आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाज बदलला तसा शिक्षकही बदलला...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या घडीला ‘शिक्षण’ हा समाजाच्या ऐरणीवरचा विषय आहे. बुद्धिजीवींकडून सुरू झालेली या विषयावरची चर्चा समाजाच्या सर्वसामान्य स्तरांकडे पाझरू लागली आहे. या संपूर्ण चर्चेचा रोख लक्षात घेता असे स्पष्टपणे जाणवते की, आजच्या शिक्षण व्यवस्थेविषयी कुणीही समाधान व्यक्त करणारं, सकारात्मक असं बोलत नाही. शिक्षण व्यवस्थेत अराजकाची, गोंधळाची स्थिती असून ती भ्रष्ट, अकार्यक्षम झालेली आहे. आजचा शिक्षक स्थितिशील व बनचुका बनला असून शिक्षण क्षेत्रात काहीही आलबेल नाही, प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत कमालीची अनागोंदी माजलेली आहे, असाच सूर ऐकू येतो. शिक्षण क्षेत्रातलं वास्तव विदारक-भीषण असून शिक्षण व्यवस्था किडली आहे, भ्रष्ट-अकार्यक्षम झाली आहे, कुचकामी झाली आहे, शिक्षक बनचुका बनला आहे, असे जे लोक म्हणतात ते हे विसरत असतात की, ते शिक्षण व्यवस्थेचा विचार हा खूप सुटासुटा व स्वतंत्रपणे करत आहेत. वास्तवातल्या सगळ्या कार्यरत व्यवस्थांमधून तिला अलगद बाजूला काढून तिच्यावर दोषारोपण करत आहेत. खरे तर व्यवस्थांची गुंतागुंत ही इतकी जटिल असते की, कोणत्याही व्यवस्थेला या जटिल गुंतागुंतीतून वेगळे करणे, सुटे करणे केवळ अशक्य असते. सगळ्या व्यवस्थांचे प्रभाव हे एकमेकींवर पडत असतात आणि त्यांना आत आत जोडून ठेवणारा जो एक चिवट धागा असतो, तो मानवी विचार आणि वर्तनाशी सांधला गेलेला असतो. याचाच अर्थ हा की, व्यक्तीचे विचार-आचार हे एका व्यवस्थेसाठी वेगळे आणि दुस-या व्यवस्थेसाठी वेगळे, असे कधीही घडत नाही. शिक्षण व्यवस्था आज किडकी, भ्रष्ट, अकार्यक्षम आणि कुचकामी झाली आहे, असे म्हणताना समाजातल्या इतर व्यवस्था मात्र अतिशय निकोप, निरोगी, स्वच्छपणे कार्यक्षम आहेत. शिक्षण व्यवस्थेत असलेली अराजक, गोंधळाची अवस्था, अनागोंदी आणि दुरवस्था त्यांच्यात नाही, असे आपण म्हणू शकतो का? मला वाटते, असे म्हणण्याचे धाडस करणारा कुणीही बुद्धिजीवी विचारवंत आज शोधून सापडणार नाही. म्हणजेच बिघाड नुसता शिक्षण व्यवस्थेतच नाही तर तो सर्व क्षेत्रांमध्ये सारख्याच पद्धतीने झालेला आहे, घडून आलेला आहे.
खरे म्हणजे शिक्षणाकडे आपण इतर क्षेत्रांपेक्षा जरा जास्त आस्थेने आणि संवेदनशीलतेने बघतो. इतर क्षेत्रांविषयी, व्यवस्थांविषयी आपण फारसे जागरूक, दक्ष असत नाही. मात्र, शिक्षणाविषयीची आपली आस्था लगेच जागृत होत असते आणि त्यामुळेच इतर क्षेत्रांमधला बिघाड आपण निर्ढावल्या मनाने स्वीकारतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो; परंतु शिक्षणाविषयी तसे घडत नाही. सारे काही बिघडले तरी चालेल, पण शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र मात्र बिघडता कामा नये, असेच आपल्याला वाटत असते आणि त्यामुळे शिक्षण व्यवस्थेचा विचार स्वतंत्रपणे, सुटेपणाने करणे आपल्याला गैर वाटत नाही; उलट गरजेचे व महत्त्वाचे वाटते.
