आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहेरची चप्पल घरातील संस्कार मोडू पहातेय (दिव्य मराठी ब्लॉग)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परवा एकदा नातेवाईकांकडे गेले होते. गप्पा मारत बसलो होतो. एवढ्यात त्यांच्याकडे बाहेरुन एक नवविवाहित जोडपे भेटायला आले. आले ते चप्पल –बूट घालून तडक आतपर्यंत. मला काही कळायचेच बंद झाले. मी बाजूला भेटल्यावर तिला हळूच म्हटले, अगं ! चप्पल बाहेर काढून नाही आलीस. तर ती म्हणाली, अहो काकू! इथे चप्पल घालूनच वावरायचे असते. आपल्याकडे जसे घरातील चप्पल वेगळी असते, बाहेरची वेगळी. पण इथे तसे नाही. बाहेरची चप्पल घालूनच इथे वावरले तर चालते. मलाही सुरुवातीला हे खटकले होते. पण ह्यानेच (म्हणजे नवर-याने) सांगितले बाहेर, की इथे या घरात चप्पल-बूट काढले तर हसतात. अर्थोडाक्स म्हणून हसतात. मग माझ्या लक्षात आले कि फक्त माझ्याच पायात काही नव्हते. म्हणजे मी अर्थोडाक्स यांच्या दृष्टीने. काय एकेक नविनच.
आज प्रत्येक सिरीयलमध्ये हा concept येऊ घातला आहे. कितीही छान गालिचा असू दे, किती ही चकाचक फरशी असू दे, देवघर असू दे. बिनधास्त बाहेरुन चप्पल, बूट घालून सर्व पात्रे प्रवेश करतात-डायरेक्ट हॉलमध्ये, किचनमध्ये. एकदा आमच्याकडेही एका नातेवाईकांचा जवळचा मित्र काही कामानिमित्ताने आमच्याकडे आले होते. अर्थात जेवायलाच या म्हणाले मी. तर हे महाशय बूट काढायचे नावच घेईनात. शेवटी आम्हाला सांगायला लागले.
आजकाल पूर्ण मराठीत बोलले, की अर्थोड्क्स म्हणुन पाहिले जाते. पार्टीत पेग घेतला नाही-अर्थोड्क्स. चालत एखाद्या ठिकाणी गेलात, तर अय्या! म्ह्णुन पाहिले जाते-अर्थोड्क्स. पूर्ण कपडे घातलेल्या मुली तर पुण्यात –मुंबईत अर्थोड्क्सच असतात. आजच्या नविन नव-यांना आपल्या बायकोने जीन्स-स्लिवलेसवर असावे असे वाटते, नाही तर ती अर्थोड्क्स. लांब केस बांधले कि आर्थोड्क्स. बांगड्या घातल्या कि ती अर्थोड्क्स. आठवड्यातून १/२ सिनेमा इंग्रजीतूनच बघावे म्हणे, नाहीतर—
काय कुठे चालली आहे ही आमची संस्कृती? लहानपणी इंग्रजी शाळेचा हव्यास धरणारी नविन पिढी आपल्या मुलांना संस्कृतचे धडे देणार की नाही? त्यांना रामरक्षा, मनाचे श्लोक, संतांची शिकवण समजावून देणार आहे की नाही? आज आजी –आजोबा प्रत्येक घरात आहेत की नाही, हा ही संशोधनाचाच विषय आहे. आणि असतील तर त्यांचे मुले ऐकतात का?
आज घरोघरी इडियट बॉक्स आहेच. दिवसातील जास्तीत जास्त तास महिला वर्ग त्याच्यासमोर असतो. संध्याकाळनंतर पुरुष वर्ग. म्हणजे आपल्या घरात सतत इतरच आवाज जास्त असतात. आपल्या मुला–बाळांचे, आपापसातले संवाद आता घराघरातून कमी होत आहेत. मालिकांचे साम्राज्य आपल्यावर कुरघोडी करु लागले आहे. प्रत्येक सिरियल ही नायिका प्रधान, आणि व्हिलन ही स्त्रीच. तिचे वर्चस्व , तिचे अत्याचार आपण बिन बोभाट पहात स्विकारत असतो. त्याचाच परिणाम आता स्त्रियांच्या वेषभूशेत दिसू लागला आहे. कपडे किती कमी घालावेत याची जणू रियालिटी शोमध्ये चढाओढच लागली आहे. आणि त्याचेच आदर्श ही नविन पिढी स्विकारत चालली आहे. आईचे , आजीचे संस्कार बाजूला पडत, दृक माध्यमाचे संस्कार आमची पिढी स्विकारते आहे. म्हणुनच आज घरी येणा-या पाहुण्याला स्वागताला सरबतऐवजी सॉफ्ट ड्रींक्स ठेवले जाते. मोबाइलचे आक्रमण प्रत्येकाच्या घरी झाले आहे. समोर कुणीही व्यक्ती बोलत असू दे, किती ही महत्त्वाची चर्चा, मिटींग चालू असू दे – पण मोबाइल वाजला की प्रथम तो एस्क्युज मी, म्हणुन त्यास प्रथम पसंदी दिली जाते. मग समोरच्या बोलणा-याचा अपमान का होईना ! हे बाहेरचे नविन होऊ घातलेले पाहुणे, संस्कार चपली प्रमाणेच आहेत.
शेवटी किती ही प्रगती केली तरी पायची वहाण पायीच बरी, तिची जागा योग्य ठिकाणीच असलेली बरी. आमची आई म्हणायची, दारात प्रवेश करतेवेळी चपलांच्या निटनेटक्या ठेवणीवरुनच त्या घरचे संस्कार कळतात. आज बाहेरची चप्पलच घरचे साम्राज्य, संस्कार मोडू पहात आहे. आपण वेळीच सावध व्हायला हवे. आपणास ही हे पटते ना!