आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Unhale Article About Assembly Speaker Haribhau Bagde

कसरत तारेवरची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पवारांचा सत्ता सावलीचा कावा अन् शिवसेनेचा सत्तेसाठी मोठा दावा यातूनच मध्यममार्ग म्हणून सभागृहात आवाजी मतदानाचा देखावा राष्ट्रवादीपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी होता.
सोशल मीडियापासूनसर्व माध्यमांवर वर्चस्व निर्माण करीत असलेल्या नव्या कार्पोरेट संस्कृतीतील भारतीय जनता पक्षाने मराठवाड्यातील धोतर, गांधी टोपी पेहराव असणाऱ्या हरिभाऊ बागडे उपाख्य नाना यांना विधानसभेचे अध्यक्ष करून जुन्या जमान्यातील जनसंघाच्या कार्यवृत्तीचा गौरव केला. खरं तर मुंबई, दिल्ली या दोन्हीही ठिकाणी मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये हरिभाऊंचे नाव होते. पण हा एकमेव असा नि:स्पृह निष्कलंक नेता आहे की, पक्षादेश शिरसावंद्य मानणार हे माहीत असल्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी हरिभाऊंना विधानसभेच्या अध्यक्ष पदाविषयी सांगण्यात आले अन् १९७८ नंतर म्हणजेच शिवराज पाटील चाकूरकर यांचेनंतर दुसऱ्यांदा मराठवाड्याला विधानसभेचे अध्यक्षपद मिळाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने बहुमत आवाजी मतदानाने मिळवले, असा निर्वाळा हरिभाऊ बागडेंनी अध्यक्षपदी आरूढ झाल्यानंतर काही तासातच दिला आणि आता राजकीय अविश्वासाच्या वादामध्ये अध्यक्ष म्हणून तेच केंद्रस्थानी आहेत. तसा वादात अडकण्याचा हरिभाऊंचा मूळ स्वभाव नाही. ते एक वादातीत व्यक्तिमत्त्व. पण भाजप सरकारची धर्मसंकटातून मुक्तता करण्यासाठी अध्यक्ष म्हणून त्यांनी एेतिहासिक जबाबदारी पेलली; एका बाजूला विश्वासमत दर्शक ठरावाच्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेशी तडजोड झाली नाही. पंचवीस वर्षांपासूनचे शिवसेना-भाजपचे हिंदुत्वाचे बंध तुटले होते. राष्ट्रवादीचा अप्रत्यक्ष पाठिंबा तर हवा होता, पण त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध जोडणे म्हणजे असंगाशी संग घडणार होता, असा हा बाका प्रसंग होता.

राष्ट्रवादीपासून सुरक्षित अंतर ठेवणेही अनिवार्य होते. पण खेड्याच्या भाषेत चकवा म्हणतात त्याप्रमाणे सारे घडले. विरोधी पक्षनेतेपदाच्या वादात सेनानेते आतबाहेर करीत असतानाच म्हणे अचानक ठराव आला, फडणवींसाच्या बाजूने होएएए आवाज जोरात आला अन् अध्यक्षांनी विश्वासदर्शक ठराव संमत झाल्याचे घोषित केले. मतविभागणीची शिवसेना, काँग्रेसची मागणी म्हणजे पश्चात बुद्धी की सहेतूक कानाडोळा यावर राजकीय चर्वितचर्वण सुरू राहील. पण अध्यक्षांनी अंतिम निर्णय जाहीर केल्याने भाजपच्या सत्ता स्थिरत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आगामी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन या पारश्वभूमीवर थंडीतही नक्कीच वादळी ठरणार. शिवसेना आता केवळ रस्त्यावरच नाहीतर विधानसभेतही आपली आक्रमकता दाखवणार आहे. एकेकाळचे दोन्ही हिंदुत्ववादी मित्र-पक्ष एकमेकांच्याविरुद्ध उभे ठाकणार आहेत - एक सत्ताधारी तर दुसरा विरोधी पक्ष म्हणून. मुख्य म्हणजे काँग्रेस पक्ष विकलांग झाला आहे. राज्यात अस्थिरता येते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीमध्ये बागडे यांचा पोक्त सल्ला निश्चित कामी येऊ शकतो. वसंतराव