जेव्हा सर्वच आघाड्यांवर आणि पातळ्यांवर जगणे भ्रष्ट होते, नीतिमूल्यांची चाड बाळगण्याइतकीही जीवनात शुद्धता उरत नाही तेव्हा संभ्रमाची, द्वंद्वाची, दिशाहीन अवस्था सर्वच घटकांच्या वाट्यास येत असते. विवेक शाबूत असतो, पण त्यालाही एक प्रकारची बधिरता प्राप्त होते. अशा बिकट अवस्थेत जो तो दुस-याकडे बोट दाखवण्यातच धन्यता मानत असतो. जे घडते आहे त्यापासून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत असतो. अशी आत्मवंचना करून घेण्यात कुणालाही काही वावगे वाटत नाही. कारण परिस्थितीचा बिघाड इतका विकोपाला गेलेला असतो की, त्याची जबाबदारी व उत्तरदायित्व कुणावर लादावे याविषयीही निश्चित निर्णय घेता येत नाही. ही संभ्रमावस्था, द्विधावस्था वैयक्तिक आणि सामुदायिक पातळीवरही सारखीच असते. अशा वेळी त्या त्या व्यवस्थेत प्रत्यक्ष कार्यप्रवण असणारा जो दृश्य घटक असतो, त्याला जबाबदार धरणे सर्वांसाठी सोयीचे असते. म्हणजे, शिक्षण व्यवस्थेच्या दुरवस्थेला शिक्षकाला जबाबदार धरणे जितके सोपे तितकेच शिक्षण व्यवस्थेतील इतर जे अदृश्य, अप्रत्यक्ष कृतिप्रवण असणारे जबाबदार घटक आहेत, त्यांना जबाबदार धरणे सोपे नाही. कारण या घटकांची कृतिप्रवणता आणि व्यवस्थेतला हस्तक्षेप हा आपल्या नजरेसमोर मूर्त स्वरूपात नसतो. आपल्यासमोर शिक्षक असतो, विद्यार्थी असतो आणि शिक्षणाची दुरवस्था तेवढी असते. आपण त्यांचा सरळ परस्परसंबंध जोडून आणि शिक्षकाच्या माथ्यावर खापर फोडून मोकळे होतो. व्यवस्थेच्या खोलात शिरून विचार करण्याची आपल्याला गरज वाटत नाही.
याच मुद्द्याचा थोडा काळाच्या उदरात शिरून विचार करू. 30/35 वर्षांपूर्वी म्हणजे आज माझ्या वयाचे चाळिशी ओलांडलेले जे आहेत, ते प्राथमिक शिक्षण घेत होते तेव्हा केवळ इयत्ता सातवी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची पिढी आपल्याच महाराष्‍ट्रात अध्यापनाचे कार्य निष्ठेने व सचोटीने करत होती व त्यांच्या हातून गुणवत्तापूर्ण पिढ्या घडत होत्या. शिक्षणाचा प्रचार व प्रसार आजच्याइतका झपाट्याने, वेगाने झालेला नसला तरी जे शिकत होते त्यांच्या गुणवत्तेवर आजच्यासारखे प्रश्नचिन्ह नव्हते. आजच्यासारखी तीव्र स्पर्धा नव्हती. परंतु परीक्षांचा दर्जा निश्चितच चांगला होता. व्यवस्थेत अपप्रवृत्तींचा, वाममार्गांचा शिरकाव झालेला नव्हता. शिकण्याची व शिकवण्याचीही ओढ होती, तळमळ होती. शिक्षकांना समाजात आदर होता, सन्मान होता आणि शिक्षकांच्याही मनात समाजाविषयी कळकळ होती. वातावरण परस्परविश्वासाचे, सौहार्दाचे होते. आज निष्ठा, सचोटी, ओढ, तळमळ, विश्वास काही एक उरले नाही. त्यांची जागा स्पर्धा, पैसा, आत्मकेंद्रितता, स्वार्थ, अविश्वास, तुच्छता अशा गोष्टींनी घेतली आहे. हे सर्व एकाएकी झाले का? निश्चितच नाही. हळूहळू सगळे बदलत गेले. समाज बदलला तसा शिक्षकही बदलला. समाजाची दृष्टी बदलली, तशी शिक्षकाचीही बदलत गेली. पडू नये ते अंतर पडत गेले. मूल्यांची ही अदलाबदल सहजासहजी होत नसते. त्यामागे काळाचाही काही एक भाग असतो. मूल्यांचा बदल हा एखाददुस-या घटकालाच बाधित करत नाही, तर तो संपूर्ण मानवी जगण्यालाच बाधित, प्रभावित करत असतो.