आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत ‘रोबोट स्वयंवर’;पहिलाच प्रयोग, महिनाअखेरीस आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्राचीन काळात रामायण, महाभारतातील पौराणिक कथांमधील गाजलेले स्वयंवर आपण वाचले, दूरचित्रवाणी मालिकांमध्येही पाहिले. आता आधुनिक युगात शक्ती, युक्ती आणि क्षमतेमध्ये मानवालाही मागे टाकू पाहणार्‍या दोन रोबोटचे स्वयंवर अमरावतीमध्ये पाहावयास मिळणार आहे. विदर्भ यूथ वेल्फेअर सोसायटीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘टेक्नो एक्स्पर्ट २०१५’ हा राष्ट्रीय तांत्रिक महोत्सव फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. या महोत्सवाच्या समारोपात दोन अव्वल ठरणार्‍या रोबोटचे थाटात स्वयंवर लावण्यात येईल.

देशभरातील रोबोटचा सहभाग : अमरावतीतील अंजनगाव बारी रोडवर प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर (बडनेरा) येथे हा तंत्र महोत्सव होत असून देशभरातील अभियांत्रिकीच्या विविध संस्था, महाविद्यालयांत यांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी व तज्ज्ञांनी तयार केलेले आधुनिक रोबोट या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

असे निवडणार वधू-वर रोबोट
रोबोवॉर, रोबोटास्क, ऑन स्पॉट मॉडेल मेकिंग अशा रोबोटच्या विविध स्पर्धा महोत्सवात होत आहेत. यात उत्कृष्ट ठरणार्‍या दोन रोबोट्सना प्रातिनिधिक स्वरूपात स्त्री व पुरुष रोबोट मानून त्यांचा स्वयंवराचा सोहळा होईल. हे रोबो चक्क एकमेकांना हारही घालणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. धांदे यांनी दिली.

२० लाखांचा खर्च अपेक्षित
अभियांत्रिकीचे शोधनिबंध सादरीकरणही या वेळी होणार आहे. यापैकी पहिल्या उत्कृष्ट पंचवीस शोधनिबंधांना प्रसिद्धी देण्यात येईल. देशभरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उत्सव खुला आहे. उत्सवासाठी २० लाख रुपये खर्च अपेक्षित असून ६ लाख रुपयांची बक्षिसे वितरित केली जातील.

रोबोटचे अचाट विश्व...
- सध्या जगभरात रोबोटवर संशोधन. रोबोट तर जगाला परिचयाचे आहेत. मात्र, आता यात मानवी भावना असावी यासाठी संशोधक प्रयत्न करत आहेत.
- जपानमध्ये दांपत्यांचे पारंपरिक पद्धतीने विवाह लावणारे रोबोट प्रचलित.
- पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये आता एकटेपणात साथ देणार्‍या रोबोटसाठी प्रयत्न.
- कित्येक राष्ट्रांमध्ये महिला किंवा पुरुष तांत्रिकदृष्ट्या परिपक्व अशा रोबोटशी विवाह करू शकतील काय, यावर संशोधन सुरू आहे.
- तज्ज्ञांनुसार, २०५० पर्यंत संपूर्ण मानवी भावना असलेला रोबोट अस्तित्वात येईल. कदाचित तो जीवनसाथीही बनू शकेल.
रोबोकेजमध्ये रोबोवॉर : ‘टेक्नो एक्स्पर्ट २०१५’मधील रोबोट फेस्टिव्हलमध्ये ‘रोबोवॉर’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. अभियंत्यांनी तयार केलेले रोबोट स्पर्धेत सहभागी होतील. हे रोबोवॉर महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे.

दर्जेदार शिक्षणासाठी
विदर्भातील मुलांना तांत्रिक व इतर बाबतीत पुण्या-मुंबईला जाण्याची गरज भासू नये यासाठी संस्थेचा प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने असे तांत्रिक उत्सव घेण्यात येतात. यंदाचे रोबो स्वयंवर हे देशात पहिल्यांदा अमरावतीमध्ये होणार आहे. यानिमित्त विविध स्पर्धाही होतील. - डॉ. नितीन धांदे, अध्यक्ष, विदर्भ यूथ वेल्फेअर सोसायटी