आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भाच्या राजकारणात सग्यासोय-यांचा बोलबाला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरीच मिळते राजकारणाचे बाळकडू :
राजकारण हे सेवेचे आणि समाजकारणाचे माध्यम आहे असे म्हणण्याचे दिवस केव्हाच इतिहासजमा झाले. आता राजकारण हा एक पिढीजात व्यवसाय झाला आहे. नेत्यांच्या मुलांना ते वारसाहक्काने मिळते. मुलांना नाही मिळाले तर त्यांच्या कुटुंबातील मुलगी, सून, पत्नी, भाचा वा पुतण्याला तिकीट मिळते. पण कुठल्याही परिस्थितीत घरातील सत्ता बाहेर जाऊ नये यासाठी नेते जिवाचे रान करतात. त्यांची स्वत:ची घराणेशाही निर्माण होते.


केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे, गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे, राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांची दोन्ही मुले नीलेश व नितेश, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा अमित, माजी खासदार पुंडलिकराव गवळी यांच्या कन्या भावना राजकारणात नाव कमावत आहे. वनमंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाचा सत्यजित तांबे सरचिटणीस आहे. संपूर्ण महाराष्‍ट्रात कुणी ना कुणी आपला मुलगा, मुलगी, सून, पत्नी वा नातेवाइकाला राजकारणाच्या आखाड्यात उतरवले आहे. माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांचे सुपुत्र रावसाहेब शेखावत हे सध्या आमदार आहेत.


विदर्भातही मुलांचे राजकारण :
वारसदारांना राजकारणात आणण्याच्या बाबतीत विदर्भाने अनुशेष भरून काढल्याचे दिसते. काँग्रेसचे माजी मंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे सुपुत्र आशिष देशमुख सध्या भाजपत युवा नेते आहेत. सध्या ते विदर्भाच्या आंदोलनात सक्रिय आहे. सुनील केदार हे दिवंगत सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांचे सुपुत्र आहेत. आर्वीचे आमदार राहिलेले शरद काळे यांचे चिरंजीव अमर काळे हेही एकदा आमदार म्हणून निवडून आले होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख, रोहयो मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत सक्रिय आहेत.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार दत्ता मेघे यांची सागर व समीर ही दोन्ही मुले राजकारणात आहे. सागर मेघे पूर्वी भाजपचे विधान परिषद सदस्य होते. लहाने चिरंजीव समीर मेघे शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस आहे, तर खासदार विलास मुत्तेमवार हे विशाल मुत्तेमवारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत विशाल मुत्तेमवारांसाठी दक्षिण नागपूर विधानसभेचे तिकीट मागण्यांचे त्यांचे मनसुबे लपून राहिलेले नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे चिरंजीव राहुल ठाकरे हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहून चुकले. अन्न व औषधी द्रव्ये प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांचे सुपुत्र ययाती नाईक हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.
पुतण्यांचे राज्य :
महाराष्‍ट्राच्या राजकारणात पुतण्यांची नेहमीच चलती राहिली. सध्याचे सर्वात चर्चित पुतणे म्हणजे धनंजय मुंडे. ते राष्टÑवादीचे विधान परिषद सदस्य झाले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे, राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे पंकज भुजबळ हे सध्या राजकारण गाजवत आहे. दिवंगत मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांचे पुतणे निलय नाईक हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.


यांचीही मुले राजकारणात :
वाशीम जिल्ह्यात झनकांची तिसरी पिढी राजकारणात आहे. सध्या सुभाष झनक हे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे. त्यांचे वडील अ‍ॅड. रामराव झनक हेही चार वेळा आमदार होते. आमदार सुभाष झनक यांचे चिरंजीव अमित झनक हे अकोला लोकसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहे. माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांचे चिरंजीव चंद्रकांत ठाकरे हे वाशीम जिल्हा परिषदेत सभापती आहे. आमदार लखन मलिक यांचा मुलगा नितेश मलिक वाशीम जिल्हा परिषद सदस्य आहे. कारंजाचे आमदार प्रकाश डहाके यांच्या मातोश्रीही आमदार होत्या. वाशीम काँग्रेसमधील बडे प्रस्थ म्हणजे माजी खासदार अनंतराव देशमुख. त्यांचे चिरंजीव नकुल देशमुख हे सध्या अकोला लोकसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.


यवतमाळ जिल्ह्यात सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव जितेंद्र हे वडिलांच्या मतदारसंघात लक्ष घालतात. आमदार वामनराव कासावार यांचे सुपुत्र राजू कासावार हे वणी विधानसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे. उमरखेडचे आमदार विजयराव खडसे यांचे सुपुत्र प्रज्ञानंद खडसे युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहे. आमदार नीलेश पारवेकर यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.


वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचे चिरंजीव शेखर शेंडे हे 2009 ची विधानसभा निवडणूक लढले. दुसरे सुपुत्र आकाश शेंडे हे वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष होते. नुकताच त्यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाला. आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख हे राष्टÑवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.
चंदÑपूर येथे माजी मंत्री वामनराव गड्डमवार यांचे चिरंजीव संदीप गड्डमवार हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहे. खासदार नरेश पुंगलिया यांचे सुपुत्र राहुल पुगलिया हेही सक्रिय राजकारणात आहे. बल्लारपूर येथून ते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात लढले होते.


अकोला येथे माजी आमदार बाबासाहेब धाबेकर यांचे चिरंजीव सुनील धाबेकर हे जिल्हा परिषद सदस्य आहे, तर माजी मंत्री अजहर हुसेन यांचे चिरंजीव डॉ. जिशान हुसेन हे एकदा नगरसेवक पदाची निवडणूक लढले. सध्या ते युवक काँग्रेसचे काम करतात. माजी मंत्री अरुण दिवेकर यांचे चिरंजीव निखिलेश दिवेकर, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांचे सुपुत्र प्रकाश तायडे हेही राजकारणात नशीब आजमावत आहेत. निखिलेश दिवेकर हे अकोला महापालिकेचे उपमहापौरही राहिले. आता बोला कार्यकर्त्यांनी राजकारणात पदाची अपेक्षा ठेवायची का नको.