आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samir Deshpande Artical On Mr.Shard Pawar Politics

पवारांच्या खेळीसाठी महाडिकांचे प्यादे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडेनऊ वर्षांपूर्वीचा काळ. स्थळ कोल्हापुरातील प्रसिद्ध बिंदू चौक. त्या वेळच्या लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे नेते सदाशिवराव मंडलिक आणि शिवसेनेकडून धनंजय महाडिक यांच्यात अटीतटीची लढत लागलेली. अशा वेळी नेमका संदेश देण्यात माहिर असलेल्या शरद पवारांनी बिंदू चौकातून कौन है ये मुन्ना, ह्याचं काम काय, असा सवाल विचारला.टाळ्या-शिट्ट्यांचा पाऊस पडला आणि महाडिक यांनाही पराभव स्वीकारावा लागला.


याच पवारांना साडेचार वर्षांनी साक्षात्कार झाला. सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे मातब्बर नेते जयंत पाटील धनंजय महाडिक यांच्या घरी गेले. चर्चा झाली. कौन है ये मुन्ना असं विचारणार्‍ या शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय महाडिक यांनी घेतला. मुंबईत वाजतगाजत झालेल्या समारंभात धनंजय महाडिक राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले. लोकसभेच्या निवडणुकीला अवधी होता. महाडिक यांनी राष्ट्रवादीचे झेंडे लावून कार्यक्रम सुरू केले. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या. लोकसभा जाहीर झाली. महाडिकांचा घात झाला. जितक्या सहजतेने त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश मिळाला तितक्याच सहजतेने लोकसभेच्या निवडणुकीच्या तिकिटाच्या स्पर्धेतून महाडिक यांचा पत्ता काटण्यात आला. छत्रपती संभाजीराजेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. परिणाम व्हायचा तोच झाला. दगाबाजीने संतापलेल्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील महाडिक परिवाराने निर्धार करून राष्ट्रवादीच्या विरोधात काम केले. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीने आपल्या दोन्ही जागा गमावल्या.


20 वर्षे विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जिल्हाभर पायाला भिंगरी बांधून फिरलेल्या धनंजय महाडिक यांची चांगलीच राजकीय कोंडी झाली. पहिली लोकसभा लढवली शिवसेनेकडून. नंतर चार वर्षांनी राष्ट्रवादीत प्रवेश. राष्ट्रवादीकडून दगाबाजी. दुसरीकडे काका महादेवराव महाडिक काँग्रेसचे आमदार. अशातच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेल्या सतेज पाटील यांच्याविरोधात धनंजय महाडिक यांनी विधासभेला शड्डू ठोकला. परंतु तिथेही अपयश आलं. काका काँग्रेसमध्ये असले तरी सतेज पाटील यांनी मंत्री होऊन महाडिकांचा पिच्छा पुरवायला सुरुवात केलेली. अशातच सोलापूर जिल्ह्यातील भीमा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने धनंजय महाडिक यांनी तिकडे वावर वाढवला. वडिलांनी सुरू केलेल्या कारखान्यात आपली सत्ता आणली आणि चेअरमनपद मिळवून त्यांना गुलाल लावण्याची संधी मिळाली.


गेल्या वर्षभरापासून पक्ष कुठला माहीत नाही, परंतु लोकसभा लढवणार असे सांगत महाडिक पुन्हा मतदारसंघात फिरू लागले. त्यांच्या पत्नी सौ. अरुंधती यांच्यासमवेत असलेली महिलांची फळीही आणखी सक्रिय झाली. राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, कला, अध्यात्म सर्वच क्षेत्रांतील कार्यक्रम घेत महाडिक यांनी जोर लावला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे महाडिक हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असे सांगत होते.


अखेर भीमा साखर कारखान्याच्या माळावर शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांना संकेत देऊन कामाला लागण्याचे आदेश दिले आणि आता महाडिकांच्या गोटामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून कार्यरत असलेले महादेवराव महाडिक यांना वगळून राजकारण करता येत नाही हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. सध्या सतेज पाटील यांनी त्यांना चेपण्याचे काम इमानेइतबारे सुरू केले आहे. दुसरीकडे त्यांचेच बंधू नाना महाडिक यांनी विविध संस्था आणि उद्योगांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात आपले बस्तान बसवले आहे. गेल्या लोकसभेला राष्ट्रवादीला दणका देण्यात महाडिक आघाडीवर होते. सोलापूर जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य हे धनंजय महाडिक आणि महाडिक परिवाराला मानणारे आहेत. या तिन्ही जिल्ह्यांत महाडिक परिवाराची ताकद निर्णायक ठरू शकते हे वास्तव आहे.


अशा परिस्थितीत या तिन्ही जिल्ह्यांतील राजकारणाचा विचार करून शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांना लोकसभेसाठी उमेदवारीचे संकेत देऊन आपल्या खेळीला सुरुवात केली आहे. कारण राजू शेट्टी यांच्या विरोधातही पवारांना तगडा उमेदवार आणि त्याच्या मागे पाठबळ गरजेचे आहे. महाडिक परिवाराची हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चांगली ताकद आहे. या सर्व बाबींचा विचार करता गेल्या वेळी महाडिक यांना उमेदवारी डावलून केलेली चूक पवारांनी सुधारल्याचे त्यांच्याच पक्षाचे नेते सांगत आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या दोन्ही जागा ज्या पद्धतीने दोन दाढीवाल्यांनी म्हणजेच मंडलिक आणि शेट्टी यांनी हिसकावून घेतल्या. ही पवारांची भळभळती जखम आहे. त्यावरचा उतारा शोधण्यासाठी पवारांनी अखेर धनंजय महाडिक यांच्या हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे.