आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी गाथा: चारही भावंडांमध्ये मी सर्वाधिक जिद्दी अन‌् खोडकर होतो ...सचिन तेंडुलकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बेटा, जीवन एक पुस्तक आहे. त्यातून अनेक अध्याय आणि धडे मिळतात. तू क्रिकेटपटू, म्हणून नशीबवान आहेस. कारण, देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तुला मिळाली; परंतु हे पुस्तकातील एक प्रकरण आहे. किती वर्षे खेळणार? २० ते २५ वर्षे; पण अधिक आयुष्य क्रीडाजगताबाहेरचे असेल. म्हणूनच जीवनाचे महत्त्व क्रिकेटपेक्षा जास्त आहे.’ वडिलांचे हे शब्द माझ्या जीवनातील खरे सार आहे. माझा जन्म मराठी कुटुंबात झाला. नितीन, अजित व सविता हे तिघे माझ्यापेक्षा माेठे. वडील कवी, लेखक व प्राध्यापक होते, तर आई एलआयसीमध्ये कार्यरत होती. माझ्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व श्रेय या लाेकांनाच जाते. सन १९९९मध्ये इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा सुरू होती तेव्हा वडिलांचे निधन झाले. माझ्यासाठी ताे सर्वात माेठा धक्का हाेता. आज मी जे काही घडलो, ते त्यांच्यामुळेच.
माझ्या खवय्येगिरीचे श्रेय आईला जाते. स्वादिष्ट मासे, प्रॉन कढी, वांग्याचे भरीत आणि वरण-भात हे माझे आवडीचे पदार्थ. १९८०च्या दशकात मित्रांनी चायनीज खाण्यासाठी प्लॅन बनवला. त्यानुसार आम्ही १०-१० रुपये जमा केले. त्या वेळी ती मोठी रक्कम होती. रोज रात्री आईकडून गाणे ऐकून झोपत असे. त्यामुळे मन संगीतात रमायला लागले, आजपर्यंत ते कायम आहे. तेंडुलकर कुटुंब संगीताचे रसिक होते. भाऊ व बहीण नियमितपणे रेडिओ ऐकत. जेव्हा वडिलांनी टेपरेकॉर्डर आणला तेव्हा माझी गाण्यांशी अधिक गट‌्टी जमली. क्रिकेटनंतर माझे दुसरे प्रेम संगीतावरच. नंतर विदेशात पाश्चात्य संगीत ऐकण्यास सुरुवात केली. लहान असताना मला टेनिसची आवड होती. अमेरिकन खेळाडू जॉन मॅकेनरो माझा हीरो होता. १० वर्षांचा असताना मी मॅकेनरोसारखा दिसण्याचा प्रयत्न करत असे. माझे हे वेड नंतर इतके वाढले की, मी माझे कुरळे केस कापतच नव्हतो आणि हेडबँड घालून फिरत होतो.
क्रिकेटसाठी मी अजितदादाचा ऋणी आहे. माझी योग्यता त्यांनीच शोधून काढली. माझ्या करिअरसाठी त्यांनी आपले करिअर पणाला लावले. आपल्या कामापेक्षा जास्त महत्त्व त्यांनी माझ्या क्रिकेटला दिले. नितीनदादा सर्जनशील. चांगले स्केच बनवत. तसेच ते कुशल लेखक, कवी आणि गीतकारही. सुरुवातीला ते रसायनशास्त्राचे शिक्षक होते. नंतर त्यांनी एअर इंडियात नोकरी केली. एकदा फ्लाइट लेट झाल्यामुळे त्यांना मुंबईच्या सेंटॉर हॉटेलमध्ये थांबावे लागले. त्या वेळी मी प्रथमच तंदुरी चिकन खाल्ले. त्यानंतर तंदुरी चिकन हा माझा सर्वात आवडता पदार्थ बनला.
मी पाच वर्षांचा असताना सविताताईने मला पहिली क्रिकेटची बॅट दिली. सविताताई शांत स्वभावाची होती. जेव्हा तिचे लग्न झाले तेव्हा मला चालीरीतींची माहिती नव्हती. त्यामुळे मी म्हणालो की, ताई सासरी जाणार नाही; जिजाजीच आपल्याकडे राहतील. सन १९७१मध्ये आमचे कुटुंब ‘साहित्य सहवास’मध्ये शिफ्ट झाला. दोन बेडरूमच्या या घरात आम्ही ४ भावंडे .मी खूप खोडकर होतो. त्या ठिकाणी बांधकाम सुरू होते. मी मित्रांबरोबर कै-या तोडून खात असे. याबाबत अनेकांनी आमच्या तक्रारी केल्या; परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. अभ्यासात मी साधारण होतो. पण कधी नापासही झालो नाही. खेळात मात्र मी सर्वात पुढे असायचो. रात्रीही बाहेर खेळत असे. जेव्हा सर्व मित्र घरी जात तेव्हा मी एकटा इकडे-तिकडे फिरत असे. कॉलनीत सात-आठ ब्लॉक होते. मी पायात चप्पल न घालता त्या ठिकाणी सात-आठ चक्कर मारत होतो. माझ्या सर्व मित्रांकडे सायकल होती; परंतु माझ्याकडे नव्हती. वडील नेहमी नाही म्हणायचे. मात्र, एकदा मी खूप जिद्द केल्यावर त्यांनी लवकरच सायकल घेऊन देण्याचे आश्वासन दिले. आर्थिकदृष्ट्या मुंबईसारख्या शहरात चार मुलांचे पालनपोषण करणे सोपे नव्हते. मात्र, मी सायकलसाठी अडून बसलो होतो. आमच्या अपार्टमेंटमध्ये जाळीची बाल्कनी होती. लहान असल्यामुळे मी बाहेरचे पाहू शकत नव्हतो. मात्र, जिज्ञासेवर नियंत्रण राहिले नाही तेव्हा मी जाळीमधून डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असे. एकदा असेच मी जाळीतून डोके बाहेर काढले; परंतु ते पुन्हा आत घेता आले नाही. ३० मिनिटांपर्यंत माझे डोके जाळीत अडकून बसले होते. आई-बाबा घाबरून गेले. डोक्यावर खूप तेल टाकल्यावर मला आत ओढले. हे पाहून वडील घाबरले आणि त्यांनी मला नवीन सायकल घेऊन दिली; परंतु नवीन सायकलचा आनंद जास्त काळ राहिला नाही. काही तासांतच सायकलवरून पडून मला जखम झाली. शिवाजी पार्कमधील एका सामन्यात मी कर्णधार होतो. त्यामुळे इतर खेळाडूंना विकेटकीपर कोण बनेल? असे विचारले. मात्र, कोणीही तयार न झाल्याने मी प्रथमच विकेटकीपिंग केली. अजितदादांना माहीत होते की, मला क्रिकेटची खूप आवड आहे. एकदा आम्ही आंबे तोडत असताना एका मित्राचे वजन जास्त असल्यामुळे फांदी तुटली. आम्ही सर्व पडलो. मात्र, पळून जाण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यामुळे माझ्यातील सर्व ऊर्जा योग्य ठिकाणी लावण्यासाठी अजितदादांनी मला रमाकांत आचरेकर सरांकडे नेले.
पुस्तक: सचिन तेंडुलकर- माझी आत्मकथा (सचिन तेंडुलकर- प्लेइंग इट माय वे: माय ऑटोबायोग्राफीचे भाषांतर)
प्रकाशक: मंजूल पब्लिशिंग हाऊस, भोपाळ