आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravindra Lakhade Editorial About Com. AB Bardhan, Divya Marathi

सर्वहारांच्या हितरक्षणासाठी लढणारा बापमाणूस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेट्रोलची भाववाढ, सिलिंडरची महागाई बड्या उद्योगांचे खासगीकरण रोखणाऱ्या कॉ. ए. बी. बर्धन यांनी देशाला मग्रारोहयो आणि अन्न सुरक्षेचा कायदा दिला. कामगारांच्या अहितकारी निर्णयांवर नेहमी कोरडे ओढले. त्यासाठी काँग्रेस सरकारला दोष देण्यासही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही.

कामगार विश्वाला समृद्ध करण्यासाठी आजन्म लढणारा एक कलंदर नेता काळाच्या पडद्याआड गेला; लढण्याची प्रचंड ऊर्मी असलेल्या अर्धेन्दूभूषण बर्धन यांनी खऱ्या अर्थाने मृत्यूशीही संघर्ष केला. ‘लाल सलाम’ म्हणणारा त्यांचा खडा आवाज तेवढ्याच कणखरपणे परत यावा, अशीच सर्वांची अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही.

लठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी हे व्रत स्वीकारले होते. त्यांनी ठरवले असते तर विद्वत्ता आणि धैर्याच्या बळावर देश-परदेशात कोणतीही मोठी नोकरी करता आली असती. तशा ऑफरही त्यांच्या पुढ्यात होत्या; परंतु सर्वहारा वर्गाच्या भल्याचा मार्क्सने सांगितलेला िवचार सतत जागृत ठेवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले आणि शेवटी पक्ष कार्यालय हेच स्वत:चे घर तेथील मंडळी म्हणजेच आपला संपूर्ण गोतावळा मानणाऱ्या या नेत्याने तेथेच अखेरचा श्वास घेतला. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) या देशपातळीवरील कामगार चळवळीचे ते खंदे पुढारी होते. अनेक वर्षे त्यांनी या संघटनेचे अध्यक्षपद सांभाळले. त्याच वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष या राजकीय संस्थेच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारीही सांभाळली. त्यामुळे एकाच वेळी कामगार, कष्टकरी, शेतकरी-शेतमजूर आणि सर्वसामान्यांचा लढा सांभाळण्याचे काम ते करत होते.

केंद्रात कधी काळी भाकपचे दोन मंत्री होते. इंद्रजित गुप्ता गृहमंत्री आणि चतुरानन मिश्र कृषिमंत्री. त्या वेळी अमरावती भागातील संत्रा उत्पादकांच्या अडचणी सुटाव्यात म्हणून मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे संत्रा उत्पादक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. िमश्र त्या ठिकाणी आले; परंतु ते मंत्री असले तरी कम्युनिस्ट िशस्तीनुसार पक्षाचा पुढारी म्हणून बर्धन यांनाच ज्येष्ठतेचा मान होता. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी अमरावतीचे काही पत्रकार नेरपिंगळाईला गेले. त्यात मीही होतो. नेरचे त्या वेळचे सरपंच अण्णासाहेब घाटगे यांच्या घरी बर्धन आम्हाला भेटणार होते. त्यांच्या िनर्देशानुसार दुपारच्या जेवणाच्या वेळी संवाद साधायचे ठरले. आम्हाला वाटले, नाही सोफा तर िनदान खुर्च्यांवर बसून तरी ते आमच्याशी बोलतील. पण िवचाराने जेवढा मोठा प्रगल्भ, वागण्याने तेवढाच हा माणूस अतिशय साधा होता. बर्धन यांनी चक्क ओसरीतील चटईवर फतकल मांडली बोलू लागले. पत्रकारांना ही बाब वेगळा अनुभव देऊन गेली. त्यांनी इतरही पक्षांचे बडे नेते पाहिले होते. मात्र, बर्धन यांची सर त्यापैकी कुणालाही येत नाही, हा त्यांचा त्या वेळचा निष्कर्ष होता.