भागवत, प्रल्हादजी अभ्यंकरांपासून ते शरदभाऊ कुलकर्णी अशा अनेक संघ नेत्यांशी अतिशय जवळचे जिव्हाळ्याचे संबंध, महाजन-मुंडे या जोडगोळीच्या उदय अस्ताचे साक्षीदार, तळागाळापासून कार्यकर्त्याची क्षमताबांधणी संस्थात्मक उभारणीचा व्यापक अनुभव आणि राजकीय विजनवासातील स्थितप्रज्ञता ह्या हरिभाऊंच्या नेतृत्वाच्या जमेच्या बाबी आहेत. पंचवीस वर्षांपासूनच्या दोन मित्रांची दोस्ती कट्टर दुश्मनीमध्ये बदलण्याआधीच परिपक्व शिष्टाईची गरज आहे. अन्यथा एसआर बोम्मई निकालाचा आधार घेऊन आवाजी मतदानावर आधारित मंजूर झालेल्या विश्वास ठरावाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले जाऊ शकते. या निकालामध्ये असे स्पष्टपणे नमूद केले आहे की, राज्यपालांना जरी विश्वास ठरावाच्या बाजूने बहुमत आहे असे वाटत असले तरी मतदानाच्या आधाराने ते विधानसभेत सिद्ध करावे लागेल. जरी विधानसभा अध्यक्षांना बहुमत जाणवत असेल तरीही पूर्ण निकषांच्या आधाराने सिद्ध करण्यासाठी सभागृहात मतविभागणीने होणे गरजेचे आहे. 1981 पासून महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले गेले असले तरी तो एक पायंडा आहे. पण सर्वोच्च न्यायालयात त्यास आव्हान दिले जाऊ शकते. बोम्मई निवड्याच्या आधाराने काही मार्गदर्शक सूचना त्यातील प्रमाण याबद्दल घटनेच्या कलम 356 मध्येही शासन बरखास्तीबद्दल स्पष्टता आलेली आहे.
वस्तुत: भाजपकडे पुरेसे बहुमत होते आणि आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्यक्ष मतदानाने किंवा गैरहजर राहून पाठिंबा मागण्याआधीच मिळाला आहे. भाजपची राजकीय कोंडी वेगळीच आहे. सत्तासंग करण्यासाठी असंगाशी संग करावा की, जुन्या राकट मित्राला सत्तेचा वाटा द्यावा ? लोकप्रतिमा जपावी की आकड्याचा खेळ जिंकावा? राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर सुखनैव सत्ता येईल, पण तडजोडी कराव्या लागतील. विश्वास ठरावानंतरची राष्ट्रवादी नेत्यांची देहबोली मंत्रालयातील वावर याच्यांतील ‘वर्तनबदल’ लक्षात घेण्याजोगा आहे. भाजपचा अनुनय करण्यासाठी अख्ख्या पवार कुटुंबाने झाडू हाती घेतला आणि पवारांचा स्वच्छता सहभाग परदेशस्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भावला. पण जनमानसातील राष्ट्रवादीची मलिन प्रतिमा त्यामुळे पुसली जाणार नाही . कुठे फडणवीसांची सत्ताशालीनता अन् कुठे राष्ट्रवादीची मलिनता यांच्यातील आमजनतेची अागतिकता सोशल मीडियातून आठवडाभर तिखटपणे व्यक्त झाली आहे.
निवडणूक प्रचारात भाजपने ज्या राष्ट्रवादीवर सातत्याने टीका केली त्याच राष्ट्रवादीला आज भाजप आडोशात घेऊ पाहत आहे. शिवसेनेने शेवटपर्यंत संयम ठेवला अशी लोकभावना आहे. सेनेच्या आंदोलनात्मक पवित्र्याची त्याच्याविरुद्ध प्रतिक्रिया येईल ही भाजपची भावना असली तरी प्रादेशिक पक्ष संपविण्याची इतकी घाई कां, असाही सवाल आहे.
जर तरच्या या अदमासात जाण्यापेक्षा भाजपला निर्वेधपणे कार्यतत्पर होणे आवश्यक आहे. मराठवाड्याच्या एका भूमिपुत्राला विधानसभा अध्यक्षपदाची संधी मिळाली. अविश्वासाचा चेंडूही त्यांनी चांगलाच टोलवला आहे, हरिभाऊ मुत्सद्दी धोरणी आहेत. साधी राहणी, अस्सल ग्रामीण अनुभव विकासप्रश्नी बांधिलकी ठेवणारे हरिभाऊ विधिमंडळाच्या प्रथापरंपरा निष्ठापूर्वक पाळून कायदे नियमाच्या आधारे सभागृह चालवण्याची तारेवरची कसरत कौशल्याने करतील यात मात्र शंका नाही.