आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramakant Daani Article About Nitin Gadkari, Divya Marathi

गडकरींचा वाणीसंयम कोठवर टिकणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाचळ आगाळा बोलों नेदी लोकां, एका जनार्दनी देखा फजीत होय, असं नाथांनी सांगून ठेवलंय, ते काही उगीच नाही, पण अंगात वर्षानुवर्षे मुरलेला वाचाळपणा जाणार तरी कसा? तो जाणार नसेल तर फटफजितीही होणारच ना. नमो लाटेवर (असे राजकीय पंडित म्हणतात) स्वार झालेल्या अन् दिल्लीच्या तख्तावर नजर स्थिरावलेल्या भाजप नेत्यांना हे कुणीतरी सांगण्याची गरज आहे. खास करून नागपूरच्या महाल (हे वस्तीचे नाव) संस्कृतीत वाढलेल्या नितीन गडकरी यांना. प्रयत्न बरेच झाले, असे गडकरी समर्थक सांगतात. त्यामुळे फरक एवढाच पडला की, एकेकाळचे मीडिया फ्रेंडली गडकरी आता अभावानेच बोलतात. स्वभावाला मुरड घालून वादाचे विषय टाळण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तरीही कधी कधी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हा मूळ स्वभाव अचानक ज्वालामुखीप्रमाणे उफाळून येतो. त्याच्या बातम्या होतात. गडकरी ठरले राष्ट्रीय नेते. त्यामुळे बातम्यांचे प्रसारणही त्या स्तरावर व्हावे, हे ओघानेच आले.

नागपुरातील सर्वात जुन्या वस्त्यांमध्ये महाल परिसराचा समावेश होतो. या परिसराची आपली स्वत:ची संस्कृती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उगम येथेच झाला. लोकांच्या वागण्या बोलण्यात बर्‍यापैकी मोकळेपणा जाणवतो. काहीशी सैल भाषा वापरली जाते. त्यामुळे येथील मराठी भाषेचा लहेजा देखील थोडाफार वेगळाच आहे. वाक्यागणिक अबे अन् काबे शब्दांचा वापर अनिवार्यच आहे. बुडावर लाथ मारीन, भोंगाडे वाजवीन हे महाल संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे बर्‍यापैकी सौम्य शब्द. अशातच व्यक्ती वाचाळ आणि बडा राजकीय नेता असली तर बोलायलाच नको. गडकरी यांची ही खरी अडचण आहे.

अलीकडे राष्ट्रीय नेते झाल्यापासून त्यांनी नागपुरातही हिंदीचा वापर जाणीवपूर्वक वाढविला आहे. त्यामुळे भोंगाडे वाजवीन, एक पुरके बाकी भुरके या खास गडकरी कोशातील शब्दप्रयोगांना त्यांचे समर्थक मुकले आहेत, पण वाद काही त्यांचा पिच्छा सोडत नाही. अलीकडेच त्यांनी आप वाल्यांनाही अंगावर घेतले. मेळाव्यात कार्यकर्त्यांना जोश भरताना त्यांनी चिथावणीखोर भाषेचा वापर केल्याचा आम आदमी पार्टीच्या नेत्यांचा आरोप आहे. त्यावर पोलिस तक्रारी झाल्यात अन् तपासही सुरूच आहे. हे कमी की काय, त्यांनी भारतीय मजदूर संघाच्या नेत्यांनाही उपदेशाचे डोस (बौद्धिक) पाजून परिवारातील या संघटनेची नाराजी ओढवून घेतली. संघटनेच्या नेत्यांनीही मग एनडीएच्या कार्यकाळातील नाकर्तेपणावर संताप व्यक्त करून घरचा अहेर दिलाच. मीडियाने त्यात बातमी शोधली, पण सारवासारव कोठवर करणार? त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियातील दांडेकर मंडळी दिसली की गडकरी अभूतपूर्व अशा संयमाने प्रसंगाला सामोरे जात आहेत.
अगदी आपवाल्यांच्या भ्रष्ट नेत्यांच्या यादीत नाव येऊनही हा संयम टिकला. वाड्यावर गोळा झालेल्या मीडियाची चहावर बोळवण झाली. त्यामुळे नो बाईट प्लीज! असा फलकच महालमधील गडकरी वाड्यावर लागायचा शिल्लक आहे, असे मीडियातील लोक म्हणतात, पण हा वाणीसंयम कोठवर टिकणार? असा प्रश्न सध्या त्यांच्या समर्थकांना पडलेला आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. गडकरी उमेदवार आहेत. तोंड बंद ठेवून कसे चालायचे? आपवाल्यांचे फटाके सुरूच आहेत. गडकरी आणि त्यांचे निकटचे सहकारी त्यांच्या निशाण्यावर आहेतच. भलेही फटाक्यांमधील बारूद जुनीच, पण ते वाजायचे थोडीत राहतात. निवडणुकीच्या तोंडावर ते नागपुरात धडाड धम् वाजतच राहणार.

गडकरी यांच्या कथित घोटाळ्यांची पाच प्रकरणे लवकरच बाहेर काढणार, असा इशाराच आपच्या नागपुरातील उमेदवार अंजली दमानिया यांनी जाहीरपणे दिलेला. या टाइमबॉम्बचे टायमिंग निवडणुकीच्या वेळापत्रकाशी जुळलेले राहणार. त्यामुळे या टाइमबॉम्बच्या तारा शोधण्यातच वेळ खर्ची पडणार की काय? अशी साधार भीती भाजपच्या गोटात व्यक्त होत आहे. गडकरी यांना हरवण्यासाठीच लढणार, या पुणेरी बाण्याने दमानिया उमेदवारी जाहीर होताच नागपुरात लँड झाल्या. गडकरींचे विश्वासू खासदार अजय संचेती यांच्यामागे फटाका लावून नागपुरातून टेकऑफही झाल्या. भाजपवाले आता पोलिस तक्रारींचा खेळ खेळत बसले आहेत, तर दुसरीकडे निवडणुका जिंकण्याचा दांडगा अनुभव असलेली काँग्रेसची मंडळी सध्यातरी पक्षांतर्गत लाथाळ्या निस्तारण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्या आघाडीवर भाजप युद्धबंदीची शांतता अनुभवत असला तरी काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याचाच काय तो अवकाश आहे. त्यामुळे नागपुरात येत्या काळात आरोप-प्रत्यारोपांचे बॉम्ब फुटतच राहणार. त्याचे आवाज थेट दिल्लीपर्यंत पोहोचणार, हे सांगायला कुण्या राजकीय पंडीतांची गरज नसावी.