आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम मराठी साहित्याचे विस्तारते क्षितिज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातील महानगरांसह आता ग्रामीण भागातही मराठीतून शिक्षण घेणारे, अभिव्यक्त होणारे मुस्लिम बांधव सर्वत्र दिसत आहेत. रोजच्या जीवनाशी निगडित असलेले प्रश्न साहित्यातून मांडले जात आहेत. मुस्लिम समाजाबद्दल असलेला एक पूर्वग्रहदूषित दृष्टिकाेन आता काही अंशी कमी होतोय. मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे असून दर्जेदार शिक्षण मिळाले तर हा समाज सर्वच क्षेत्रांत पुढे येईल, हे या निमित्ताने अधोरेखित झाले. पनवेलमधील मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तरुण लेखकांना उभारी मिळाली. 

म हाराष्ट्रातील मुस्लिम मराठी साहित्य चळवळीला २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मराठी भाषेतून लेखन करणाऱ्या, अभिव्यक्त होणाऱ्या मुस्लिम साहित्यिकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मुस्लिम म्हणजे दख्खनी किंवा उर्दूतून बोलणारा किंवा लिहिणारा हा जो सर्वसाधारण समज होता तो आता दूर होतोय. या काळात मुस्लिम मराठी साहित्यिकांनी मराठीतून वेगवेगळ्या विषयांवर विपुल लिखाण केले आहे. त्यात धर्मासह इतरही विषय अतिशय ताकदीने मांडले आहेत. याची दखल आता संशोधक, समीक्षकांनी घ्यायला सुरुवात केली आहे. 

पनवेल येथे मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ११ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. राज्यासह देशभरातून आलेल्या साहित्यिकांनी यात सहभाग नोंदवला. या संमेलनाच्या निमित्ताने मुस्लिम मराठी साहित्याला एक नवा आयाम मिळाल्याचे दिसून आले. मुस्लिम समाजजीवनाशी निगडित अनेक प्रश्नांवर संमेलनाच्या निमित्ताने  सखोल चर्चा झाली. समाजाचे काही दुर्लक्षित, जाणूनबुजून नाकारले गेलेले प्रश्न साहित्यातून समोर आले. मुस्लिमांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. तेही मराठी माध्यमातून. राज्यातील मोठ्या शहरांसह आता ग्रामीण भागातही मराठीतून शिक्षण घेणारे, बोलणारे, लिखाण करणारे आणि अभिव्यक्त होणारे मुस्लिम बांधव आता सर्वत्र दिसत आहेत. रोजच्या जीवनाशी निगडित असलेले प्रश्न साहित्यातून मांडले जात आहेत. मुस्लिम समाजाबद्दल असलेला एक पूर्वग्रहदूषित दृष्टिकाेन आता काही अंशी कमी होतोय. मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. दर्जेदार शिक्षण मिळाले तर हा समाज सर्वच क्षेत्रांत पुढे येईल, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तरुण लेखकांना एक उभारी मिळाली. त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी मंडळ प्रयत्न करणार आहे. मुस्लिम मराठी साहित्यावर संशोधन करू इच्छिणाऱ्यांसाठी मंडळातर्फे संशोधन केंद्राची उभारणी करण्याचा संकल्प सोडण्यात आला. 

संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी मुस्लिम लेखक-कवींच्या मराठी भाषा, संस्कृतीवरील निष्ठा प्रगल्भ आहेत. अस्सल मराठी मातीचा गंध व मराठी बहुधार्मिक संस्कृतीचे प्रेम मुस्लिम मराठी साहित्यातून सातत्याने व्यक्त झाल्याचे गौरवोद्गार संमेलनाचे उद््घाटक प्रा. श्रीपाल सबनीस यांनी काढले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी कोकणातील साहित्यिकांचा लेखाजोखा मांडला.  

महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी आणि मुस्लिम या परिसंवादात श्यामसुंदर सोन्नर, गंगाधर बनबरे, जावेद पाशा कुरेशी यांनी महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि प्रबोधनाच्या चळवळीत मुस्लिम समुदायाच्या योगदानाचा लेखाजोखा मांडताना मुस्लिम मराठी संत, कवींची परंपरा आणि त्यांची समन्वयाची भूमिका प्रभावीपणे विशद केली. १८५७ च्या बंडात दिल्लीमध्ये एका दिवसात २५ हजारांपेक्षा जास्त मुसलमानांना फासावर चढवण्यात आले. परंतु इतिहासामध्ये या गोष्टीचा उल्लेख क्वचितच आढळतो. या उलट भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मौलाना अबुल कलाम आझाद आणि अश्फाक उल्लाहच्या पलीकडे मुस्लिमांची नावे घेतली जात नाहीत. संमेलनाच्या निमित्ताने मुस्लिमांच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहासही उलगडण्यात आला. मुस्लिम स्त्री देशातील इतर धर्मीय स्त्रीप्रमाणेच जगते. तिचे दु:ख, तिचे भोग हे इतर महिलांसारखेच असताना केवळ बुरखा, तलाक याभोवतीच तिला जखडून ठेवले जात आहे, असाही सूर या परिसंवादात उमटला. इस्लामने समतेचा संदेश भारतात आणल्याने वर्णवादाच्या जोखडाखाली आणि विषमतावादी वृत्तींच्या जाचामुळे तत्कालीन बहुतांश बहुजन समाजाने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि समतेची मोट बांधली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मुस्लिम सुफी संतांनी समतेची चळवळ उभी करत समाजामध्ये समता आणि एकतेची बीजे पेरली हे या परिसंवादातून स्पष्ट करण्यात आले.  

