आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Pakhode Artical On Republican Politics In Maharashtra

रिपब्लिकन पक्षातील फूट भाजप-सेनेच्या पथ्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉँग्रेसमध्ये मनमोहनसिंग यांच्यानंतर दबक्या आवाजात राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि भाजपने तातडीने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. देशाच्या राजकारणात झपाट्याने होणारे बदल तुम्ही आम्ही अनुभवतोय. कधी नरेंद्र मोदी तर कधी राहुल गांधी. या दोघांची जादू संपली तर आम आदमी पार्टी. एवढी एकमेव चर्चा सध्या गल्लीबोळाच्या राजकारणात रंगतेय. महाराष्ट्राच्या राजकारणावरही निश्चितच या तीन नावांचा होणारा असर हळूहळू नजरेस पडायला सुरुवात झाली. पण दिल्लीच्या राजकारणाच्या चर्चा आणि त्या राजकारणाचा महाराष्ट्रावर होणारा दुरगामी परिणाम यावर मंथन करताना सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. राष्ट्रीय राजकारणाचा परिणाम महाराष्ट्रावर व्हायचा तो होणारच आहे. पण महाराष्ट्रामध्ये असलेल्या एका मोठ्या शक्तीचा या राजकीय पक्षांना विसर पडला आहे. राजकीय पक्ष तर ही मोठी शक्ती विसरलेच मात्र, ज्या पक्षांचा परिणाम म्हणून ही राजकीय शक्ती उदयास आली ते राजकीय पक्षही स्वत:ची ताकद हरवून बसले, असे म्हणायला आता मुळीच हरकत नाही. कधी काळी या ताकदीने एकत्र येण्याचा प्रयोग राज्यभर केला होता. आणि यात ही ताकद यशस्वी झाली होती. हाच प्रयोग पुन्हा या महाराष्ट्रात झाला तर, महाराष्ट्रात मोदी इफेक्ट दिसणारच नाही. अशी ही शक्ती आहे. ही ताकद आता ख-या अर्थाने एकवटायला पाहिजे. होय, अगदी बरोबर. ही ताकद म्हणजे रिपब्लिकन चळवळ.
महाराष्ट्रात आजच्या घडीला खरी गरज आहे ती एकिकृत रिपब्लिकन पक्षाची. रा.सू.गवई, प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले. राज्याच्या राजकारणात आमूलाग्र परिवर्तन करणारे हे चार दिग्गज पुढारी आहे. हे चारही नेते एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाचा चेहरामोहरा पालटू शकेल एवढी अफाट शक्ती या चार नेत्यांमध्ये आहे. मात्र आज काय परिस्थिती आहे. हे चारही नेते वेगवेगळे लढतायेत. रामदास आठवले तर, महायुतीमध्ये सामील झाले. प्रकाश आंबेडकरांनी अठरा पक्ष एकत्र करून प्रस्थापित राजकारण्यांना शह देण्यासाठी ताकद एकवटली. माजी राज्यपाल रा.सू.गवई हे राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई यांनी महाराष्ट्रभर रिपब्लिकन पक्षाची ताकद उभी केली आहे. तर प्रा.जोगेंद्र कवाडे यांचा पिरिपा या पक्षाने नागपूर, चिमूर, चंद्रपूर या भागासह राज्याच्या अनेक भागात ब-यापैकी अस्तित्व टिकविले आहे. मात्र रिपब्लिकन चळवळीतले हे चारही प्रमुख नेते वेगवेगळ्या पातळ्यांवर लढतायेत. हे चौघेही एकत्र आले तर चमत्कार करण्याची ताकद या चौघांमध्ये आहे. तुम्हाला 1998 ची निवडणूक आठवत असेल तर बघा. हे चारही नेते एकत्र आले आणि यांनी कॉँग्रेसच्या पांिठंब्याने लोकसभेच्या निवडणुका लढविल्या. हे चारही नेते तर, खासदार झालेच शिवाय राज्यात कॉँग्रेसच्या जागाही वाढल्या होत्या. विदर्भात त्या वेळी लोकसभेचे अकरा मतदारसंघ होते. या मतदारसंघात 1996 मध्ये कॉंग्रेसच्या दोन जागा निवडून आल्या होत्या तर भाजप शिवसेनेच्या 9 जागा निवडून आल्या होत्या. 1996 च्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि रिपाइं वेगवेगळे लढले होते. मात्र 1998 मध्ये रिपब्लिकन चळवळीतल्या या चारही नेत्यांनी स्वत:ची ताकद एकत्र केली आणि कॉंग्रेससोबत निवडणुक लढविली. त्यावेळी याच विदर्भात चित्र पालटले. आणि एकूण 11 जागांपैकी 11 जागांवर कॉँग्रेस-रिपाइंचे उमेदवार विजयी झाले. आणि भाजप सेनेचा अक्षरश: धुव्वा उडाला होता. एकाही जागेवर युतीला विजय मिळविता आलेला नव्हता. एकिकृत रिपब्लिकन चळवळीची ही ताकद तेव्हा दिसून आली होती. म्हणजे 1996 आणि 1998 च्या या दोन निवडणुकीची तुलना केली तर असे लक्षात येते की रिपब्लीकन चळवळीतील ताकदीने विदर्भाचे राजकारण बदलून टाकले होते. रा.सू.गवई (अमरावती), प्रकाश आंबेडकर (अकोला) आणि प्रा. जोगेन्द्र कवाडे (चिमूर) हे एकाच वेळी झालेले विदर्भातील तीन खासदार होते. तर याच निवडणुकीत मुकुल वासनिक(बुलडाणा), सुधाकरराव नाईक(वाशीम), राणी चित्रलेखा टी भोसले(रामटेक), विलास मुत्तेमवार(नागपूर), प्रफुल्ल पटेल (भंडारा), नरेश पुगलिया(चंद्रपूर), दत्ता मेघे(वर्धा), उत्तमराव पाटील(यवतमाळ) कॉँग्रेसच्या तिकिटावर आणि रिपब्लिकन मतांच्या आधारावर खासदार झाले. याचवेळी रामदास आठवलेसुद्धा खासदार म्हणून निवडून आले होते. तात्पर्य एवढेच की आज हे सर्व रिपब्लिकन पक्ष वेगवेगळे लढतायेत.हे चारही रिपब्लिकन पक्ष एकत्र आले तर विदर्भ सोडा, अख्ख्या महाराष्ट्रात मोदी इफेक्ट आम आदमी पक्षासह नाहिसा होईल.