख्तचे जत्थेदार (धर्मगुरू) समाजाला मार्गदर्शन करतात. अकाल तख्तवर होणारे निर्णय हे समाजातील प्रत्येकाने पाळायचे, असा नियमच आहे.

सुवर्णमंदिरात १० नोव्हेंबरला पारंपरिक मेळाव्याबरोबर जहालवाद्यांचा सरबत खालसा झाला. शीख समुदायातील धार्मिक अडचणींवर मात करण्यासाठी सरबत खालसा बोलावला जातो. पहिला सरबत खालसा १७४६ च्या दिवाळीमध्ये झाला होता. मुघल राज्यात लाहोरचे तत्कालीन गव्हर्नर जकिराया खान यांनी सुवर्णमंदिर परिसरात नाकेबंदी केली होती. कोणत्याही शीख माणसाला येथे येण्यास बंदी होती. याविरोधात नबाब कपूरसिंग यांच्या नेतृत्वाखाली शीख समुदायाने एकत्र येऊन उठाव केला होता. यानंतर १७६४, १७६५ मध्ये उठाव झाला. इंग्रजांच्या काळात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीची स्थापना झाली.

१० नोव्हेंबरला झालेल्या खालशात जहालवादी संघटनांनी श्री अकाल तख्तचे धर्मगुरू गुरबचनसिंग यांना हटवून माजी मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्याकांडप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आरोपी जगतारसिंग हवारा याला नवा धर्मगुरू म्हणून जाहीर केले. हवारा तुरुंगात आहे. त्याचा प्रतिनिधी आणि कार्यकारी जत्थेदार म्हणून शिरोमणी अकाली तख्त (अमृतसर) चे उपप्रधान ध्यानसिंग मंड काम पाहतील, असेही या वेळी बंडखोरांनी जाहीर केले. तख्त श्री दमदमासाहिब, तख्त श्री केसगडसाहिब आणि तख्त श्री पटनासाहिब यांच्या जत्थेदारांना हटवण्यात आले. या मेळाव्याला प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते. हवाराला धर्मगुरू म्हणून घोषित केल्यानंतर हजारो लोकांनी त्यांच्या समर्थनार्थ आवाज दिला.

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने ही नवी नियुक्ती अमान्य केली, मात्र या सर्वोच्च संस्थेचे कोण ऐकणार? अशी परिस्थिती ११ नोव्हेंबरला निर्माण झाली. शिरोमणी गुरुद्वाराचे जत्थेदार गुरुबचनसिंग हे परंपरेनुसार समाजाला संबोधित करण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांच्याविरोधात जमावातील अनेक लोक घोषणा देऊ लागले. यादरम्यान तिथे जहालवाद्यांनी घोषित केलेले जत्थेदार ध्यानसिंग मंड आले. त्यांच्या समर्थकांनी त्यांच्याभोवती गराडा घातला होता त्यामुळे पोलिसही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मंड यांनी शीख समुदायाने यंदाची दिवाळी साजरी करू नये. गुरूग्रंथसाहिबचा अपमान झाल्यामुळे ही दिवाळी आपल्यासाठी काळी असल्याचे सांगितले. हा गोंधळ सुरू असताना सोबतीला "खलिस्तान'चा नाराही दुमदुमला. यानंतर पंजाब सरकारने सरबत खालशाला उपस्थित असलेल्या नेत्यांची धरपकड सुरू केली. अनेक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर काहींना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल लोकप्रिय नेते असले तरी त्यांचे डावपेच उघडे पडत आहेत. "डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख बाबा राम रहीम यांना अकाल तख्तने माफ केले. हा निर्णय बाबा राम रहीम यांच्या समर्थकांची मते मिळवण्यासाठीच होता. या निर्णयामुळे शीख समुदाय दुखावला आहे. एकाच वेळी आर्थिक आणि धार्मिक अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न बादल-भाजप सरकार करीत आहे. प्रकाशसिंग बादल यांनी माफी मागितल्यानंतर अकाली दल राज्यात लवकरच शांतता मार्च काढणार आहे. त्यांना रोखण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. शीख समाजातील विविध संघटनांनी एकत्र येऊन अकाली दलाविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णयही जाहीर केला आहे. यातील काही संघटनांचा अजेंडा "खलिस्तान'च आहे. पंजाबचे राजकारण पुन्हा धार्मिक अस्मिता, स्वतंत्रता या मुद्द्यांभोवती फिरू लागले आहे. या वादाला पाकिस्तानच्या आयएसआयकडून थेट मदत मिळत आहे. संपूर्ण देशातच "गर्व से कहो हम...है' म्हणणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पंजाबकडून वेगळी अपेक्षा कशी ठेवायची? मात्र, या धार्मिक अस्मितेच्या राजकारणात पंजाब पुन्हा पेटणार आहे.