आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनाविषयी: चाकोरीबाहेरचे विषय हाताळणारा नाटककार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंत कानेटकरांनंतरचे अत्यंत लोकप्रिय नाटककार अशीच शं.नां.ची ओळख मराठी रसिकांना आहे. परंपरा आणि नवतेचं अतिशय अद्भुत मिश्रण त्यांच्या नाट्यसंहितांमध्ये होते.परंपरेतील मूल्ये आणि आधुनिक काळातील समाजाला भेडसावणारे प्रश्न या दोन्हींची अतिशय सुरेख सांगड त्यांच्या नाटकात नेहमीच पाहण्यास मिळाली. अनेक चाकोरीबाहेरचे विषय त्यांनी हाताळले. उदाहरणच द्यायचे झाले तर ग्रँड रिडक्शन सेल या प्रायोगिक
रंगभूमीवर गाजलेल्या नाटकाचे देता येईल. हे नाटक महत्वाचे मानले जाते. मूल्यांचा आधुनिक काळात होत चाललेला -हास त्यांनी अतिशय समर्थपणे मांडला. गुंतता हृदय हे, सूर राहू दे, धुक्यात हरवली वाट या सारखी प्रचंड लोकप्रिय नाटकेही त्यांनी दिली.

नंदकुमार रावते आणि शं.नां.चे अतिशय सुंदर ट्युनिंग जमले होते. रावते यांना शं.नां.च्या लेखनातील बलस्थाने ठाऊक होती आणि रावते अतिशय दर्जेदार दिग्दर्शक. त्यांची दिग्दर्शनाची जातकुळीही वेगळीच होती. त्यामुळे या जोडगोळीची नाटके रसिकांना भावली. चित्रपट लेखनाच्या क्षेत्रातही शं.नां.नी ठसा उमटवला. त्यांनी लिहिलेला कळत नकळत हा कांचन नायक दिग्दर्शित आणि अश्विनी भावे, विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट गाजला. तू तिथे मी हा त्यांनी स्मिता तळवलकरांसाठी लिहिलेला चित्रपटही रसिकांच्या स्मरणात राहणारा आहे. त्यावरून हिंदीतील बागबान तयार झाला. डोंबिवलीत झालेल्या नाट्य संमेलनात अमिताभ बच्चन आले असताना स्मिता तळवलकरांनी त्यांची आणि शं.नां.ची ओळख करून दिली. बागवान चित्रपटाची मूळ संकल्पना यांचीच होती, असेही सांगितले. डोंबिवलीकरांचे शं.नां.वर प्रचंड प्रेम होते. इतके की इतर भाषिक नागरिकही आम्ही शं.नां.च्या घराजवळ राहतो, असा पत्ता सांगत होते, असा अनुभव मी घेतला आहे. त्यांच्या जाण्याने आपण एक चतुरस्त्र लेखक, प्रभावी वक्ताही गमावला आहे.