आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंतदादा घराण्याचा अस्त?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेल्या पकडीची दिल्लीलाही एकेकाळी दखल घ्यायला लावलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्यावरील सत्तेचा सूर्य मात्र आता मावळताना दिसतो आहे. दादांच्या वारसांनी लोकसभेतील 30 वर्षांची सद्दी घालवल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही सलग पराभव पत्करला आणि आता तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांवरील पकडही ढिली झाल्याचा प्रत्यय येतो आहे.

1980 च्या दशकात वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर जबरदस्त पकड निर्माण केली होती. दादांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत स्वत:चा असा गट तयार केला होता. दादांच्या निधनानंतर विलासराव देशमुख यांच्यापर्यंत राज्याच्या राजकारणावर या गटाची भक्कम मांड होती. आर.आर.पाटील हा या साखळीतला शेवटचा दुवा. वसंतदादांचे बोट धरून राजकारणात आलेल्या आर.आर.पाटील यांनी राज्याच्या राजकारणात शरद पवार यांचा वारसा चालवला; मात्र जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी वसंतदादांच्या विचाराचेच राजकारण केले. त्यांच्या असण्यापर्यंत हा गट मजबूत होता; मात्र आबांच्या निधनानंतर या गटाचे राज्याच्या राजकारणात असलेले केविलवाणे अस्तित्वही संपुष्टात आले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दादांचे नातू, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा ऐतिहासिक पराभव झाला आणि लोकसभेतील दादा घराण्याची 30 वर्षांची सद्दी संपुष्टात आली. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत दादांचे चुलत नातू, माजी मंत्री मदन पाटील यांना सलग दुसर्‍यांदा पराभव
स्वीकारावा लागला. दादांच्या नावाने राजकारण करण्याचे दिवस आता राहिले नाहीत, तुमचे कर्तृत्व दाखवा, असाच संदेश मतदारांनी दादांच्या वारसांना या दोन्ही निवडणुकांतून दिला.

मदन पाटील यांचे राज्याच्या राजकारणात तितकेसे अस्तित्व नाही; (त्यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळाली ती विलासराव देशमुख यांच्यामुळे) मात्र जिल्ह्यातील सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांची जबरदस्त पकड होती. त्यामुळेच त्यांनी जयंत पाटील यांच्यासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याला जबरदस्त टक्कर देत सांगली महापालिका, बाजार समिती ताब्यात ठेवली तर जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांत आपला गट जिवंत ठेवला होता.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी अनपेक्षितपणे जयंत पाटील यांच्याशी हातमिळवणी केली उरलेसुरले कार्यकर्तेही त्यांच्यापासून दुरावले. आता तर महापालिकेत त्यांनी पाठवलेले नगरसेवकही त्यांचा शब्द पाळेनासे
झाले आहेत.

आधी सांगली नगरपालिका आणि 17 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सांगली महापालिकेवर मदन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. नुकत्याच महापालिकेत झालेल्या मागासवर्गीय आणि गुंठेवारी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मदन पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराचा काँग्रेसच्याच नगरसेवकांनी पराभव केला. हा मदन पाटील यांच्या आणि पर्यायाने वसंतदादा घराण्याच्याच अस्तित्वासाठी मोठा धक्का आहे.

एकमेव आशेचा किरण
आजवर राजकारणात आलेल्या वसंतदादांच्या वारसांना स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करता न आल्यानेच त्यांची पीछेहाट झाली. दादांच्या पुण्याईवर फार काळ राजकारण करता येणार नाही, हे लोकांनीच दाखवून दिले. दादांचे दुसरे नातू विशाल पाटील यांच्याकडे प्रतीक आणि मदन पाटील यांच्या तुलनेत चांगले संघटन कौशल्य आहे. त्या जोरावर त्यांनी एकमेव वसंतदादा साखर कारखान्या सत्ता ताब्यात ठेवली आहे; पण त्यांचा मुकाबला जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांच्यासारख्या तगड्या पहिलवानांशी आहे. या दोघांशी ते कसा मुकाबला करतात, यावर त्यांचे भवितव्य असेल.

समाधान पोरे, सांगली
बातम्या आणखी आहेत...