आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी : समांतर सेन्साॅरशिपचा तडाखा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समांतर सेन्सॉरशिपने मराठी रंगभूमीवरील प्रागतिक प्रवाहाला नेहमीच खच्ची करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी असो वा कोणत्याही भाषेतील नाटके, त्यांना या समांतर सेन्सॉरशिपच्या दहशतीला सामोरे जावे लागते. राज्यघटनेने जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना दिले आहे, त्याचा समाजातील प्रत्येक घटकाने आदर केला पाहिजे. म्हणूनच समांतर सेन्सॉरशिप हाणून पाडली पाहिजे. 

अरविंद जगताप यांनी लिहिलेले तसेच दिग्दर्शित केलेले व अद्वैत थिएटर या नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा राहुल भंडारे यांनी निर्मिलेले ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हे नवे मराठी नाटक त्यातील परखड सामाजिक आशयामुळे रंगभूमीवर गाजत आहे. अरविंद जगताप हे लेखक मूळचे मराठवाड्यातील बीडचे.  या नाटकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, यात लेखक-दिग्दर्शकाबरोबरच बहुतांश कलाकार मराठवाड्यातले आहेत. त्यामुळे मुंबई-पुण्यासह सर्व महाराष्ट्रातल्या व्यावसायिक रंगभूमीवर मराठवाड्यातील रंगकर्मींचे हे नाटक रसिकप्रिय झाल्याने त्याचाही आनंद वेगळाच आहे. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ चा पनवेलच्या नाट्यगृहात प्रयोग सुरू असताना दुसरा अंक संपल्यानंतर एक अनोळखी व्यक्ती विंगेत आली. त्या व्यक्तीने नाटकातील एक कलाकार मुक्तेश्वर खोले याला अशी धमकी दिली की, ‘हे नाटक बंद करा, नाहीतर बॉम्बस्फोट घडवू.’ ती व्यक्ती त्यानंतर निघून गेली. हा प्रकार काही महिन्यांनंतर निर्माते राहुल भंडारे यांच्या कानावर आला. त्यांनी सर्वप्रथम एक गोष्ट केली ती म्हणजे त्या अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली. त्याचबरोबर १७ सप्टेंबरला नाटकातील कलाकारांना नाट्यगृहाच्या व्यवस्थापकाने जी वागणूक दिली त्याविरोधात पनवेल महापालिकेच्या आयुक्तांना पत्रही लिहिले. ‘स्टॅच्यू ऑफ िलबर्टी’ या नाटकाच्या ९ जुलै व १७ सप्टेंबर रोजी घडलेल्या गैरप्रकारांचा मराठी रंगभूमीवरील नाट्यनिर्माते, कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांनीच निषेध केला. पनवेल महापालिकेच्या १९ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत विविध पक्षांच्या नगरसेवकांनी फडके नाट्यगृहात कलाकारांना धमकावल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच नाट्यगृहाच्या कारभारावरही ताशेरे ओढले.  

‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या नाटकामध्ये कोणतीही स्फोटक विधाने नाहीत. भारतीय समाजाचे आजचे चित्र त्यात स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे. हे नाटक म्हणजे वास्तवाचा आरसा आहे. मुळात हे नाटक सेन्सॉरने संमत केलेले आहे. त्यामुळे त्याच्या प्रयोगांवर कोणाही बाह्यशक्तीने बंदी आणण्याचा प्रयत्न केला तर ते कायदाबाह्य होईल. भारतीय समाजातील जातिव्यवस्था ही कितीही प्रयत्न केले तरी जाता जात नाही. डॉ. आंबेडकरांनी जातिअंतासाठी खूप मोठा लढा दिला. त्याचे भान ठेवून जातिअंतासाठी प्रयत्न करायचे सोडून आजचे राजकीय नेतृत्व जातीपातीच्या अस्मिता तीव्र कशा होतील याच डावपेचांत रंगलेले आहे. जातीय अस्मिता धारदार होत असतानाच त्याचे समाजावर विपरीत परिणाम होत आहेत. त्याविषयी कोणी बोलायला उभा राहिला तर त्याचा आवाज दडपला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांसारख्या अनेक महनीय व्यक्तींना जातीपातीच्या कप्प्यात बंद केले जात आहे. १९ व्या शतकापासून महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांची जी प्रक्रिया सुरू झाली होती तिला उलटी गती देण्याचा हा प्रकार आहे. महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांची संख्या वाढते आहे. परंतु माणुसकी खुजी होत चालली आहे. या साऱ्या परिस्थितीवर फँटसीच्या माध्यमातून अरविंद जगताप यांनी ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या नाटकात भाष्य केले आहे. नाटकात अठरापगड जातींचा उल्लेख आहे. प्रत्येक जातिसमूहाच्या चुकीच्या वर्तनावर परखडपणे बोल ठेवलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या नाकाला मिरच्या झोंबणार यात शंकाच नाही. 