बर्धन हे मूळचे नागपूरचे. त्यामुळे िवदर्भावर त्यांचा भारी जीव. या भागात आले की चंद्रपूरपासून ते बुलडाण्यापर्यंत जमेल तेवढ्या िजल्ह्यांना भेटी द्यायच्या. कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करायची. पक्ष बांधणी कशी सुरू आहे. पक्ष वाङ््मयाचा वापर होतोय की नाही, कामगार चळवळ वाढत आहे की नाही, पक्षातील जुन्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची सक्रियता आहे किंवा नाही, हे त्यांच्या दौऱ्याचे िवषय असत. त्यांनी आपल्या कार्यकाळात वीज कामगारांची बलाढ्य संघटना उभी केली. बँका, एलआयसी, रेल्वे मजदूर, खाण कामगार, देशभरातील असंघटित कामगार यांच्या युनियन बांधल्या. कामगारांचा हा लढा केवळ देशापुरताच मर्यादित राहू नये म्हणून त्यांनी परदेशातील कामगार संघटनांशी सख्य ठेवले. कामगारांच्या अहितकारी िनर्णयांवर नेहमी कोरडे ओढले. त्यासाठी स्वत:च्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या काँग्रेस सरकारला दोष देण्यासही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. देशहिताला सर्वोपरी मानणाऱ्या या नेत्याने एकेकाळी सत्तेचा बळी दिला; पण अहितकारक अणुकरार हाणून पाडलाच, हे अख्ख्या देशवासीयांना माहीत आहे. आपल्या सत्ताकाळात पेट्रोलची भाववाढ, िसलिंडरची महागाई बड्या उद्योगांचे खासगीकरण रोखणाऱ्या या नेत्याने देशाला मग्रारोहयो आणि अन्न सुरक्षेचा कायदा िदला. त्याची फळे आजही आम्ही चाखतो आहोत.
अमरावतीत रेल्वेस्टेशन चौकस्थित ऊर्जा भवन हे त्यांच्या थांबण्याचे हक्काचे ठिकाण. मग प्रसंग पत्रकार परिषदेचा असो की कुणाला भेटण्याचा, बर्धन यांचा संवाद येथूनच पुढे जायचा. जेवणाची वेळ झाली की कॉ. पी. बी. उके आणि तुकाराम भस्मे यांच्यासोबत गप्पा करत पायीच ही स्वारी इगल हॉटेलमध्ये जायची. कधी पाठीमागे हात बांधून त्यांची पावले पुढे जायची, तर कधी इन म्हणून पँटमध्ये खोचलेला सदरा स्पष्ट दिसावा आणि खोचलेल्या बाह्याही पाहणाऱ्याच्या लक्षात याव्यात, असे त्यांचे मार्गक्रमण असायचे. बर्धन गेल्यानंतर देशभर होत असलेली त्यांच्याबद्दलची चर्चा ऐकून-पाहून कदाचित त्या हॉटेलवाल्याचाही िवश्वास बसणार नाही की एवढी मोठी व्यक्ती आपल्याकडे कधी तरी जेवायला यायची म्हणून; असो. ऊन, वारा, पाऊस, आरोग्य, िनसर्गाची कृपा-अवकृपा याची कधीही त्यांनी तमा बाळगली नाही. मला आठवते, १९९५-९६च्या भाकपच्या राज्य अधिवेशनानिमित्त ते अमरावतीत होते. महेश भवन येथे हा दोनदवसीय कार्यक्रम ठरला होता. परंपरेनुसार अधिवेशनाच्या उद््घाटनानंतर राज्यभरातून आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांची फेरी िनघाली. महेश भवन ते राजकमल चौक असा फेरीचा मार्ग होता. मध्येच पावसाने हजेरी लावली. पुढाऱ्यांसह सर्व जण चिंब भिजले; पण बर्धनांनी छत्री बोलावली नाही. रॅली संपेपर्यंत ते लाल झेंड्याचा जयजयकार करत पुढे चालत राहिले.
बर्धन यांचे व्यक्तिमत्त्वच अनेकांसाठी पितृछत्र ठरले. कॉम्रेड उके तर त्यांचा उल्लेख बाप म्हणूनच करायचे. ते दौऱ्यावर असले की भाकर-भाजी आणि त्यांना आवडणाऱ्या साध्या जेवणाची तयारी उके स्वत:च करून घेत. शेजारच्या िववेकानंद इन्स्टिट्यूटचे संचालक कॉम्रेड गोविंदसिंह चंदेल आणि आणखी काही समवयस्क ‘लाल’भाई हे बर्धनांचे खास सोबती. गल्लीतील राजकारणापासून ते जगाच्या राजकारणाच्या बाता या ठिकाणी रंगायच्या. एका अर्थाने अमरावतीच्या या ऊर्जा भवनात खऱ्या अर्थाने ऊर्जा भरण्याचे काम बर्धन यांनी आपल्या हयातीत तंतोतंत केले. प्रवास कोणताही असो, साधी अरमाडा गाडी (देशकर यांना वेकोलीच्या कामगारांनी िदली, ती) िकंवा साध्या दर्जाची टॅक्सी याशिवाय तिसरे वाहन त्यांनी कधीही पाहिले नाही. रेस्ट हाऊस संस्कृतीला त्यांनी अखेरपर्यंत नाकारले. कार्यकर्त्याचे घर किंवा पक्षाचे कार्यालय हेच आपले नंदनवन हा िवचार त्यांनी कृतीपूर्वक रुजवला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे सुभाषित त्यांना तंतोतंत लागू पडते.