आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वा-यामागे पळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वा -याच्या दिशेने वाहणे, हा राजकारणाचा स्वभाव आहे. म्हणूनच आपल्याला सरकारे कोणत्याही पक्षाची, आघाडीची बनली तरी सत्तेत मात्र तेच ते चेहरे दिसतात, हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. 1994 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातून 22 अपक्ष आमदार निवडून गेले होते. त्यांनी स्वत:च एकत्र मोट बांधली आणि युतीला पाठिंबा देऊन सत्तेत वाटा घेतला. त्यानंतर या 22 पैकी बहुतेक आमदार 1999 च्या निवडणुकीनंतर काँग्रेस वा राष्ट्रवादीसोबत गेले आणि पुन्हा त्यांनी सत्तेच्या गंगेत हात धुवून घेतले.
या वेळी काँग्रेस आघाडीविरोधी नाराजीचे (किमान सर्व प्रकारच्या मीडियामधून तरी) वातावरण आहे. शिवाय नरेंद्र मोदी नावाचा करिष्मा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व स्तरावर पाहायला मिळत आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून येणा-या लोकसभा (आणि त्यानंतरच्या राज्यातील विधानसभा) निवडणुकीत भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर येणार, हे गृहीत धरून सत्तासोपानाला गवसणी घालण्यासाठी पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. महायुतीने तर या वेळी पश्चिम महाराष्ट्र टार्गेट केल्याचेच दिसते आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे ऊसपट्टा. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साखर सम्राटांचा हा बालेकिल्ला. मात्र, गेल्या दशकभरात शेतकरी संघटनेने ऊस आंदोलनातून या बालेकिल्ल्याला भगदाड पाडायला सुरुवात केली आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात लढवलेल्या 7 पैकी तीनच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला होता. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या तिन्ही जागा त्यांनी जिंकल्या होत्या, तर दोन जागा शिवसेनेला आणि दोन जागांवर अपक्ष निवडून आले होते. अपक्ष निवडून आलेले राजू शेट्टी हे गेली पाच वर्षे अपक्षच राहिले, तर कोल्हापूरच्या सदाशिवराव मंडलिकांनी काँग्र्रेसशी घरोबा केला.
या वेळी मात्र पटावरील सारे प्यादे हलले आहेत. राजू शेट्टी महायुतीसोबत गेले आहेत, तर सदाशिवराव मंडलिक शिवसेनेच्या मार्गावर आहेत. सांगलीत राष्ट्रवादीचे आमदार संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसविरोधात शड्डू ठोकला आहे. माढ्यातून या वेळी शरद पवार नाहीत. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस आंदोलनाचा फायदा उठवण्यासाठी सदाभाऊ खोत यांच्या उमेदवारीला आग्रही आहे. हे सारे योग जुळून आले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी या वेळी आणखी वाढणार आहेत.
मुंडेंचे नेटवर्क : पश्चिम महाराष्ट्र हा मुंडेंचा फेव्हरेट प्रांत. त्यांचे प्रतिस्पर्धी (गृहमंत्री या नात्याने) आर.आर. पाटील यांच्यावर कुरघोडीची एकही संधी मुंडे सोडत नाहीत. आता तर त्यांनी थेट आबांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी संजय पाटील यांनाच भाजपमध्ये घेऊन दुहेरी निशाणा साधण्याचा डाव आखला आहे. सांगलीची लोकसभेची जागा मिळवण्याबरोबरच तासगाव-कवठे महांकाळमध्ये तगडे आव्हान उभे करण्यासाठी अजितराव घोरपडे यांनाही भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत. शिवाय 1994 ला साथ दिलेल्या आमदारांच्या तोंडालाही सत्तेचे पाणी सुटले आहे. या सा-या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण येणा-या काळात पार तळातून ढवळून निघणार, यात शंका नाही.