आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रवादीची डॅमेज इमेज सुधारण्याचे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा 2014 च्या निवडणुकीच्या लग्नमांडवासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून घोड्यावर स्वार होत अजित पवार उभ्या महाराष्‍ट्रात दौड मारत आहेत, मी बोलतो तसा करतो, .. तर पवारांची औलाद सांगणार नाही,..चालू देणार नाही अशी रोखठोक शब्दफेक करत विरोधकांबरोबरच जिथं त्यांना गरजेचं वाटतं तिथं स्वकीयांचाही बंदोबस्त करत असताना दुसरीकडे राष्‍ट्रवादीचे अनेक मंत्री आणि घोटाळे यांचे समीकरण दिवसेंदिवस दृढ होत चालल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचं प्रकरण चव्हाट्यावर आलं आणि लगेच कुठल्या धरणाची किंमत कशी वाढवली, कुठं सिमेंट टाकलं नाही, कुठं नालाच केला नाही याचं यथार्थ दर्शन राज्यभरातल्या नागरिकांना घरबसल्या दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या माध्यमातून होऊ लागलं. सगळे आकडे ऐकून अनेकांनी आकडेमोडच बंद केली म्हणे. हे सगळं पाप अजित पवार आणि पाठोपाठ सुनील तटकरेंचं आहे, असा हल्लाबोल करण्यात येऊ लागला.
अशातच तटकरेंनी किती वेगवेगळ्या नावांनी कंपन्या स्थापन केल्या आणि पैसा हडप केला याची रसभरित वर्णनं सुरू झाली. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी महाराष्‍ट्र सदनच्या कामात ढपला पाडल्याचं प्रकरण पुढं आलं, आर. आर. पाटील यांच्या गृहखात्याचा राज्यभर किती दरारा आहे हे तर देशभर माहीत झालं आहे. इथं पोलिसच महिला कॉन्स्टेबलचं लैंगिक शोषण करताहेत असं चित्र काही घटनांतून पुढं आलं आहे. माझी ऐपत नाही, परंतु कराडच्या शहा यांनी मित्रत्वाच्या संबंधातून आपल्या घरच्या लग्नासाठी खर्च केल्याचं जाहीरपणे भास्कर जाधव सांगतात आणि त्याचं अजित पवार समर्थन करतात हे ही खटकण्याजोगं आहे.
अनेक जिल्हा बँका, सहकारी साखर कारखाने आणि सहकारी संस्था या राष्‍ट्रवादीच्याच ताब्यात असल्याने त्यांची अधोगती किंवा प्रगती या सगळ्याची जबाबदारी त्यांच्यावरच येते. परंतु बहुतांशी घोटाळे आणि वादग्रस्त प्रकरणे राष्‍ट्रवादीच्या नेत्यांशी संंबंधित बाहेर येत आहेत ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ काँग्रेसवाले आणि सर्व विरोधक धुतल्या तांदळासारखे आहेत असा होत नाही. बहुतांश नेत्यांनी जिथं तिथं जमेल तसा हात मारून घेतलाच आहे; परंतु सध्या तरी राष्‍ट्रवादीच्या नेत्यांची प्रकरणे पक्षाला बदनाम करत आहेत, हे नाकारून चालणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीची अजित पवार यांनी ज्या पद्धतीने जोडणी सुरू केली आहे ते पाहता साम-दाम-दंड-भेद यासह सर्व नीती अवलंबून राष्‍ट्रवादीचे जादा आमदार निवडून आणण्यासाठी धाकटे पवार कामाला लागले आहेत.
म्हणूनच राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राजू शेट्टी, गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवार यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केवळ धडाडीने निर्णय घेत पुढे जात असताना सगळ्या बदनामांचे नेते म्हणून आपल्यावर शिक्का बसू नये याची दक्षता घेत, चुकीचं करणार्‍यांना पाठीशी घालणार्‍यांचा पक्ष अशी प्रतिमा बदलण्याचे आव्हान राष्‍ट्रवादीला म्हणजेच मोठ्या पवार साहेबांनाही स्वीकारावे लागणार आहे.