आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तमुळे कैद्यांमध्ये जागरूकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरुंगात साडेतीन वर्षांची शिक्षा भाेगताना अभिनेता संजय दत्त तब्बल १६४ दिवस पॅराेल व फर्लाे रजेवर तुरुंगाबाहेर राहिला. या मुद्द्यावर सरकारवर बरीच टीकाही झाली. मात्र, संजयला मिळत गेलेल्या या रजांमुळे कारागृहात शिक्षा भाेगत असलेल्या कैद्यांना आपल्याला असलेल्या रजेच्या हक्काची जाणीव झाली अन‌् गेल्या काही महिन्यांपासून पॅराेल व फर्लाेच्या अपिलात वाढ झाली आहे. कारागृह प्रशासनातील सूत्रांनी ही माहिती दिली, पण त्याबाबतचा आकडा जाहीर करण्यास नकार दिला.कारागृहाच्या नियमांची माहिती करून घेऊन, त्या नियमांच्या अधीन राहून संजय दत्तने वेळाेवेळी कारागृह प्रशासन आणि विभागीय आयुक्तांकडे रजेसाठी अर्ज केले. त्यापैकी अनेकदा त्याच्या रजा मंजूरही झाल्या. त्यावरून बरीच टीका झाली तरी हे सर्व नियमानुसारच झाल्याचे सरकारने जाहीरपणे, अगदी न्यायालयातही सांगितले. त्यामुळे आपल्यालाही अशी पॅराेल, फर्लाे रजा मिळू शकते अशी जाणीव इतर कैद्यांना झाली.

प्रत्येक कैद्यास अधिकार : प्रत्येक कैद्यास संचित (पॅराेल) व अभिवचन (फर्लाे) रजा मिळवण्याचा अधिकार आहे. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यानंतर त्याची वर्तणूक व स्थानिक पाेलिसांचा अहवाल मागून त्याला कारागृह प्रशासन १४ दिवसांची संचित रजा देऊ शकते. यामध्ये पुन्हा १४ दिवसांची वाढ करता येते. कारागृहाच्या नवीन नियमावलीनुसार आता थेट २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली जाते. कैद्याच्या कुटुंबीयातील काेणी सदस्य अजारी असेल अथवा त्याच्या घरी एखादी महत्त्वपूर्ण घटना असेल तर त्यास विभागीय आयुक्त ३० दिवसांची पॅराेल रजा मंजूर करू शकतात. यामध्येही एकदा वाढ करता येऊ शकते.

चांगल्या वर्तणुकीमुळे कैद्याला महिन्याला तीन दिवसांची तर प्रशासनाने िदलेले काम व्यवस्थितरीत्या पार पाडल्यास चार िदवसांची अशी एकूण सात दिवसांची रजा माफ केली जाते. यानुसार प्रत्येक कैद्यास वर्षभरात ८४ दिवसांची शिक्षा कमी हाेऊ शकते. कैद्याच्या चांगली वागणुकीमुळे कारागृह अधीक्षक एखाद्या कैद्याची ३० िदवस, उपमहानिरीक्षक ६० दिवस तर अप्पर पाेलिस महासंचालक हे ९० दिवस शिक्षा माफ करू शकतात.

३५९० कैदी रजेवर
महाराष्ट्र कारागृह विभागाच्या सांख्यिकी अहवालानुसार सन २०१४- १५ दरम्यान अपील व जामिनावर १८३९ कैदी जेलमधून बाहेर पडले आहेत. अभिवचन रजेवर वर्षभरात एकूण १३४६ कैदी साेडण्यात आलेले असून येरवडा कारागृहातील १५५ कैद्यांचा समावेश आहे. संचित रजेवर राज्यातील २२४४ कैदी साेडण्यात आलेले असून त्यापैकी ३४७ कैदी येरवडा जेलमधून साेडण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात अभिवचन व संचित रजा मिळून राज्यातील एकूण ३५९० कैद्यांनी रजेचा हक्क उपभाेगला आहे.