आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांची बदलतेय राजकीय दृष्टी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून तर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे युवा वर्ग. एकेकाळी राजकारणापासून दूर पळणारा हा युवा वर्ग आता राजकारणाकडे अधिक गांभीर्याने पाहताना दिसतोय. अण्णांच्या आंदोलनाला युवकांचा मिळालेला प्रतिसाद युवकांची बदलत चाललेली राजकीय दृष्टी दाखवणारा आहे, तर आम आदमी पार्टीला मिळालेले यश म्हणजे देशातील राजकीय बदलांची नांदी आहे.
पूर्वी राजकारण व राज्यकर्त्यांच्या नावाने बोट मोडणारा उच्च शिक्षित युवक आता आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरत आहेत. आपल्या मनातील चीड तो व्यक्त करायला लागला आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे, अण्णांच्या आंदोलनाने सर्वांच्या मनात चीड असलेल्या काही प्रश्नांना हात घातला. त्यामुळे अण्णांचे आंदोलन देशव्यापी झाले. महाविद्यालयीन युवक -युवती या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. मात्र, त्या वेळी युवावर्गाचे आंदोलन म्हणजे ‘मेणबत्ती संप्रदाय’ असल्याची टीकाही झाली. त्यानंतर केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने प्राप्त केलेल्या यशामुळे सर्वसामान्यांना काही जणांच्या राजकीय मक्तेदारीवर पर्याय निर्माण झाला असे वाटायला लागले आहे. त्यामुळेच दिल्लीत सत्तेत आलेल्या केजरीवालांच्या आम आदमी पार्टीच्या टोप्या घातलेला युवक गावोगावी दिसायला लागला आहे. मात्र, युवकांचा हा विश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी ‘आप’वर असणार आहे.
कोणताही बदल झपाट्याने होत नसतो. मात्र, पिढ्यांपिढ्यांची राजकारणाबद्दल असलेली खदखद आता होत असलेल्या बदलांमधून दिसत आहे. मेणबत्ती संप्रदाय एकवटला आणि दिल्ली सर्वसामान्य माणसाची झाली. त्यामुळे येणा-या काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी या संप्रदायाला खूश करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दिल्लीत झालेला बदल देशातील इतर राज्यातही होऊ शकतो, अशी भीती या प्रस्थापितांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे म्हातारे झालेले पक्षदेखील आता युवकांची भाषा बोलू लागले आहेत. पूर्वीसारखे युवकांना काहीतरी आमिष दाखवून आकर्षित करण्याचे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे युवकांसमोर प्रामाणिकपणे उभे राहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचे आता राजकीय पक्षांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे प्रस्थापित पक्षदेखील बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही चांगली बाब आहे. सामाजिक संकेतस्थळाची ताकद अण्णांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशामुळे सर्वांच्या लक्षात आली. त्यानंतर आपल्या पक्षाची ध्येयधोरणे कळावी, यासाठी सर्वच पक्ष युवकांच्या जवळ असलेल्या नवमाध्यमांचा आधार घेताना दिसत आहे .
देशाच्या राजकारणातील एक आशादायी गोष्ट म्हणजे मस्ती आणि चित्रपटांच्या गप्पांसाठी असलेल्या कॉलेजच्या कट्ट्यांवर आता समाज, राजकारणाविषयी चर्चा, वादविवाद होताना दिसताहेत. सध्या घडत असलेल्या घटनांचे नेमके राजकीय विश्लेषण करण्याची प्रगल्भता या कट्यांवरच्या पोरांमध्ये असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले. ग्रामीण भागात मतदानासाठी होणारे अर्थकारण, घराणेशाही, भ्रष्टाचार आदींबद्दल आजच्या महाविद्यालयीन युवकांच्या मनात प्रचंड चीड आहे. निवडणूक प्रक्रियेतही काही विधायक बदल करण्याची गरज त्यांना वाटते. संधी मिळाली तर हे सर्व चित्र बदलवण्याची क्षमता आमच्यात असल्याचा विश्वासही युवकांनी व्यक्त केला. कुठलीही चांगली गोष्ट लगेच स्वीकारणारी आजची युवा पिढी आहे. त्यामुळे राजकारणातील विधायक बदलांमागे युवक निश्चितच असतील, यात शंका नाही. इतिहासाकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली 1974 मध्ये नवनिर्माण आंदोलन झाले. त्या वेळीही भ्रष्टाचार हाच प्रमुख मुद्दा होता. युवकांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला पाठिंबा दिला. देशभरातून या लढ्यासाठी चांगले नेतृत्व उभे राहिले. मात्र, काही वर्षातच हे आंदोलन भरकटल्यामुळे युवकांच्या पदरी निराशा पडली. असाच किस्सा अनेक राजकीय पक्षांच्या उभारणीचा आहे. युवकांसाठी उभारण्यात आलेल्या पक्षांमधूनच युवक दुरावत चालला आहे. मात्र, या सर्व गोष्टींपासून धडा घेत जर युवकांना सध्या आपलासा वाटणा-या आम आदमी पार्टीची वाटचाल सुरू राहिली, तर निश्चितच येणा-या काळातील युवकांचे राजकारण देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरेल.