आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नीतिभ्रष्ट राज्यकर्त्यांपासून शील रक्षणाचा ‘जाैहर’; लाेकभावनांचा सन्मान महत्त्वाचा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी इतिहासातील वंदनीय पात्रांबाबत लोकभावनांचा आदर न करता ‘पद्मावती’ सिनेमा प्रदर्शित करण्याचा घाट घातला. या पार्श्वभूमीवर इतिहासाचे सिंहावलाेकन करीत राणी पद्मावतीच्या शौर्यगाथेची, वीर बलिदानाची आपण माहिती जाणून घेऊया. 

 

‘जाैहर’(शाका) हा शब्द केवळ अब्रू वाचवण्यासाठी स्त्रियांनी अग्नीच्या पेटत्या ज्वालांमध्ये स्वतःला झोकून देणे एवढ्या मर्यादित अर्थाने वापरता येणार नाही. कारण जौहर या भूमीच्या स्वाभिमानाची लढाई आहे. जौहर प्रतीक आहे न कचरता स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान देणाऱ्या वीर क्षत्राणीच्या शौर्याचं. जौहर प्रतीक आहे संपूर्ण शीलरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या माता-भगिनींच्या धीराचं अाणि आपल्या पतीवर नितांत प्रेम करणाऱ्या व पतीच्या मृत्यूनंतर आपले जगणे निरर्थक आहे असे मानणाऱ्या, पतीवर अपार निष्ठा असणाऱ्या पतिव्रता स्त्रियांच्या प्रेमाचं. जौहर प्रतीक आहे संपूर्ण भारतवंशीय स्त्रियांच्या सन्मानार्थ व भारतीय संस्कृतीचा मान वाढवणाऱ्या गौरवशाली देहत्यागाचं. म्हणून ज्या स्त्रियांनी परपुरुषाच्या दृष्टीसही आपण पडता कामा नये; विकृत, कामुक मानसिकतेच्या अत्याचारी व नीतिभ्रष्ट राज्यकर्त्याच्या हाती लागून शीलभ्रष्ट होऊ नये यासाठी स्वतःला अग्निशरण केले अशा महान स्त्रियांच्या बलिदानाची जर कोणत्याही कारणाने विटंबना होत असेल तर पवित्र आईच्या पोटी जन्मलेला कोणताही वीर वा वीरांगना हे कदापिही सहन करणार नाही. 


वीर स्त्रियांच्या या जौहरवर विद्याधर पानट म्हणतात, 

जौहर ज्वाला की धाराओं में 
तुमने ऐसा स्नान किया 
जीवन तो पावन हुआ 
मरण का भी सम्मान हुआ 
उन ज्वालाओं ने, उन बालाओं ने 
ऐसा कुछ काम किया 
कालगतीने विराम कर 
बलिदान को प्रणाम किया! 


या गौरवशाली बलिदानाची आठवण राहावी म्हणून चित्तोडगड येथे गेल्या ८० वर्षांपासून तीनदिवसीय जौहर श्रद्धांजली समारंभ होत असतो. या बलिदानी वीर क्षत्राणींना व जौहरच्या ज्वालांना नमन करण्यासाठी जगभरातून लाखो लोक हजेरी लावतात.  


१३ व्या शतकाच्या उत्तरार्धात दिल्लीच्या तख्तावर खिलजी घराणे आरूढ झाले होते. गझनीच्या मोहंमदाने खैबर खिंडीतून प्रवेश करत मध्य आशियाई आक्रमकांसाठी भारताचा मार्ग खुला करून दिला. सन १२९५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने स्वतःचा काका व चुलत भावाची कपटाने हत्या करून दिल्लीची गादी बळकावली. ताे तामसी, कावेबाज, धर्मांध व अत्याचारी शासक होता. इ. स. १२९७ मध्ये  गुजरातवर त्याने स्वारी केली. राजा करणभागेला ऊर्फ कर्णराय याचे पारिपत्य करून त्याची सुस्वरूप राणी कमलादेवी हिच्याशी जबरदस्ती विवाह केला. एवढ्यावरच न थांबता कर्णरायची मुलगी राजकन्या देवलदेवीला पकडून तिचाही निकाह त्याने स्वतःच्या मुलाशी खिज्रखानशी  लावला. 


क्रूर सेनापती मलिक काफूरच्या मदतीने आसेतुहिमाचल भरतवर्षाला मलिन करण्याचे त्याचे स्वप्न होते. यामध्ये मेवाड सर्वात मोठा अडथळा होता. मेवाड ही हिंदुस्थानच्या प्रवेशाची किल्ली होती. मेवाडच्या गौरवाची शोभा असलेला चित्तोडगड व मेवाडची स्वामिनी पद्मिनीच्या सौंदर्याच्या कीर्तीने तो मदांध झाला होता.  


