आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 जानेवारी 1950...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाला. त्या ऐतिहासिक दिवसाची ही उजळणी.
तंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी साजरा झाला. त्या दिवशी गुरुवार होता. सकाळी ठीक 10 वाजून 18 मिनिटांनी गव्हर्नमेंट हाऊसच्या (आताचे राष्‍ट्रपती भवन) दरबार हॉलमध्ये भारत हे स्वतंत्र लोकतांत्रिक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले गेले तसेच पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधीही पार पडला. या दोन खास घटनांनिमित्त या वेळी 31 तोफांची सलामी दिली गेली. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी याप्रसंगी जाहीर केले की, ‘भारतात आजवर जे राज्यपाल अनुशासित प्रांत, भारतीय आणि मुख्य आयुक्त यांचे प्रांत होते ते आता एकसंघ झाले असून राज्यघटनेने दिलेल्या मान्यतेनुसार भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.’
प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्‍ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी आपल्या पहिल्यावहिल्या संदेशात म्हटले होते, ‘आमच्या या प्रजासत्ताकातील नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता हे हक्क प्रदान करणे आणि या विशाल देशात लोकांमध्ये जे भिन्न धर्मांना मानतात, अनेक भाषा बोलतात आणि आपल्या विभिन्न रीतिरिवाजांचे पालन करतात त्यांच्यात भ्रातृभाव वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही सर्व देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवू इच्छितो. रोगराई, गरिबी आणि अज्ञान यांचे समूळ उच्चाटन करणे हा आमच्यापुढील महत्त्वाचा कार्यक्रम असेल. ज्यांनी आजपर्यंत खूप कष्ट सहन केले आहेत आणि ज्यांचे आजपर्यंत खूप नुकसान झाले आहे अशा सर्व विस्थापित लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जे लोक कोणत्याही प्रकारच्या अधिकारापासून वंचित आहेत त्यांना खास मदत मिळाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.’
या संदेशवाचनानंतर सहा ऑस्ट्रेलियन जातीच्या दमदार घोडे जोडलेल्या बग्गीत बसून स्वत:च्या अंगरक्षकांसमवेत राष्‍ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद इरविन अ‍ॅम्पी थिएटरकडे रवाना झाले. भावनगरच्या राजाने हे अ‍ॅम्पी थिएटर दिल्लीकरांसाठी खास बांधून घेतले होते. भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांचे नाव या थिएटरला देण्यात आले होते. (1951 च्या सुमारास या अ‍ॅम्पी थिएटरला ‘नॅशनल स्टेडियम’ असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर 2002 मध्ये पुन्हा एकदा या वास्तूचे नामकरण ‘मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम’ असे केले गेले). या अ‍ॅम्पी थिएटरमध्ये येण्याच्या मार्गावर राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या स्वागतासाठी असंख्य माणसे उभी होती. ही जनता राष्ट्रपतींचा जयजयकार करत होती. डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी मोठ्या आत्मीयतेने जनतेच्या अभिवादनाचा स्वीकार केला. समाजातल्या सर्वच स्तरातील तेथे उपस्थित असलेले लोक या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेत होते. भारतीय इतिहासातील प्रख्यात अशोक स्तंभाच्या चिन्हाची मुद्रा राष्ट्रपतींच्या बग्गीवर झळकत होती. अशोक स्तंभ चिन्हाचा सार्वजनिक स्वरूपात अशा रीतीने प्रथमच राजनैतिक कारणांसाठी बग्गीवर उपयोग करण्यात आला होता. पाच मैलांचा हा रस्ता पार करायला राष्‍ट्रपतींच्या लवाजम्याला एक तासापेक्षा अधिक वेळ लागला आणि कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कवच या लवाजम्याभोवती नव्हते. जनतेने आपल्या राष्‍ट्रपतींना अतिशय जवळून पाहिले आणि अभिवादन केले होते. आयर्विन अ‍ॅम्पी थिएटरमध्ये भारतीय लष्कराचे 3000 अधिकारी आणि जवान संचलन समारंभ सुरू करण्यासाठी राष्ट्रपतींच्या प्रतीक्षेत होते. दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी राष्‍ट्रपती अ‍ॅम्पी थिएटरच्या स्टेडियममध्ये पोहोचले. तेथे उपस्थित पंधरा हजार प्रेक्षक आणि विशेष पाहुणे एक रोमांचक आणि भव्य लष्करी परेड पाहण्यासाठी उत्सुक होते. संचलनाच्या मध्यभागी लष्कराचा बँड होता. या वेळी बीबीसी, आकाशवाणीने हा कार्यक्रम प्रसारित केला.
पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे लष्करी परेड चित्रित करण्याकरिता फिल्म्स डिव्हिजनचे कॅमेरे सज्ज होते. राष्‍ट्रीय ध्वज दिमाखात फडकू लागताच वातावरणात राष्‍ट्रगीताचे प्रेरणादायी सूर उमटले. त्यानंतर तोफांनी दिलेल्या सलामीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. इंडोनेशियाचे राष्‍ट्रपती सुकार्नो हे भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे विशेष अतिथी होते. राष्‍ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी जीपमध्ये उभे राहून परेडचे निरीक्षण केले आणि सुरू झाला संचलन करणा-या लष्करी तुकड्यांचा ‘तेज चल’चा हुकूम. उत्साही, शूरवीर भारतीय सैनिकांना परेड करताना प्रेक्षकांनी इतक्या जवळून प्रथमच पाहिले होते. पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील झालेल्या सशस्त्र सेनेच्या तुकड्या, रणगाडे, विविध लष्करी वाहने यांची परेड अ‍ॅम्पी थिएटरच्या स्टेडियममधून बाहेर पडून दिल्लीतील मुख्य रस्त्यांवर आली. भारतीय लष्करी जवानांच्या या संचलनाने सामान्य जनता मंत्रमुग्ध झाली होती. जुन्या दिल्लीतील चांदणी चौक विभागातील घरांच्या खिडक्यांतून नागरिकांनी या परेडमध्ये सहभागी झालेल्या लष्करी जवानांवर पुष्पवृष्टी केली.
26 जानेवारी 1950 रोजी पहिल्या प्रजासत्ताकदिनी देशाची राजधानी दिल्लीच्या व्यतिरिक्त अन्य प्रदेशांतील राजधानींच्या शहरांमध्येही झालेल्या कार्यक्रमांत भारतीय राज्यघटनेतील गणतंत्र आणि संघराज्याविषयीचा भाग वाचून दाखवण्यात आला. त्या दिवशी देशातील सर्व लहान-मोठ्या शहरांमध्ये प्रफुल्लित वातावरण होते. भारत आता नव्या दिशेने निघाला होता. दुस-या दिवशी प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये पहिल्या प्रजासत्ताकदिनाचा समारंभ आणि तिरंगा फडकवणारी लहान-लहान मुले यांची छायाचित्रे प्रामुख्याने झळकली होती. भारत या नव्या प्रजासत्ताक राष्ट्राचे हार्दिक अभिनंदन करणारे संदेश जगभरातील नेत्यांनी पाठवले होते. भारताला भविष्यकाळातील वाटचालीसाठी या नेत्यांनी आपल्या संदेशात शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. असा होता एकुणात भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा माहोल.
(अनुवाद - वंदना कुलकर्णी)