आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतीवनात अनमोल ठेवा, पण उपेक्षेच्या गावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यघटनेचा मसुदा आणि बुद्ध आणि धम्म या ग्रंथांच्या लेखनासाठी बाबासाहेबांनी वापरलेले दोन टाइपरायटर्स, गोलमेज परिषद, घटना समितीचे कामकाज पाहताना त्यांनी वापरलेला कोट, बॅरिस्टरशिपसाठी त्यांनी वापरलेला काळा अॅप्रन, कुर्ता-पायजामा, इंग्रजी हॅट, फुल पँट, शर्ट, टाय, रामजी सकपाळ यांनी दिलेला रॉकेलचा कंदील, दैनंदिन वापराच्या नाना वस्तू, शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या बुद्धमूर्तीपुढे नतमस्तक होऊन दीक्षा घेतली त्या अष्टधातूच्या मूर्तीसह कितीतरी वस्तू प्रत्यक्षात पुढ्यात असल्यावर कुणीही हरखून जाणार, हे निश्चित. अशी वस्तू व्यक्त होते, इतिहास सांगते. पाहताना भावना दाटून येतात. बाबासाहेब हयात नाहीत; पण सहा दशकांचा कालावधी उलटून गेला तरी प्रत्येक वस्तूंमध्ये ते दिसतात. त्यामुळे प्रत्येक जण त्या वस्तूंपुढे नतमस्तक होतोच आणि दुरवस्थेबाबत चिंताही व्यक्त करतो. म्हणूनच असे म्हणावे लागते, बाबासाहेबांच्या स्मृतींचा अनमोल ठेवा, पण उपेक्षेच्या गावा…
होय, नागपूरपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावरील कळमेश्वर मार्गावरील चिंचोली गावातील शांतीवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयाची ही कथा आणि व्यथा आहे. सांची येथील स्तुपाच्या स्थापत्य शैलीची प्रतिकृती असलेली ही संग्रहालयाची वास्तू अत्यंत कलात्मक पद्धतीने उभारली आहे. बुद्धविहार, विश्रामगृह आणि छोटीशी शांतीकुटी एवढाच काय तो शांतीवनचा परिसर. येथे अशा अनेक गोष्टी प्रस्तावित आहेत. सुरक्षेसाठी एक चौकीदार सोडला तर फारशी कुठली यंत्रणा येथे कार्यान्वित नाही. त्यामुळे हा अमूल्य असा ठेवा कितपत सुरक्षित राहू शकतो, असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनाला भेडसावतो आहे.
दुमजली स्तुपाच्या इमारतीत प्रवेश केल्यावर दर्शनी भागातील गोलाकार व्हरांड्यातील शोकेसेस सर्वांचे लक्ष वेधून घेतात. बाबासाहेबांनी वापरलेले कोट, पँट-शर्ट, अॅप्रन, कुर्ता-पायजामा असे बरेच कपडे काचेच्या शोकेसेसमध्ये लटकवून ठेवलेले आहेत. त्यापैकी बहुतांश कपड्यांवर काळाचा परिणाम जाणवतो आहे. काही कपडे वाळवी लागून फाटले, काहींना छिंद्र पडले. काहींचा रंग बदलून ते फिकट झालेले आहेत. या वस्तूंना टिकवण्यासाठी तत्काळ पावले उचलणे अपेक्षित आहे.
बाबासाहेबांच्या अस्थी आहेत. याच दालनात बाबासाहेबांनी वापरलेले टाइपरायटर्स आहेत. काळाच्या ओघात त्यावर चढलेला गंज स्पष्टपणे दिसतो आहे. याच टाइपरायटरवर बाबासाहेबांनी भारतीय संविधानाचा मजकूर, बुद्ध आणि धम्म ग्रंथाचे टंकलेखन केल्याचा उल्लेख आहे. बाबासाहेबांची हस्तलिखिते, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी, आचार्य अत्र्यांचा अग्रलेख आणि इतर अंक पाहिल्यावर प्रत्येक जण हरखून जातो. वडिलांनी दिलेला रॉकेलचा कंदील, स्वत: पेन्सिलीने काढलेले तथागत बुद्धाचे चित्र, दातांची कवळी, पेन, दाढीचे साहित्य, थर्मास, स्टूल, अडकित्ता, खुर्च्या, टेबल, बाबासाहेबांना आवडणाऱ्या संगीताच्या एलपी रेकॉर्डचा संच, ब्लँकेट, मच्छरदाणी अशा जवळपास साडेतीनशे वस्तू या संग्रहालयात ठेवल्या आहेत.
नानकचंद रत्तू आणि
गोडबोलेंचे योगदान
हा अमूल्य ठेवा जतन करण्याचे श्रेय त्यांचे खासगी सचिव नानकचंद रत्तू यांना जाते. १९९३-९४ मध्ये बाबासाहेबांचे निकटचे सहकारी वामनराव गोडबोले यांना रत्तूंनी हा ठेवा सुपूर्द केला. गोडबोले यांनी २००५ पर्यंत तो सांभाळला. स्मृतिशेष उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आला आहे. २००६ मध्ये गोडबोलेंचे निधन झाले. त्यानंतर शांतीवन प्रकल्पाची जबाबदारी गोडबोलेंचे सहकारी संजय पाटील यांच्याकडे आली आहे.
बुद्धविहाराची वैशिष्ट्ये
विहाराला १०९ कमळाच्या पाकळ्यांचा आकार दिला आहे. १३ ऑक्टोबर १९३५ ला बाबासाहेबांनी नाशिकजवळील येवले मुक्कामी धर्मांतराची प्रथम घोषणा केली. त्यामुळे विहाराच्या वरच्या पाकळ्यांची संख्या ३५ ठेवली. बाबासाहेबांनी १९३२ साली जयभीमचा नारा दिला. त्यामुळे विहाराची रुंदी ३२ फूट ठेवली. भगवान बुद्धांनी वयाच्या २९ व्या वर्षी गृहत्याग केला, तर बाबासाहेबांनी १३ ऑक्टोबर १९२९ ला महाड जाती पंचायतीची सभा घेतली. त्यामुळे विहाराची उंची २९ फूट आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी बुद्धांना बोधिवृक्षाखाली बुद्धत्व लाभले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. त्यांचा जन्म १४ एप्रिलचा. हा योग साधून विहाराला १४ खिडक्या ठेवण्यात आल्या.
सवर्ण महिलेने दान केली साडेअकरा एकर जमीन
स्वत: बाबासाहेबांनी १२ जानेवारी १९५५ रोजी धम्म प्रशिक्षण विद्यालय स्थापनेचा मानस बोलून दाखवला होता. बाबासाहेबांच्या कल्पनेला प्रत्यक्ष रूप यावे म्हणून मातोश्री गोपिकाबाई बाजीराव ठाकरे या सवर्ण महिलेेेने १९५७ मध्ये साडेअकरा एकर भूमी दान केली आहे. १९८५ पर्यंत ही जागा पडीतच राहिली. १९८५ नंतर वामनरावांनी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आणि आता तो थोडाफार
आकाराला आला असतानाच रखडला.