आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर गहाण ठेवले, उधारी करून मंजुनाथवर चित्रपट बनवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊमध्ये पदवी आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) मध्ये सेल्स ऑफिसर असलेल्या मंजुनाथ षण्मुगम यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढताना प्राणांची बाजी लावली. नोव्हेंबर 2005 मध्ये उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरी येथे 27 वर्षांच्या मंजुनाथ यांचे बंदुकीच्या गोळ्यांनी चाळणी केलेले प्रेत मिळाले. आपल्या परिसरातील भेसळयुक्त पेट्रोल-डिझेल विकणार्‍या पेट्रोल पंपांविरोधात आवाज उठवला, हाच त्यांचा गुन्हा होता. मंजुनाथ यांच्या लहानशा, मात्र धाडसी आयुष्यावरून प्रेरणा घेऊन आयकोमो अ‍ॅडव्हर्टायझिंगचे एमडी संदीप वर्मा यांनी त्यांच्यावर एक चित्रपट बनवला. संदीप म्हणतात, ‘मंजुनाथ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयआयएम, आयआयटी आणि इतर शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी ट्रस्ट स्थापन केली आहे. या ट्रस्टतर्फे दरवर्षी मंजुनाथ षण्मुगम इंटेग्रिटी अवॉर्ड दिला जातो.

या कार्यक्रमाच्या प्रमोशनल मटेरियल्ससाठी ट्रस्टने माझ्याशी 2008 मध्ये संपर्क साधला होता. ट्रस्टसाठी मंजुनाथ यांच्यावरील पोस्टर्स, लिफलेट्स आणि ऑडिओ व्हिज्युअल बनवताना त्यांच्या आयुष्याच्या अगदी जवळ पोहोचलो. ते रिअल लाइफ हीरो होते. मात्र, त्यांचे आयुष्य पडद्यावर चित्रित करण्यासाठी माझ्याकडे काहीच निधी नव्हता. निर्माते आणि गुंतवणूकदारांशी संपर्क साधला, पण कुणीही पुढे आले नाही. कुठेच मार्ग निघाला नाही, त्यामुळे स्वत:च पैसे लावायचे ठरवले. घर गहाण ठेवले. पर्सनल लोन घेतले. मित्र आणि कुटुंबातील लोकांकडून मदत मागितली. मी एवढी जोखीम का पत्करत आहे, हे कुटुंबाला कळत नव्हते. चित्रपट बनवण्यासाठी मंजुनाथ यांच्या आयुष्यावर संशोधन करणे आवश्यक होते. आयआयएम आणि या प्रकरणाशी निगडित इतर लोकांना भेटलो. मंजुनाथ यांच्या आई- वडिलांसोबत खूप वेळ बोललो. 2010 मध्ये संशोधन पूर्ण झाले. 2011 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले.’

संदीप सांगतात, ‘चित्रपट तयार होण्याच्या काळात तीन वर्षे साडेतीन तासांहून अधिक वेळ झोपू शकलो नाही.’ संदीप यांनी दिग्दर्शनासह पटकथाही लिहिली. सनी देओलच्या ‘अर्जुन पंडित’ या चित्रपटाचे ते सहलेखक आहेत. शेखर कपूर यांचा ‘पानी’ या चित्रपटाची कथा लिहिण्यासही त्यांनी मदत केली होती. संदीप यांनी अनेक लघुपट बनवले आहेत. त्यातील ‘वॉटर कंझर्व्हेशन’ आणि ‘स्ट्रीट चिल्ड्रन’ या दोन पटांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (2003) आणि फिलाडेल्फिया शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल (2003) मध्ये पुरस्कार मिळाला आहे.

शिक्षण : बीट्स पिलानीतून बीई, एफएमएस दिल्लीहून एमबीए
कुटुंब : पत्नी आणि एक मुलगी

चर्चेचे कारण : भ्रष्टाचाराविरोधात लढताना प्राण गमावणारे मंजुनाथ षण्मुगम यांच्यावर चित्रपट बनवला. 25 एप्रिल रोजी तो प्रदर्शित होईल.