आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanatan Organization Dangerous For The RSS, Say Shyam Manav

‘सनातन’ रा. स्व. संघाला घातक ठरेल; श्याम मानव यांचे परखड मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य मराठी एक्स्क्लुझिव्ह- अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नेते व संमोहनतज्ज्ञ श्याम मानव यांचे परखड मत.
- सनातन साधकांच्या कारवाया संमोहनाच्या प्रभावाखाली.
- आर.आर. पाटलांकडून निराशा, तर फडणवीसांकडून पुढाकार
मुंबई- सनातन संस्थेचे संस्थापक जयंत बाळ आठवले स्वत:ला ईश्वरी अवतार जाहीर करून राज्यातला मोठा बुवा झाले आहेत. संमोहनविद्येच्या गैरवापरातून अनेक कृत्ये पचवता येऊ लागल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, रा.स्व. संघासाठीही भविष्यात ते घातक ठरू शकतात,’ असे परखड मत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संस्थापक, प्रख्यात संमोहनतज्ज्ञ श्याम मानव यांनी मांडले. संघ व सनातनचा संबंध जोडणे चूक असल्याचे ते म्हणाले.

भविष्यात प्रभाव वाढत जाईल तसतसा सनातनचा कडवा विरोधही वाढत जाईल. त्यामुळेच ‘सिमी’सारख्या संघटनांवर जशी कठोर कारवाई झाली तशीच सनातनबाबत करणे आवश्यक आहे, असे श्याम मानव म्हणाले.
पुरावे देऊनही आबांकडून ‘सनातन’वर कारवाई नाही
‘सनातन संघटनेच्या कारवाया आज उघडकीस येत असल्यामुळे सर्वच राजकीय विशेषत: विरोधक या संघटनेवर बंदीची मागणी करत आहेत. मात्र मागील सरकारच्या काळातही या संघटनेवर काहीच कारवाई झाली नाही,’ अशी खंत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संस्थापक व प्रख्यात संमोहन तज्ज्ञ श्याम मानव यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. ‘सनातनकडून माझ्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले करण्यात आले. त्यावेळी आर. आर. पाटील गृहमंत्री होते. त्यांच्याकडे या हल्ल्यांचे फुटेज देऊन मी कारवाईची मागणी केली. मात्र, तेव्हा सनातनवर साधे गुन्हेही नोंदवले नाहीत. आर. आर. हे संघावर टीका करायचे, मात्र सनातनवर कारवाई करू शकले नाहीत. असे त्यांचे दुटप्पी वर्तन होते’, अशी टीकाही मानव यांनी केली.
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात अटक केलेला सनातन संघटनेचा साधक समीर गायकवाड याला वाचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसस प्रयत्न करत असल्याचा आरोप काही राजकीय पक्ष वा सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. याकडे लक्ष वेधले असता, मानव यांनी त्याचे खंडन केले. ते म्हणाले, ‘हे आरोप पूर्णत: चुकीचे आहेत.

उलट समीर गायकवाडने दूरध्वनीवर आपल्या मैत्रिणसोबत बोलताना पानसरे यांच्या खुनाची कबूली दिल्याची माहिती मिळताच फडणविस यांनी तत्काळ गायकवाडला अटक करण्याचे आदेश दिले, अशी माहिती आपल्याला पोलिस दलातील वरिष्ठ अिधकाऱ्यांनीच दिली आहे. श्याम मानव हे सध्या अंधश्रध्दा व अघोरी प्रथा कायद्यांतर्गत राज्य सरकारने दक्षता अधिकारी म्हणून नेमलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना प्रक्षिशण देत आहेत. पोलिस दलात अनेक उच्चपदस्थांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. पानसरेंच्या हत्येनंतर दोन महिन्यातच गायकवाडविरूद्ध पुरावे मिळाले होते, हा दाव्यात तथ्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
‘फडणवीस यांचे वडिल गंगाधरराव हे आपले जवळचे मित्र असल्याने आपण त्यांची बाजू घेत आहात का?’ असा प्रश्न विचारला असता मानव यांनी त्याचेही खंडन केले. ‘देवेंद्र यांना मी बालपणापासून ओळखतो. ते धार्मिक व्यक्ती असले तरी अंधश्रद्धा वा कट्टरता याच्या विरोधात आहेत, हे मी अनेकदा अनुभवले आहे,’ अशी पुष्टीही त्यानीं जोडली.
संशयित सापडला तरी पुरावे मिळणे कठीण
पानसरे हत्येत समीरला अटक झाली. तरीही कटाची माहिती मिळत नाही. कारण त्याच्या मनात ‘अॅम्नेशिया क्रिएट’ केलेला आहे. संगणकातून मेमरी काढल्याप्रमाणेच हा प्रकार असतो. त्यामुळे कृत्याचा विसर आरोपीला पडतो. साहजिकच कटाची माहिती मिळू शकत नाही. पुरावे जमवण्यात अपयश येते, याकडेही मानव यांनी लक्ष वेधले.
संमाेहित नसलेल्यांकडून मिळतील कटाचे धागे
सनातन आपल्या साधकांना संमोहित करून त्यांच्याकडून काही ‘कामे’ करून घेते. मात्र, जे साधक संमोहनाच्या प्रभावाखाली आलेले नाहीत, त्यांच्याकडून या संघटनेच्या काही कटाचे धागे मिळू शकतात. यासाठी या संघटनेच्या आश्रमावर छापे घालावेत, अशी मागणीही मानव यांनी केली.
अंनिसच्या कार्याला संघाची मदतच
‘संघाचे मुखपत्र असलेल्या नागपूर तरुण भारतमध्ये मी अनेक वर्षे पत्रकार होतो. तेव्हाच मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची स्थापना केली. माझ्या कामाला तेव्हाही व आजवर संघाने कधी विरोध केला नाही, की मला धमक्याही आल्या नाहीत. कामात त्यांच्याकडून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदतच मिळाली. याउलट सनातनचे लोक कडवे आहेत. त्यांनी अनेकदा मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. संघ ही सनातनच्या तुलनेत उदार, मवाळ व विचारांवर आधारित संघटना आहे. तर्कदृष्ट्या विचार करून ते अनेकदा आपली चूक वा धर्मात चुकीच्या प्रथा असल्याचे मान्य करतात. सनातनवाल्यांची तर्कदृष्ट्या विचार करण्याची क्षमता संमोहन विद्येने संपवून टाकली जाते. त्यामुळे हे कार्यकर्ते काहीही करू शकतात. सनातनच्या हिंदुराष्ट्र निर्मितीत मोठा अडथळा मवाळ संघाचा आहे. त्यामुळे भविष्यात सनातन संघाला घातक ठरू शकते,’ अशी भीतीही मानव यांनी वर्तवली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, सनातनी संमोहन प्रक्रियेचा गौप्यस्फोट आणि या मुलाखतीवर सनातन संस्थेचे स्पष्टीकरण...