आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Kale, Mumbai Article About World's Women Day

SUCCESS STORY: ‘लॅँडस्केपिंग’ सारख्या पुरुषप्रधान व्यवसायातही यशस्वितेचे शिखर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला म्हटलं की त्यांनी ठराविक चाकोरीबद्ध जीवनच जगले पाहिजे, ही मानसिकता आता गळून पडली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत विविध क्षेत्रांत महिला पुढे गेल्या आहेत. पण आजही पुरुषी वर्चस्वाचा प्रभाव कुठे ना कुठे तरी दिसतोच. पण अशा परिस्थितीतही खंबीर राहून या वर्चस्वाचा सामना केला, तर ‘लॅँडस्केपिंग’ सारख्या पुरुषप्रधान व्यवसायातही यशस्वितेचे शिखर गाठता येते, हे मुलुंडमधील उद्योजिका अस्मिता गोखले यांनी दाखवून दिले आहे. इतकेच नाही तर परिस्थितीची तमा न बाळगता झोकून देण्याच्या वृत्तीमुळे उलाढालीचा मार्ग कोटीच्या घराकडेही वाटचाल करू शकतो, हे त्यांच्या मेहनतीवरून दिसते.

कंपन्यांचे आवार, फार्म हाऊसमधील बगिचा तयार करणे असो की डोंगर-उतार, सपाट जमिनीवरील वन्य झाडांची लागवड असो की अगदी बावीस बावीस फूट उंचीच्या नारळ तत्सम झाडांची पुनर्लागवड असो. हिरवाईमध्ये आणखी सुंदरता आणणे ही गोखले यांची खासियत. या सगळ्या गोष्टी त्या अगदी सहजपणे करत असल्या तरी सुरुवात मात्र तितकी सोपी नक्कीच नव्हती.

वेगळ्या वाटचालीचा मार्ग
बारावी पास झाल्यानंतर ‘टिपिकल’ पदवीधर होण्यापेक्षा दापोली विद्यापीठात कृषी हा विषय निवडला. बीएसस्सी अ‍ॅग्री पदवी संपादन केल्यानंतर मुंबईत 1993 मध्ये अ‍ॅपलॅब कंपनीत रुजू झाल्या. पण अल्पावधीतच नोकरी गमवावी लागली. कारण विद्यापीठात दुर्दैवाने त्या वेळी बागेत प्रत्यक्ष काम करण्याचे शिक्षण न मिळता केवळ पुस्तकी ज्ञान देण्याचा हा परिणाम होता.

दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर बहुतांशजण खत कंपन्यांमध्ये नोकरी करण्यास जाणारे असल्यामुळे त्या वेळी तो विचार झाला नव्हता. त्यातूनही लॅँडस्केपिंग किंवा गार्डन डेव्हलपरसारख्या क्षेत्रात महिलांनी येण्याचे प्रमाणही जेमतेम फार फार तर एक ते दोन टक्के होते. त्यामुळे अस्मिता गोखलेंनी तब्बल दोन वर्षे कॉनवूड कंपनीत प्रत्यक्ष शिक्षण घेतले. 1994 मध्ये त्यांनी स्वत:ची कन्सल्टन्सी सुरू केली. छोट्याशा तळ्यातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव एवढीच पुंजी. भक्कम आर्थिक पाठबळ, कामगार व्यवस्थापन, आपल्या क्षेत्राबद्दलचे चौफेर ज्ञान यापैकी काहीही पदरी नसल्याने मोठी उडी त्या घेऊ शकत नव्हत्या. त्यातून लॅँडस्केप गार्डनिंग हे पुरुषांचे क्षेत्र असल्याने व्यवसायापेक्षा सरकारी नोकरी वा बॅँकेत नोकरी कर असा सल्लाही त्या वेळी मिळत होता. परंतु अस्मिताला त्यांच्या पतीकडून या नव्या वाटचालीला पूर्ण साथ मिळाली. मग परिचयातील व्यक्तीच्या घरातील बाल्कनी, लहान बगिचे तयार करणे अशी सुरुवातीला पंधराएक कामे त्यांनी केली.

एमएसईबीचे वर्षभराचे मिळालेले काम हे पहिले मोठे कंत्राट
एमएसईबीचे महिन्याला 15 हजार याप्रमाणे वर्षभराचे मिळालेले कंत्राट हे पहिले मोठे काम. पण काही कारणांमुळे त्यांना कंपनीकडून ठरलेली रक्कम मिळत नव्हती. पण सरकारी कंत्राटात वाईट शेरा आला तर भविष्यात अडचणी येऊ शकतात हे त्यांच्या पतीने ओळखले व आर्थिक मदतीसाठी खंबीरपणे मागे उभे राहिले. वर्षभरातंनर सर्व पैसे मिळाले. तरीही उन्हातान्हात उभे राहून गार्डनिंगची कामे करणे महिलांना जमणार नाही, अशा नकारघंटाही त्यांना सहन कराव्या लागल्या. पण अचानक अगोदर ज्या बिल्डरचे काम केले होते त्यांच्याकडून बगिच्या देखभालीचे काम मिळाले आणि हळूहळू जवळपास पाच सहा ठिकाणची कामे आल्यामुळे 40-50 हजारांपर्यंत उत्पन्नाची मजल गेली. कंपन्यांचे कामे वाढून उलाढाल 15,20 लाखांपर्यंत गेली. पण बाळंतपणानंतर दोन वर्षे व्यवसाय थंडावला. या छोट्या ब्रेकमुळे जवळपास दहा वर्षे मागे गेल्यासारखे झाले. पण मुलाला पाळणाघरात ठेवून अस्मिताने पुन्हा स्वत:ला नव्याने व्यवसायात झोकून दिले. पण अगोदरच्या कामाच्या प्रतिष्ठेमुळे ब्रीचकॅँडी चिल्ड्रन पार्क, आर्य भास्कर गोरेगाव ,येथील लॅँडस्केपिंगची लाखो रुपयांची कामे त्यांनी उत्तमरीत्या केली. घराच्या बाल्कनीतून सुरू झालेला प्रवास अ‍ॅम्बे व्हॅली, मॅरियट हॉटेल (पुणे) पासून ते एक ते तीन एकरांच्या लॅँडस्केपिंगपर्यंत विस्तारत गेला. या वर्षी त्यांची उलाढाल एक कोटी रुपयांच्या आसपास असून 31 मार्च 2015 पर्यंत ही उलाढाल दोन कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे.

20- 25 वर्षांपूर्वीच्या जुन्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यातही नैपुण्य
लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांच्या देखरेखीखाली होते. ग्राहकाच्या गरजेनुसार त्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्याचे तंत्रज्ञान गोखले यांना चांगले अवगत आहे. अगदी 20- 25 वर्षांपूर्वीच्या जुन्या वृक्षांचे पुनर्रोपण करणे ही त्यांची आणखी जमेची बाजू आहे. कामाच्या स्वरूपानुसार संपूर्ण वेळ त्याला देणे आणि नेटाने उभे राहून ते करून घेणे यामुळेच उत्तम इकेबाना शिक्षक, लॅँडस्केप डिझायनर, गार्डन डेव्हलपर, नव्या लॅँडस्केप डिझायनर्ससाठी मार्गदर्शक अशा विविध पातळीवर त्यांना आपल्या करिअरचे सुंदर लॅँडस्केपिंग करता येऊ शकले आहे.
(kalesantosh70@gmail.com)