आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramakant Daani Article About Vidarbha Election, Divya Marathi

विदर्भातील वाढीव मतदानाचे कोडे सुटेना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात पहिल्या टप्प्याचे मतदान झालेल्या विदर्भात सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षांनी शक्ती पणाला लावली. मतदानासाठी जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न प्रथमच व्यापक स्तरावर झाले. मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्या समर्थनातील मतदान जास्तीत जास्त प्रमाणात होण्याच्या दृष्टीने डावपेचांवर अमल करण्याचे प्रयत्न झाले. मतदानाच्या बाबतीत उदासीन राहणार्‍या उच्चभ्रूंच्या वस्त्यांमध्येही भरउन्हात मतदानासाठी लागलेल्या रांगा कार्यकर्त्यांना समाधान देऊन गेल्या. मात्र, मतदार याद्यांचा घोळ आणि मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांचा रोष या वेळीही प्रचंड प्रमाणात दिसून आला. निवडणुकीची तयारी करताना सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबवल्या. तरीही वंचित ठरलेल्या मतदारांचा आकडा या वेळीही हजारोंच्या घरात गेलाच.

हा चमत्कार कुठल्या स्तरावर झाला, हा चौकशीचा विषय आहे. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी आता ऑनलाइन सुविधादेखील उपलब्ध आहेत. मात्र, मतदारही गाफील राहिले. त्याचे फळ अनेकांना भोगावे लागले. आता राजकीय पक्षांकडून ओरड सुरू झाली असली, तरी त्याला सध्याच्या स्थितीत कुठलाही अर्थ नाही. निवडणूक आटोपली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत विदर्भातील मतदानाचा आकडा सरासरी सात टक्क्यांनी वाढून तो सरासरी 63 टक्क्यांच्या जवळपास पोहोचला आहे. विदर्भातील एकूण 1 कोटी 66 लाख 36 हजार मतदारांपैकी 1 कोटी 4 लाख 60 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

लाट आणि प्रतिलाट : विदर्भातील राजकीय परिस्थिती आणि वाढीव मतदानाचे राजकीय पक्षांकडून सोयीचे अर्थ काढले जात आहेत. वाढीव मतदान म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधातील असंतोष व्यक्त झाल्याचे द्योतक असल्याचा दावा महायुतीकडून सुरू आहे. महायुतीला कुठेतरी मोदी लाट आणि सरकार विरोधातील असंतोष प्रकट झाल्याचे वाटत आहे, तर दुसरीकडे मोदीविरोधी लाटेचे दावे आघाडीच्या नेत्यांकडून सुरू आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लिम आणि दलित मतदारांनी मतदानाचा टक्का वाढवल्याचे दावेही आघाडीतून सुरू आहेत. विशेषत: नागपूर, अकोला, अमरावती या तीन लोकसभा मतदारसंघांत मुस्लिम मतदारांचे प्रमाण मोठे आहे. प्रचार सुरू असताना तिन्ही मतदारसंघांतील मुस्लिम वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक भावना चेतवणार्‍या सीडी वितरित झाल्या. भाजपकडून सुरू असलेल्या ‘अबकी बार, मोदी सरकार’च्या प्रचाराकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे तटस्थ पर्याय शोधण्याच्या प्रयत्नातील मुस्लिम मतदारांचा वैचारिक गोंधळ उडून त्यांनी अखेर बहुसंख्येने पारंपरिक पद्धतीनेच मतदान केल्याची चर्चा वस्त्यांमधून ऐकायला मिळत होती. दलित मतदारांमध्येही वेगळी लाट निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे अनेक जागांवर मतदानापूर्वीची आणि मतदानानंतरची विजयाची समीकरणे बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यशाचे समीकरण बदलले : कुणालाच यशाचे शंभर टक्के दावे करता येऊ नयेत, अशी स्थिती विदर्भातील बहुतांशी मतदारसंघांमध्ये दिसून येते. उदाहरणे द्यायची झाल्यास नागपुरातील गडकरी आणि मुत्तेमवार सामना मतदानात कोणत्या बाजूला झुकला, याची खात्री कुणालाही देता येत नाही. यशाचे दावे मात्र दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. भंडारा-गोंदिया मतदारसंघांत केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेलांचे पारडे जड मानले जात असताना नाना पटोले यांचा गड मानल्या जाणार्‍या भंडारा जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे आकडे येत आहेत. अमरावतीत अडसूळ-राणा-आंबेडकर असा त्रिकोणी मुकाबला अधिकच रंगतदार बनला आहे. अकोला व बुलडाणा मतदारसंघांमध्ये पक्ष सोडून जातीच्या राजकारणाचा अधिक बोलबाला राहिल्याने जातींच्या आघाड्यांवर वेगळीच स्पर्धा रंगली होती.

यवतमाळ मतदारसंघात मनसेच्या उमेदवारीने शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघांत तुलनेने कमी मतदानाचा लाभ भावना गवळी यांना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे हंसराज अहिर आणि आपचे वामनराव चटप यांचा असाच तुल्यबळ सामना रंगल्याचे बोलले जाते. त्यात अहिरांना आघाडी मिळाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गडचिरोलीत काँग्रेस नेत्यांची गटबाजी भाजपचे अशोक नेते यांच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिकांच्या विरोधात नाराजी असल्याचे बोलले जाते. त्याच वेळी भाजपकडील विधानसभा क्षेत्रांमध्ये तुलनेते बरेच कमी मतदान झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कुणालाच निर्भेळ यशाचे दावे करता येत नाहीत, अशी स्थिती आहे.

अ‍ॅडव्हांटेज महायुती : 2009 मध्ये विदर्भात युती आणि आघाडीतील मुकाबला 5-5 ने बरोबरीत सुटला. अमरावती विभागाचा समावेश असलेल्या पश्चिम विदर्भात काँग्रेस आघाडीचा सफाया झाला, तर पूर्व विदर्भाने आघाडीची लाज राखली. मात्र, या वेळी महायुतीला पूर्व विदर्भातूनही मोठ्या अपेक्षा आहेत, तर आघाडीला पश्चिम विदर्भातील कामगिरी सुधारेल, अशी आशा वाटते आहे. महागाईसह अनेक मुद्द्यांवर आघाडी बॅकफूटवर आली असताना निवडणुकीच्या तोंडावर झालेली गारपीटही महायुतीच्या पथ्यावर पडणार की काय, असे ढोबळ अंदाज जाणकारांकडून मांडले जात आहेत. सर्व शक्यता लक्षात घेऊन महायुती विरुद्ध आघाडी मुकाबला 7-3 अथवा 8-2 अशा फरकाने महायुतीकडे झुकण्याची शक्यता बहुतांशी जाणकारांकडून व्यक्त होत आहे. मात्र, हे स्पष्ट व्हायला किमान महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार. तोवर आकडेमोड सुरूच राहणार आहे.