इ. स. १२८५ मध्ये जन्मलेल्या पद्मिनीचा विवाह इ. स. १३०० मध्ये मेवाड नरेश रावल रतनसिंह यांच्याशी झाला. अलौकिक सौंदर्याची स्वामिनी आपल्याला प्राप्त व्हावी या नीच हेतूने खिलजीने किल्ल्याला वेढा घातला. पराक्रमाच्या जोरावर पद्मिनी लाभणे शक्य नाही हे पाहून फक्त मुखदर्शन झाले तरी मी दिल्लीस परत जाईन असा प्रस्ताव त्याने गडावर पाठवला. परक्या व स्त्रीलंपट सुलतानसमोर राणीला उभे करणे कोणत्याही स्वाभिमानी माणसाला मान्य नव्हते. युद्ध न होताच संकट टळत असेल व केवळ मुखदर्शन घेऊन सुलतान माघारी जात असेल तर प्रस्ताव स्वीकारायला हरकत नसावी असा सूर दरबारी उमटला. राजपुतांच्या कुळाची शान राखत एक भव्य जलमहाल निर्माण करण्यात आला. राणी पद्मिनीचा चेहरा दाखवण्यासंदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. पद्मिनीचे दर्शन घेतलेल्या खिलजीने गडाच्या पायथ्यापर्यंत त्याला निरोप द्यायला आलेल्या रावल रतनसिंहांना  विश्वासघाताने अटक केली व राणी पद्मिनीला हवाली करा, अशी मागणी केली. पद्मिनीने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काका गोरा व चुलतबंधू बादल यांची मदत घेतली. दगाबाजीला दगाबाजीने उत्तर द्यावे या न्यायाने राणीने व्यूहरचना करून दासींच्या वेशात ७०० वीर पालख्यांमध्ये बसवले व खिलजीला भेटीचा होकार कळवला. पालख्या वाहण्यासाठीही शूर योद्ध्यांची व्यवस्था केली. पुढे राणीने राणा रतनसिंह यांची भेट घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. परवानगी मिळाल्यावर  पालख्यांमधील सैनिकांनी  वेढा घातलेल्या  अल्लाउद्दीनची सेना कापून काढली. राणा रतनसिंह यांची सुटका करून बादल गडावर पोहोचण्यात यशस्वी झाला, मात्र गोरा वीरगतीस प्राप्त झाले. 


मूठभर सैनिकांनी दिल्लीच्या सुलतानाच्या तावडीतून रतनसिंह यांना मुक्त केले हे अभिमानी खिलजीच्या  शक्तीला आव्हान देण्यासारखे होते. प्रचंड चिडलेल्या व पद्मिनीच्या सौंदर्याने कामांध झालेल्या अल्लाउद्दीनने आक्रमण केले. आपल्या स्वाभिमानाचे व शीलाचे रक्षण करण्यासाठी समस्त  राजपूत विनाअट एकत्र आले. खिलजीने चित्तोडगडास सुमारे सहा महिने वेढा दिला. राजपुतांनी आपल्या शौर्याची पराकाष्ठा केली. रावल रत्नसिंह धारातीर्थी पडल्यावर लक्ष्मणसिंह यांनी नेतृत्व करत शत्रूचा प्रतिकार केला. मातृभूमीच्या रक्षणार्थ पेटलेल्या यज्ञकुंडात लक्ष्मणसिंह व त्यांच्या सातही पुत्रांची अाहुती पडली. आपल्या पतीने रणात जाऊन मरावे व आपण विधवा होऊन म्लेंच्छ विटंबनेस पात्र व्हावे ही गोष्ट राजपूत स्त्रियांना रुचणे शक्यच नव्हते.  


२६ ऑगस्ट १३०३ रोजी राणी पद्मिनीसह १५ हजार स्त्रिया चित्तोडगडावर एकत्र जमल्या. सर्वांनी मंगल वस्त्रे परिधान केली. सर्व जणी राणी पद्मिनीच्या सभोवताली बसून सौभाग्याची मंगलगीते गात तमाम भारतीय स्त्रीत्वाच्या शीलाचे रक्षण व सन्मान करण्याच्या उद्देशाने अग्नी प्रज्वलित करून १५ हजार स्त्रियांनी अग्निशरण म्हणजेच जौहर केला. हा चित्तोडचा पहिला शाका. स्त्रियांचा जौहर झाल्यावर राजपूत वीर भगवान एकलिंगजींचा जयघोष करीत शत्रूवर तुटून पडले. जिकडे तिकडे प्रेतांचा खच पडलेला होता. दगड, विटा, माती यांनी भरलेला तो निर्जीव गड, राखेचा ढिगारा  व १५ हजार स्त्रियांच्या जौहरचे ते भयंकर दृश्य पाहून अल्लाउद्दीनचे काळीज थरारले. या घटनेचा तमाम भारतीय  जनतेवर काय परिणाम झाला असेल याचा अंदाज आपणास येऊ शकतो. ज्या पवित्र स्त्रियांनी नीच पुरुषाची आपणावर दृष्टीही पडू नये म्हणून बलिदान दिले त्यांच्याबद्दल भारतीय जनमानसांच्या हृदयात काय भावना असतील याचे भान राखले पाहिजे असे मला वाटते. 

 

आजपर्यंत पाच मोठे जौहर (शाका) झाल्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात आढळतो. यात चित्तोडगडावरील तीन जौहर व जैसलमेरच्या दोन जौहरांचा उल्लेख येतो. क्षत्रियांच्या जौहरांची मीमांसा केली असता असे लक्षात येते की, आपल्या राज्यावर जबरदस्त परकीय आक्रमण झाले असता तसेच ज्या आक्रमकाने नीतिमत्तेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत; जो कामांध, विकृत, अत्याचारी व स्त्रियांना गुलाम करणारा असेल अशा आक्रमकाच्या हल्ल्यावेळी गडावरील राजस्त्रिया व त्यांच्यासह इतर अनेक स्त्रिया ज्या आश्रयार्थ असतील त्यांचे अंतःपर संरक्षण अशक्य असल्याचे दिसून आले असता राजपूत स्त्रिया सामुदायिक रीतीने लाक्षागृहात किंवा एखाद्या गृहात बसून कर्पूर, राळ, चंदन अशा ज्वालाग्राही पदार्थांसह स्वतःला जाळून घेत असत. आपल्या माता-भगिनी-भार्यांचे बलिदान पाहून राजपूत वीरसुद्धा ‘देहं न पातयेत कार्यं वा साधयेत’ या निश्चयाने बेभान होऊन मरणाची भीती न बाळगता शत्रूवर तुटून पडत.
- रामचंद्र पाटील, इतिहास अभ्यासक

बातम्या आणखी आहेत...