आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Parab Article About Shivsena, Divya Marathi

आत्ममग्न मातोश्री आणि अस्वस्थ सेना खासदार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याणचे खासदार आनंद परांजपेपाठोपाठ शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने राजकीय वर्तुळात सेनेच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर सेनेच्या फुटलेल्या खासदारांची संख्या फक्त दोनवरच राहणार नसून आणखी तीन खासदार फुटणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. यात मराठवाड्यातील दोन, तर विदर्भातील एका खासदाराचा समावेश असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे या सर्वांनी राष्ट्रवादी काँगे्रसऐवजी काँगे्रसला पसंती दिल्याची चर्चा आहे. एवढे होऊनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर आत्ममग्न होऊन शांतचित्त बसणार असतील तर ती मोठी चूक होईल. याचा फटका सेनेला फक्त लोकसभेतच नव्हे तर विधानसभेतही बसू शकतो. मुख्य म्हणजे कधी नव्हे एवढे देशात आणि राज्यात सत्ताधारी काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात जनमत असताना त्याचा फायदा शिवसेनेला घेता येणार नसेल तर त्यांच्याइतका दुर्दैवी पक्ष दुसरा कोणी नसेल!

शिवसेनेला पडत चाललेल्या या खिंडाराला सेनेची सध्याची कार्यपद्धती सर्वस्वी जबाबदार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 40 वर्षांत शहरांपासून खेड्यांपर्यंत शिवसेना वाढवताना कार्यकर्त्यांचे जाळे तर उभारले, पण अचूक माहिती मिळवण्याचे स्वत:चे असे एक नेटवर्कही तयार केले होते. विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, विश्वासू कार्यकर्ते यांच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपर्‍यातील घडामोडींची बित्तमबातमी त्यांच्याकडे असायची. मुख्य म्हणजे ते फक्त मातोश्री किंवा सेनाभवनमधील अष्टप्रधान मंडळींवर विसंबून राहिले नाहीत. आपल्या ज्येष्ठ सहकार्‍यांचा त्यांनी सल्ला घेतला, पण शेवटचा फटकारा बाळासाहेबांनीच मारला!

बाळासाहेबांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते माणसांना भेटण्यात, त्यांच्याशी गप्पा मारण्यात, त्यांच्या सुख-दु:खात ते खुल्या मनाने सामील होत. ते समोरच्या माणसाला, मग ती व्यक्ती मोठी असो वा छोटी आपलेसे करून घेत. यामुळे मातोश्रीवरून बाहेर पडलेला माणूस त्यांना कायम आपल्या काळजात स्थान देई. बाळासाहेब त्यांच्यासाठी सर्वस्व होऊन जात...या भेटीत ती आलेली व्यक्ती कायमस्वरूपी सेनेशी जोडली तर जाईच, पण त्या माणसाच्या माध्यमातून असंख्य लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शिवसेना आपली वाटे... आपल्या कठीण प्रसंगी हाक मारावा, असा हक्काचा माणूस मातोश्रीवर आहे, असे सेनेशी जोडल्या गेलेल्या या माणसांना वाटत राहत असे आणि हेच शिवसेनेचे बलस्थान होते... पण बाळासाहेबांना प्रकृती साथ देईनाशी झाल्यावर आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सूत्रे गेल्यानंतर हे चित्र बरोबर उलटे झाले आणि सेनेचा वेगाने सुरू असलेला प्रचार प्रसार थांबला!

उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर अती विसंबून राहण्याने खूप मोठा फटका सेनेला बसला आहे. याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत, सचिव व आमदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार सुभाष देसाई अशा मोजक्या नेत्यांबरोबर चर्चा विनिमय करून चांद्यापासून बांद्यापर्यंतचे निर्णय घ्यायचे हे पक्षासाठी फायद्याचे ठरलेले नाही. खरेतर छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे आणि राज ठाकरे अशी आक्रमक नेत्यांची फौज सेनेतून आधीच बाहेर पडल्यानंतर तसे उद्धव ठाकरे यांना पक्षातच आव्हान देणारे नेतृत्व शिल्लक राहिले नव्हते. याचा फायदा घेऊन त्यांनी निवडून येण्याची क्षमता नसलेल्या नेत्यांच्या सल्ल्यावर विसंबून न राहता शहर तसेच ग्रामीण भागांतून नव्या नेतृत्वाची दमदार फळी तयार करायला हवी होती, पण तसे झाले नाही आणि सध्या शहरी तोंडवळा असलेला पक्ष अशी सेनेची ताकद मर्यादित राहिली आहे आणि हे अतिशय विदारक चित्र आहे. विधिमंडळातील सेनेच्या कामगिरीवर नजर टाकली तर ही गोष्ट सहज लक्षात येते. शिवसेना विधिमंडळ नेते सुभाष देसाई यांचा आक्रमक नेता म्हणून आवाका मर्यादित असतानाही त्यांच्याशिवाय कोणी बोलणारा नेताच तयार केला गेला नाही.

विजय शिवतारे, आशिष जयस्वाल, शरद पाटील, विवेक पंडित अशा अभ्यासू नेत्यांना संधीच दिली नाही तर नवे नेतृत्व तयार होणारच कसे? मुंबईतील नेत्यांवर अती अवलंबून राहून ग्रामीण भागातील खासदारांना मातोश्रीवर किंमतच दिली जात नाही, अशी प्रमुख तक्रार आहे. खरे तर पक्षबांधणीसाठी खासदारांचा खूप उपयोग करून घेतला जाऊ शकतो, पण त्यांना भेटीसाठी वेळ तर द्यायचा नाही, पण संघटनात्मक पातळीवर शह-काटशहाचे राजकारण करून त्यांना वेशीबाहेरच ठेवायचे, हा अपमान कोणीही सहन करू शकणार नाही. आनंद परांजपेंनी आपल्या भावाच्या लग्नाची पत्रिका राज ठाकरेंना दिली म्हणून त्यांना काळ्या यादीत टाकणे, हे कधीही योग्य नव्हते. शेवटी शेवटी तर आनंद परांजपे यांची पक्षात नगरसेवकाइतकीही किंमत राहिली नव्हती. मुंबईबाहेरील खासदारांच्या मोठ्या कार्यक्रमांकडेही उद्धव ठाकरे पाठ फिरवणार असतील तर त्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचे.

मुंबईतील छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी त्यांच्याकडे वेळ आहे, पण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या खासदारांच्या पाठीवर शाबासकी मारण्यासाठी पक्षप्रमुखांकडे वेळ नसेल तर परिस्थिती गंभीर आहे. खरेतर अजूनही वेळ गेलेला नाही. आजही गावाकुसात कुठल्याही पदाची, पैशांची आस नसलेला शिवसैनिक शिल्लक आहे. तो मोठ्या अपेक्षेने मातोश्रीकडे बघत आहे. मात्र त्यांच्या पक्षप्रमुखाने त्यांच्या हाकेला ओ द्यावी, अशी साधी अपेक्षा तो करतोय... जे शिवसैनिकांचे तेच मुंबईबाहेरील आमदार, खासदारांचे. या सर्वांना तुम्ही विश्वासात घेत नाही, तोपर्यंत संशयाचे वातावरण कायम राहणार आणि या वातावरणाचा फायदा घेत शिवसेना फोडायला काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रस कधीची टपून बसली आहे.