‘मुस्लिम समज आणि गैरसमज’ या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, निवृत्त पोलिस अधिकारी एस. एम. मुश्रीफ, धनराज वंजारी तसेच सर्फराज शेख, मेहबूब काझी, मोहसीन खान आदी मंडळींनी मुस्लिमांच्या बाबतीत समाजातील इतर धर्मीयांचे गैरसमज कसे चुकीचे आहेत हे मांडताना त्यांच्या राहणीमानाबद्दल, खानपानाबद्दल, शैक्षणिक पात्रतेबाबत इतकेच नव्हे, तर त्यांच्या राष्ट्रप्रेमाबाबत सोदाहरण आपले म्हणणे मांडले. काही इतिहासकार मुस्लिम राज्यकर्त्यांना बदनाम करत आहेत. टिपू सुलतानसारखा राष्ट्रभक्त भारतीय स्वातंत्र्यलढ्यात धारातीर्थी पडलेला असूनही अलीकडच्या काळात मात्र त्याला धर्मांध, बलात्कारी आणि सत्तापिपासू अशा विशेषणांनी लाखोली वाहिली जात आहे. ती कशी चुकीची आहे, याची मांडणी सोलापूरचे तरुण इतिहासकार सर्फराज शेख यांनी सल्तनत-ए-खुदादाद या ग्रंथातून केली आहे. जेव्हा मालेगाव बॉम्बस्फोटात मुस्लिमेतर संघटनांचा सहभाग तपासातून सिद्ध झाला तेव्हापासून स्फोटाच्या घटना कमी झाल्या, असे निरीक्षण निवृत्त पोलिस महासंचालक एस. एम. मुश्रीफ यांनी नोंदवले.  

मुस्लिम महिला- साहित्यातील आणि वास्तवातील या परिसंवादात डॉ. जुल्फी शेख, डॉ. विद्युत भागवत, डॉ. सिसिलिया कार्व्हालो आणि प्रा. हसीना मुल्ला यांनी मांडणी करताना साहित्य, माध्यम, चित्रपट आणि मालिकांतून येणारी मुस्लिम स्त्री आणि वास्तवातील मुस्लिम स्त्री भिन्न असल्याचे अनेक उदाहरणे देऊन सांगितले. दर्गा आणि मशिदीतील तिचा प्रवेश किंवा हलाला, तलाक, बुरखा या विषयातच तिला का चित्रीत केले जाते? डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार, प्राध्यापक इतकेच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या मुस्लिम महिलांचे चित्रण म्हणावे तसे होत नाही, अशी खंत व्यक्त केली. मुस्लिम महिलेचा संघर्ष, तिची होरपळ, जीवन जगताना तिची होणारी हेळसांड या विषयांपलीकडे साहित्यातून चित्रीतच होत नाही. मुस्लिम महिला म्हटले की एक तर ती दाई किंवा तलाकपीडित आणि ख्रिश्चन महिला म्हटले की, ती तोकडे कपडे घालणारी रिसेप्शनिस्ट किंवा मदिरा वाटप करणारी इतकेच माध्यम आणि साहित्यातून मांडले जाते. हे बदलले पाहिजे, तिचे खरे जगणे, खरा संघर्ष जगापुढे आला पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक सत्य लेखन केले पाहिजे, असे मत या महिला साहित्यिकांनी व्यक्त केले. काही साहित्यिकांनी मुस्लिम समाजाचे बारकाईने अध्ययन न करता केवळ विरोधी आणि टीकेचे धोरण ठरवून मुस्लिम स्त्रियांचे चित्रण आपल्या कादंबरीतून अत्यंत बीभत्स आणि चुकीचे रंगवून मुस्लिम महिलांवर अन्याय केल्याचे डॉ. जुल्फी शेख म्हणाल्या.  गेल्या २७ वर्षांत चळवळीची केवळ ११ संमेलने आम्ही घेऊ शकलो. कारण लोकसहभागातून निधी उभा करणे आणि साहित्य संमेलन घेणे अत्यंत कठीण बाब आहे. त्यामुळे शासनाने दरवर्षी मुस्लिम मराठी साहित्य संमेलनासाठी निधी द्यावा, असा संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी सुचवलेला ठराव संमेलन प्रमुख डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी संमत करून घेतला. या संमेलनात महाराष्ट्रातील शेकडो मुस्लिम मराठी साहित्यिकांनी हजेरी नोंदवली. 

११ साहित्य संमेलनांत दुसरी महिला अध्यक्ष 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महिलेला अध्यक्षपद मिळण्यासाठी ८७ वर्षे लागली. परंतु मुस्लिम मराठी साहित्य चळवळीच्या २७ वर्षांच्या कालखंडात दोन महिलांनी अध्यक्षपद भूषवले. यावरून अधिक पुरोगामी कोण हे साहित्य रसिकांनी ठरवावे, असे प्रतिपादन या संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. फातिमा मुजावर यांनी केले. 
 
- साजिद पठाण
बातम्या आणखी आहेत...