आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samadhan Pore About NCP And Mahayuti Issue, Divya Marathi

सांगली वार्तापत्र: राष्ट्रवादीला भगदाड; महायुतीत भाऊगर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी सध्या राज्याच्या तालुका, तालुक्यातील नेते, कार्यकर्ते माकडउड्या मारत आहेत. त्यांच्या या उड्या ‘उस पार’ पोहोचणार का, यावर भविष्यात चर्चा होऊ शकते, मात्र सध्या या कोलांटउड्यांमुळे आघाडीला विशेषत: राष्ट्रवादीला जागोजागी भगदाडे पडू लागली आहेत. गंमत म्हणजे ती बुजवण्याच्या प्रयत्नात ना काँग्रेसचे नेते दिसत आहेत, ना राष्ट्रवादीचे.

लोकसभा निवडणुकीतच सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांना खेळपट्टी ‘सेफ’ करण्यासाठी काँग्रेसमधून आणलेले संजय पाटील भाजपमध्ये गेले आणि त्यांनी लोकसभेचे मैदान मारून पुढील धोक्याचा इशारा दिला. लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांना बहुतेक सर्वच विधानसभा मतदारसंघांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मदत केली. (अगदी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार्‍या सांगली महापालिकेतील नगरसेवकांनीही) या मदतीची परतफेड म्हणून आपल्याला विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळेल, या आशेने आता तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये निघाले आहेत. आर. आर. पाटील, पतंगराव कदम यांचा ‘गेम’ करण्यासाठी ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेल्या माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना भाजपने तर पतंगराव कदम यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या पृथ्वीराज देशमुख यांना भाजपमध्ये येण्याचे आवतण दिले आहे. घोरपडे आणि देशमुख यांनीही तसे जाहीर करून टाकले आहे. आर.आर.पाटील यांचा तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे आहे आणि आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, असे शिवसेनेचे संपर्क नेते दिवाकर रावते यांनी जाहीर करून घोरपडे यांच्यापुढील अडचणी वाढवल्या आहेत. उद्या तसाच प्रसंग आला तर घोरपडे शिवसेनेतर्फेही लढतील; पण आबांचा पराभव करायचाच, असा चंग महायुती आणि संजय पाटील यांनी बांधला आहे.

तिकडे जत तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप भाजपकडून लढण्यास तयार झाले आहेत; मात्र तिथे सध्या भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश शेंडगे भाजपकडून पुन्हा लढायला तयार आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार दिनकर पाटील, धनपाल खोत हेही भाजपच्या वाटेवर आहेत. सांगलीतही भाजपपुढे बाका पेच आहे. विद्यमान आमदार संभाजी पवार मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत, तर ‘पोषक’ वातावरणाचा फायदा उठवण्यासाठी भाजपच्या दुसर्‍या फळीतील नीता केळकर, सुधीर गाडगीळ सज्ज आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांपुढे ‘घरचा’ की ‘बाहेर’चा, असा पेच आहे. राष्ट्रवादी काँग्र्रेसमधून एवढे नेते बाहेर पडत असताना आर. आर. पाटील मात्र या सार्‍यांना ‘खुशाल बाहेर पडा,’ असा सल्ला देत आहेत. या सार्‍याचा परिणाम येणार्‍या निवडणुकीत कोणाला भोगावा लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

काँग्रेसमध्ये शांतता
राष्ट्रवादीचा एक-एक मोहरा गळून पडत असताना काँग्र्रेसमधून मात्र कोणीही बाहेर पडण्याची भाषा केलेली नाही. अर्थात काँग्र्रेसकडे बाहेर पडून लढण्याच्या ताकदीचे नेतेच नाहीत, हेही तितकेच खरे. शिराळा मतदारसंघातील शिवाजीराव नाईक आणि इस्लामपूर मतदारसंघातील नाना महाडिक हे मात्र महायुतीच्या वाटेवर आहेत.