आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samadhan Pore Article About Jayant Patil, Sangali

लढाईआधीच तलवार म्यान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणाला पाडायचे, कोणाला निवडून आणायचे हे ठरवणारे जयंत पाटील परवा सांगलीत यापुढे माझ्याकडे वेळच वेळ असेल, असे म्हणाले. राज्याच्या राजकारणाची नेमकी जाण असलेल्या नेत्याचे हे वक्तव्य बरेच काही सांगून जाते.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचा सांगलीत सर्वपक्षीय नागरी सत्कार झाला. यास भाजपच्या नेत्यांशिवाय राष्ट्रवादीचे बडे नेते जयंत पाटील व त्यांचे कार्यकर्ते वगळता कोणत्याही पक्षाचा एकही नेता नव्हता. भाजपमधीलही आमदार संभाजी पवार गटाला कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. यावर कडी म्हणजे जयंत पाटील यांनी राम नाईक यांना उद्देशून मला उत्तर प्रदेशचे राजभवन पाहायची इच्छा आहे आणि ती आता पूर्ण होईल, असे वाटते. कारण यापुढे माझ्याकडे वेळच वेळ असेल, असे वक्तव्य करून सर्वांनाच अचंबित केले. जयंत पाटील यांचे हे वक्तव्य म्हणजे लढाईआधीच तलवार म्यान करण्यासारखे आहे. भाजप-शिवसेना आणि जयंत पाटील यांचे सख्य नवे नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात गेल्यावेळी भाजपचे तीन आमदार निवडून आले होते, ते कोणाच्या पाठबळावर हे लपून राहिलेले नाही.

आताही राष्ट्रवादीतून भाजप-सेनेत निघालेले मोहरे जयंत पाटील यांचेच नेतृत्व मानणारे आहेत. त्यांनी पक्ष सोडताना आर. आर. पाटील आणि पक्ष नेतृत्वावर खापर फोडले, एवढेच नव्हे तर जयंत पाटील यांची राष्ट्रवादीत घुसमट होत असल्याचे सांगितले. याला उत्तर न देता जयंत पाटलांनी केलेले उलट वक्तव्य खूप काही सांगून जाते. जयंत पाटील हे राज्य मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांना राज्याच्या राजकारणाची चांगली जाण आहे. म्हणूनच लोकसभा निवडणूक लढवण्याचे आलेले बालंट त्यांनी मोठ्या खुबीने टाळले होते.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-आघाडीपुढे काय वाढून ठेवले आहे, याचेही त्यांना चांगले भान आहे. म्हणूनच त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आहे. अर्थात त्यांच्यासारख्या लढवय्याने लढाईआधीच तलवार म्यान करणेही समजण्यासारखे नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात वादळे उठलेली पाहायला मिळाली, तर आश्चर्य वाटायला नको.