आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Parad Article About Ncp congress, Divya Marathi

काँग्रेस-राष्ट्रवादीतील भांडणे आघाडीच्या मुळावर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा मतदारसंघांसाठी राज्यातील निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला आहे. मात्र अजूनही सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकमेकांविरोधातील किंवा आपसातील भांडणे थांबायचे नाव घेताना दिसत नाहीत. यामुळे दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते हैराण झाले आहेत. देशात आधीच काँग्रेसविरोधात लाट असाताना सोनिया व राहुल गांधी यांना महाराष्ट्राकडून मोठ्याआहेत. 2009 मध्ये दोन्ही काँग्रेसला 17, तर राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्या वाढणार नसतील, तर किमान कमी तरी होता कामा नये, अशी अपेक्षा आहे. मात्र एकूणच चित्र पाहता दोन्ही काँग्रेसला मिळून वीसच्या आपसास जागा मिळाल्या तरी खूप झाले, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मुंबईपासून सुरुवात करायची झाल्यास उत्तर मुंबईत प्रिया दत्तविरोधात काँग्रेसचे मंत्री नसीम खान, कृपाशंकर सिंह हे नाराज असून त्यांनी सुरुवातीपासून मनापासून कामच केलेले नाही. शेवटी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मध्यस्ती करावी लागली. सोनिया यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची असल्याने मुख्यमंत्र्यांनी नसीम व कृपाशंकर यांचे कान टोचल्यानंतर दोघांनीही प्रिया दत्त यांची भेट घेऊन मनोमिलन झाल्याचा देखावा केला. मात्र त्यांनी मनापासून काम केले आहे की नाही, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. ठाण्यात संजीव नाईक यांच्या प्रचारात उतरण्यास काँग्रेसचे आमदार मुजफ्फर हुसेन अद्यापही प्रचारात सहभागी झालेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनीही समजावूनही ते प्रचारात उतरलेले नाहीत, हे विशेष. ठाण्याच्या राष्ट्रवादीतच तीन गट आहेत. गणेश नाईक, वसंत डावखरे व जितेंद्र आव्हाड यांच्यातून विस्तव जात नाही. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते डावखरे यांची शिवसेनेशी असलेली छुपी मैत्री राष्ट्रवादीला जड जाईल, असे चित्र आहे. शिवसेनेचे ठाण्यातील उमेदवार राजन विचारे तसेच कल्याणमधील उमदेवार डॉ.श्रीकांत शिंदे या दोघांनाही ताकद देण्याचे काम डावखरे करतील, असे दिसते.

गणेश नाईक यांच्या घराणेशाहीविरोधात ठाण्यातील काँग्रेस तसेच राष्ट्रवादीतही प्रचंड नाराजी आहे. गणेश नाईक मंत्री, मोठा मुलगा संजीव नाईक खासदार व धाकटा मुलगा संदीप नाईक आमदार, पुतण्या सागर नाईक महापौर असे सर्वत्र फक्त नाईक आणि नाईक, बाकीच्यांनी फक्त त्यांचे फलक लावून प्रचार करायचा का, असा सवाल केला जात आहे. नवी मुंबईतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते नामदेव भगत, ज्येष्ठ नगरसेवक रमाकांत म्हात्रे, संतोष शेट्टी यांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. हे सर्व पाहता संजीव नाईक यांना आपली जागा राखणे कठीण जाणार आहे.

शिवसेनेमधून आयात केलेल्या राहुल नार्वेकर यांना पक्षात आल्या आल्या लोकसभेची उमदेवारी दिल्याने मागच्या वेळी निवडणुकीस उभे राहिलेले आझमभाई पानसरे नाराज झाले आहेत. मुळातच नार्वेकर यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचा विरोध होता. निष्ठावंताना डावलून बाहेरून आलेल्या उमदेवाराचा प्रचार करण्याच्या मूडमध्ये हे पदाधिकारी व त्यांचे कार्यकर्ते दिसत नाहीत. रायगडमध्येही राष्ट्रवादीचे मंत्री सुनील तटकरे यांना माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी सुरूवातीला जोरदार विरोध केला. कानामागून आला आणि तिखट झाला, असे अंतुले तटकरेंचे वर्णन करतात. मुख्यमंत्र्यांनी महतप्रयासाने अंतुलेंच्या नाकदुर्‍या काढल्या असल्या तरी ते सर्व ताकदीनिशी काम करतील, असे या घडीला दिसत नाही.

माढ्यात विजयसिंह मोहिते पाटील यांना काँग्रेस समर्थक अपक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी सुरूवातीला जोरदार विरोध केला होता. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून गोरे आता शांतपणे राष्ट्रवादीचे काम करत आहेत, असे सांगण्यात येत असले तरी त्यात तथ्य नाही, असे गोरेंचे कार्यकर्ते खाजगीत सांगतात. नगरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच भाचे राजीव राजळे आपले नशीब अजमावत आहेत. मात्र त्यांच्या नशिबात शनीची बाधा कशी येईल, यासाठी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गेले काही काम करत होते. नगरमधील विखे वि.थोरात घराण्यांमधील पारंपरिक वादाची त्याला पार्श्वभूमी आहे. मात्र नगरमध्ये विरोध केला तर शिर्डीतील काँग्रेसचे विखे समर्थक उमदेवार भाऊसाहेब वाकचौरेंना फटका बसेल, हे लक्षात आल्यानंतर आणि मुख्य म्हणजे शिर्डीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाकचौरेंचा मनापासून प्रचार करत आहेत, हे लक्षात आल्यानंतर नगरमध्ये विखे आता कुठे राजळेंच्या प्रचाराला लागले आहेत. पण शेवटी ते काय करतील, हे सांगता येत नाही.

राणेंना हरवण्याचा राष्ट्रवादीचा विडा!
रत्नागिरी-सिंधुदुर्गात उद्योगमंत्री नारायण राणे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील धुमशान शरद पवार व अजित पवार यांच्या मध्यस्तीनंतरही थांबायचे नाव घेताना दिसत नाहीत. सिंधुदुर्गमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका व जिल्हा परिषदमधून राष्ट्रवादी काँग्रेस संपून टाकण्याच्याी गर्जना करणार्‍या आणि त्याप्रमाणे वागणार्‍या नारायण राणेंच्या मुलाचा आम्ही प्रचार करणार नाही म्हणजे नाही, असा निर्धार राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी केला असून तब्बल 400 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, मंत्री उदय सामंतांनीही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या धुसफुशीला खतपाणी घातले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची पक्षाने हकालपट्टी केली असून आमदार केसरकर यांनीही राजीनामा दिला आहे.

परभणीत भांबळेंना पाडण्याचा बोर्डीकरांचा पण!
परभणीत राष्ट्रवादीचे विजय भांबळेंना पाडण्याचा पण काँग्रेसचे आमदार रामप्रकाश बोर्डीकर यांनी केला आहे. ते उघडपणे शिवसेनेचे उमदेवार विजयी होण्यासाठी प्रचार करताना दिसत आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेत बोर्डीकरांना नोटीस दिली असली तरी त्यांच्यावर काहीएक परिणाम झालेला नाही.