आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाम पत्रकारांचा वर्ग घेतात तेव्हा... मुरलेले पत्रकारही झाले होते अवाक्

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१३ वर्षांपूर्वीची गोष्ट म्हणजे २००२ मधील गोष्ट. नवी दिल्लीतील संसद भवनाजवळील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे दुपारी एका खास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही पत्रकार परिषद होती तेव्हा केंद्रात सत्तेत असलेल्या एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची.

कलामांसारख्या जगविख्यात शास्त्रज्ञाला आणि भारतरत्नाने अलंकृत थोर व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी जाहीर करून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मास्टरस्ट्रोक मारला होता. काँग्रेसने कलाम यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याने निवडणूक केवळ आैपचारिकता होती. डाव्या पक्षांनी कलाम यांच्या विरोधात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील सेनानी कॅप्टन लक्ष्मी सहगल यांना रिंगणात उतरवले होते. त्यामुळे निवडणूक अटळ होती. एनडीएकडून या निवडणुकीसाठी राजकीय व्यवस्थापन करण्याची जबाबदारी प्रमोद महाजन यांच्यावर देण्यात आली होती. महाजन हे कलामांना घेऊन पत्रकार परिषदेच्या सभागृहात पोहोचले. बहुसंख्य राजकीय पत्रकार कलामांना पहिल्यांदाच भेटत होते. त्यांच्या पत्रकार परिषदेला पहिल्यांदाच सर्वांनी उपस्थिती लावली होती.

पत्रकार परिषदेस संबोधित करणारी व्यक्ती आपल्या निवेदनानंतर प्रश्नांना एकापाठोपाठ एक अशी उत्तरे देत असते, ही नेहमीची पद्धत. मात्र अवलिया व्यक्तिमत्त्वाच्या कलामांमधील शिक्षक तेव्हा जागा झाला.. महाजन यंानी त्यांची ओळख करून दिली आणि आपले निवेदन सुरू करण्यापूर्वीच कलामांनी पत्रकारांना ते कोणते प्रश्न विचारणार आहेत, याची विचारणा केली. पत्रकारांनी त्यांना लाख समजावून पाहिले की तुम्ही आधी निवेदन करा आणि नंतर एकापाठोपाठ एक प्रश्न विचारले जातील. मात्र प्रसन्न चेह-याच्या, वडीलधा-या व्यक्तिमत्त्वाच्या आदरयुक्त धाकाने अखेर त्यांनी सर्व पत्रकारांना पत्रपरिषद सुरू होण्यापूर्वीच आपले प्रश्न सांगायला भाग पाडले. पत्रकारांनी प्रश्न सांगायचे आणि कलाम आपल्या नोंदवहीत ते स्वत: लिहून घ्यायचे..हा प्रकार किमान १० मिनिटे चालला.

डॉ. कलाम हे संशोधक असल्याने त्यांना राज्यघटना माहीत नसेल, राजकारण समजत नसेल अशी समजूत असलेल्या पत्रकारांनी त्यांच्यावर अनेक अडचणीच्या प्रश्नांचा भडिमार केला होता. २००२ च्या गुजरात दंगलीनंतर एका मुस्लिमाला राष्ट्रपती केले जात असल्याने ही दंगल, त्यावर नियंत्रणासाठी केले गेलेले प्रयत्न समाधानकारक होते का, कलाम हे राष्ट्रपती झाल्यावर दंगलपीडितांना न्याय कसे मिळवून देतील? ते राष्ट्रपती झाल्यावर अशी दंगल उसळली तर त्यांची काय भूमिका काय असेल? धर्मनिरपेक्षता आणि राममंदिर प्रकरणी त्यांची काय भूमिका असेल? भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची जबाबदारी ते कशी पार पाडतील? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार त्यांच्यावर करण्यात आला होता. कलामांची आपण कशी दांडी उडवली, या भ्रमात असलेल्या पत्रकारांचे विमान कलामांनी आपल्या अभ्यासपूर्ण व मुद्देसूद उत्तराने खालीच उतरले. त्यांनी एकेका प्रश्नाला शिक्षकाने उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना निरुत्तर करावे तसे पत्रकारांना निरुत्तर केले. कलामांनी पत्रकारांचाच असा वर्ग घेतला... उद्या राष्ट्रपती होणारी व्यक्ती इतक्या सहजपणे, विनम्रतेने आणि अभ्यासूपणे उत्तरे देते, हा अनुभवच सर्वांना आनंदित करणारा होता. त्यांची ही विनम्रता राष्ट्रपतिपदावर विराजमान झाल्यावरही कायम राहिली, हे विशेष.