आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसजनांचे हातात हात....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदींचा चौखूर उधळणारा वारू काँग्रेसला धडकी भरवतो आहे. मोदींची वाढती लोकप्रियता, हाऊसफुल्ल गर्दीच्या सभांमुळे सारेच काँग्रेसजन कसे अस्वस्थ झाल्याचे दिसतात. दिल्लीपासून नागपूरच्या गल्लीपर्यंत काँग्रेसमध्ये हेच वातावरण सध्या बघायला मिळते. मोदींच्या जाहीरसभांना जमणा-या गर्दीचा भयगंड काँग्रेसला पछाडतो आहे. त्यामुळे काँग्रेसही आता त्या स्पर्धेत उतरली आहे. विदर्भातील काँग्रेस सध्या नागपुरात 21 नोव्हेंबरच्या शक्तिप्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी लाखोंच्या गर्दीच्या सभा पाहिलेले कस्तुरचंद पार्क बुक झालेले आहे. सभेचा कार्यक्रम तसा सरकारीच आहे. अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी राज्य शासनाने गेल्यावर्षी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुरु केली.
या योजनेच्या राज्यस्तरीय विस्ताराचा शुभारंभ सोनियांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीलाही विश्वासात घेण्याचे प्रयत्न केले आहेत. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार या जाहीरसभेस उपस्थित राहणार आहेत. तयारी लक्षात घेता या कार्यक्रमास काँग्रेसच्या जाहीरसभेचे स्वरुप येणार असे दिसते. आता पक्षश्रेष्ठींची जाहीरसभा म्हटली की गर्दी हवीच. खास दिल्लीतून तसे आदेश धडकले आहेत. संपूर्ण वातावरण काँग्रेसमय करा, असा संदेश विदर्भाच्या कानाकोप-यापर्यंत पोहोचविण्याच्या योजनेवर अंमल होत आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी वेळ काढून नागपुरात रामगिरीवर बैठक घेतली. त्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्षांकडून सर्व जिल्हाध्यक्षांना गर्दीचे टार्गेट दिले गेले. वाद उकरून काढणा-या नेत्यांना दम देण्यात आला. विदर्भात प्रदेशाध्यक्षांचे दौरे सुरु आहेत. जिल्हास्तरीय बैठका झडत आहेत. काँग्रसचे सारेच गट-तट एकत्र आल्याचे अभूतपूर्व वातावरण नागपुरात आहे. तिकडे, राष्ट्रवादीत मात्र, या जाहीर सभेबद्धल कुठलीही उत्सूकता दिसत नाही. त्यामुळे हा ख-या अर्थाने काँग्रेसचा कार्यक्रम असेल, असे सध्या तरी मानले जाते. लोकसभा निवडणुका अद्याप दूरच आहेत. त्यामुळे सध्या तरी विदर्भातील काँग्रेसपुढे नागपुरातील शक्तीप्रदर्शनाचे एकमेव टार्गेट आहे. पक्षाची तयारी पाहता शो हाऊसफुल्ल राहणार, हे ओघानेच आले. पण पुढे काय, हा प्रश्न लगेचच उभा होणार आहे.
काँग्रेसमध्ये इतरत्र आढळून येणारे वातावरण विदर्भातही आहे. गटबाजीला कुठल्याही मर्यादा राहिलेल्या नाहीत. अलिकडेच काँग्रेसच्या युवराजांनाही या गटबाजीचा सामना करावा लागला. त्यामुळे कधीकाळी काँग्रेसचा अभेद्य गड राहिलेल्या विदर्भात काँग्रसची सातत्याने पिछेहाट होत आहे. जानेवारी उलटल्यावर ख-या अर्थाने निवडणुकीच्या तयारीचे वारे वाहू लागतील. तोवर कदाचित जीवनदायीचा असर उतरलेला असेल. काँग्रेसचा आजवरचा इतिहास
हेच सांगतो.