परंतु ‘हे नाटक बंद करा, नाही तर बॉम्बस्फोट घडवू’ अशी धमकी ज्या व्यक्तीने या नाटकातील कलाकाराला दिली ती जास्त गंभीर आहे. हा सरळसरळ समांतर सेन्सॉरशिपचा प्रकार आहे. ही अनोळखी व्यक्ती कोण होती याचा तपास पनवेलचे पोलिस करतीलच. परंतु मराठी रंगभूमीला समांतर सेन्सॉरशिपचे हे जे तडाखे अधूनमधून बसतात, त्या प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. आपल्या समाजातील अनेक घटक सध्या फारच हळवे झालेले आहेत. जरा त्यांच्या कृत्यांची कोणी चिकित्सा केली की त्यांच्या भावना लगेच दुखावतात. मग निषेध, मोर्चे, धरणे व प्रसंगी हिंसाचारही केला जातो. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हे नाटक प्रतीके, वास्तव, ब्लॅक कॉमेडी, फँटसी अशा विविध पातळ्यांतून जाते. ते त्या अंगानेच समजून घेणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी प्रेक्षक सुजाण असावा लागतो. मराठी रंगभूमीवरचा प्रेक्षक जाणता वगैरे म्हटला जातो. पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी नाटकाबाबत जे गैरप्रकार घडले ते पाहता हा प्रेक्षक कितपत सुजाण आहे, याची शंका वाटते. 

समांतर सेन्सॉरशिप या अपप्रकाराचा विळखा मराठी रंगभूमीला खूप आधीपासूनच पडलेला आहे. नाटककार विजय तेंडुलकर लिखित घाशीराम कोतवाल या नाटकामुळे ब्राह्मण समाजाची बदनामी झाली आहे असा सूर काढला गेला. या नाटकाविरोधात त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका घेतली. हे नाटक बंद पाडण्यासाठी आकाशपाताळ एक केले गेले. मात्र शिवसेनाप्रमुखांनी कालांतराने या नाटकात काहीही आक्षेपार्ह अाढळले नसल्याचे स्पष्ट केले. तोच कित्ता शिवसेनाप्रमुखांनी विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाइंडर या नाटकाबाबत गिरवला. या नाटकाचे प्रयोग बंद पाडण्याची भूमिका शिवसेनेकडून घेतली गेली. सखाराम बाइंडर नाटकामध्ये तेंडुलकरांनी स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य केले होते. हे नाटक कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केले होते. या नाटकाचे १३ प्रयोग होत नाहीत तोवर  खूप वादविवाद सुरू झाले. सेन्सॉर बोर्डही इतके कचखाऊ की आपणच प्रयोगासाठी मंजुरी दिलेल्या नाटकावर बंदी लादली. या अन्यायकारक बंदीविरोधात कमलाकर सारंग न्यायालयात गेले. तिथे सारंग यांचाच विजय झाला. वासनाकांड, अवध्य, गिधाडे, माकडाच्या हाती शॅम्पेन, सही रे सही अशा बऱ्याच नाटकांना सेन्सॉर व समांतर सेन्सॉरशिपचा जो त्रास झाला आहे तो विसरता येणार नाही. मराठी असो वा कोणत्याही भाषेतील नाटके, त्यांना या समांतर सेन्सॉरशिपच्या दहशतीला सामोरे जावे लागते.  राज्यघटनेने जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना दिले आहे, त्याचा समाजातील प्रत्येक घटकाने आदर केला पाहिजे. म्हणूनच समांतर सेन्सॉरशिप हाणून पाडली पाहिजे.
 
- समीर परांजपे, paranjapesamir@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...