आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांना जाहिरात करू द्या!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैद्यकीय व्यवसाय हा व्यापार नव्हे, तर सेवाभावी स्वरूपाचा व्यवसाय समजला जातो. त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय करताना डॉक्टरांनी अव्वाच्या सव्वा पैसे कमावू नयेत, रुग्णसेवेकडे सर्वाधिक लक्ष द्यावे, अशी आजपर्यंतची धारणा होती. मात्र, आता बदलत्या काळानुसार डॉक्टरांना ही बंधने मान्य नाहीत. डॉक्टरांना स्वत:ची जाहिरात करण्याची परवानगी द्या, असे मत देशामध्ये नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ७० टक्के डॉक्टरांनी नोंदवलेले आहे. अशी परवानगी मिळवण्यासाठी वेळप्रसंगी कायदेशीर लढाई लढण्याची तयारीही या डॉक्टरांनी दाखवली आहे. १९५६ च्या इंडियन मेडिकल कौन्सिल कायद्याद्वारे या कौन्सिलचे सदस्य असलेल्या डॉक्टरांना काही विशिष्ट प्रसंग वगळता अन्य वेळी स्वत:ची जाहिरात करण्यास बंदी आहे. या कायद्यात २००१ पर्यंत तीन दुरुस्त्या झाल्या, पण ही बंदी हटवली गेली नाही. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ही अॅलोपॅथी डॉक्टरांची संघटना आहे. होमिओपॅथी व आयुर्वेद डॉक्टरांच्या संघटना वेगळ्या आहेत. आता कायदेशीर गुंता असा आहे की, एमसीआयचे सदस्य नसलेल्या व इतर पॅथीच्या डॉक्टरांना १९५६ चा वैद्यकीय कायदाच लागू होत नाही. त्यामुळे इतर पॅथीचे डॉक्टर प्रसारमाध्यमांतून स्वत:ची बिनदिक्कतपणे जाहिरात करताना दिसत आहेत. यातील काही जाहिराती या बोगस उपचार पद्धतींच्या असून त्यामुळे रुग्णांची दिशाभूल होत असते. पण त्याविरोधात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

अॅलोपॅथीच्या डॉक्टरांपैकी ज्याने नव्याने प्रॅक्टिस सुरू केली असेल अथवा विशिष्ट कारणामुळे काही काळ त्याला प्रॅक्टिस बंद ठेवायची असेल, प्रॅक्टिसची वेळ किंवा पद्धत बदलली असेल तर ठरावीक नमुन्यामध्येच हे डॉक्टर प्रसारमाध्यमांत स्वत:ची जाहिरात करू शकतात. मात्र, अन्य वेळी स्वत:ची जाहिरात करण्यास त्यांना १९५६ च्या कायद्याद्वारे बंदी आहे. नेमकी हीच बाब अॅलोपॅथी डॉक्टरांना खटकत असल्याने त्यांनी सदासर्वकाळ स्वत:ची जाहिरात करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे. विविध पॅथींच्या मोठमोठाल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या जाहिरातीही प्रसिद्ध होताना दिसतात. ही हॉस्पिटल्स एमएसीआयचे सदस्य नसल्याने त्यांनाही जाहिरात करण्यापासून कायद्याने रोखता येणे कठीण आहे. मात्र, डॉक्टर मालक असलेल्या नर्सिंग होमने जाहिरात केल्यास ते बेकायदेशीर ठरते. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत असतात, पण त्यांच्या कौशल्याची माहिती रुग्णांना न होता फक्त हॉस्पिटलचा ब्रँड मोठा होत जातो. हेदेखील आपल्या क्षेत्रात असाधारण कौशल्य मिळवलेल्या डॉक्टरांना खटकू लागले आहे. त्यातूनच अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी जाहिरातींच्या बाजूने चढा सूर लावला आहे. विशिष्ट आजार व त्यावरचे उपाय याबाबत कौशल्य वाढवलेल्या डॉक्टरांपैकी सगळेच डॉक्टर हे काही मोठमोठाल्या हॉस्पिटलशी संलग्न नसतात.

काही जणांचे स्वत:चे रुग्णालय व प्रॅक्टिस असते. आपला ब्रँड मोठा करावा ही प्रत्येकालाच इच्छा असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशिष्ट आजारावरील उपायांबाबतची कौशल्यवृद्धी करण्यात तसेच स्वत:चा दवाखाना थाटून प्रॅक्टिस सुरू करण्यापर्यंत मजल गाठेपर्यंत डाॅक्टर वयाची पस्तिशी नक्की गाठतो. दवाखाना सुरू करण्यासाठी येणारा भांडवली खर्चही खूप मोठा असतो. मोठमोठाल्या रुग्णालयांच्या नावाखाली स्वत:चे अस्तित्व झाकून टाकण्यापेक्षा स्वतंत्रपणे व स्वबळावर वैद्यकीय व्यवसायात पाय रोवू इच्छिणाऱ्या डॉक्टरांना स्वत:ची जाहिरात करू देणे हे उपकारक ठरू शकेल. या जाहिरातीत आपल्या वैद्यकीय कौशल्यासंदर्भात डॉक्टर जी माहिती देईल त्यातून रुग्णांना नेमके कोणत्या डॉक्टरकडे उपचारांसाठी जावे याचेही वाढीव भान येईल. त्याशिवाय जाहिरातीत नमूद केलेल्या कौशल्याप्रमाणेच डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार न केल्यास डॉक्टरांवर कारवाई करणे अधिक सुलभ होईल. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये दशकापूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार एकूण ५२ मेडिकल स्पेशालिटीज होत्या. आता या स्पेशालिटीजमध्ये खूपच वाढ झाली आहे. त्यातून अचूक निदान व उपायांची शक्यताही वाढली आहे.

वाढलेल्या स्पेशालिटीजमुळे वैद्यकीय क्षेत्रात स्पर्धाही निर्माण झाली. सुपरस्पेशालिटीज हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल वाढू लागला. या बदललेल्या मानसिकतेकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया तसेच संसद सदस्यांना कानाडोळा करता येणार नाही. अॅलोपॅथी डॉक्टरांनी स्वत:ची जाहिरात केली तर तिचा खर्च ते रुग्णांच्या फीमधून वसूल करतील अशीही भीती व्यक्त होते. पण या जाहिरातींमुळे रुग्णांना डॉक्टरांचे कौशल्य समजण्यास जी मदत होते तीही नजरेआड करून चालणार नाही. त्यामुळे अॅलोपॅथी डॉक्टरांना स्वत:ची जाहिरात सर्वकाळ करू देण्याची परवानगी आता संबंधितांनी दिली पाहिजे.

समीर परांजपे
(लेखक उपवृत्तसंपादक आहेत)
paranjapesamir@gmail.com
बातम्या आणखी आहेत...