आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण्यांना सक्तीची निवृत्ती हाच एकमेव उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवभारताच्या निर्माणासाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. तरुणांना जास्तीत जास्त संधी देऊन वरिष्ठांनी त्यांच्यासाठी जागा रिक्त केल्या पाहिजेत आणि सल्लागार व मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली पाहिजे. या देशाचे भले यातच आहे. नानाजी देशमुख यांचा आदर्श या बाबतीत प्रत्येकाने आचरणात आणला पाहिजे.

प्रत्येक व्यवसाय आणि नोकरीत निवृत्तीचे वय निश्चित आहे. पण राजकारण हे एकमेव असे क्षेत्र आहे की जिथे निवृत्तीच्या वयाची कोणतीही सीमा नाही. किंबहुना वाढते वय हेच तिथे क्वालिफिकेशन आहे. विशिष्ट वय झाल्यानंतर कार्यक्षमता कमी होते. सातत्याने एकच काम केल्यामुळे मनुष्यही कंटाळलेला असतो. त्यातून त्याला मुक्ती हवी असते. म्हणून साठीच्या जवळ आल्यावर व्यक्ती व्यवसायातून निवृत्ती घेते. त्यानंतर शांत आणि आनंदी जीवन जगण्यासाठी वानप्रस्थाश्रमाकडे मार्गक्रमण करते. त्यामुळे नवीन पिढीला काम करण्याची संधी आणि जागा उपलब्ध होते. याशिवाय निवृत्तीमध्ये एक आनंद आणि कामाचे समाधानही आहे. दोन पिढ्या एकमेकांकडे विचार, वारसा, कल्पना यांचे हस्तांतरण करत असतात हे महत्त्वाचे. पिकले पान गळले की तिथे नवीन पालवी फुटते. निसर्गाचा हाच नियम आहे. पण हा नियम राजकारण्यांना लागू होत नसावा. भारतीय राजकारण पाहता तरी हेच म्हणावेसे वाटते.
मला असं वाटतं की, राजकारणी व्यक्तीला निवृत्तीची वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार जगात भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. सरकारनेसुद्धा धोरणे आखताना युवा भारताला डोळ्यासमोर ठेवूनच प्राधान्यक्रम निश्चित केला पाहिजे. केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्र्यांचे सरासरी वय ५५ पेक्षा कधीच कमी नसते. त्यामुळे मंत्री परिषद हा वृद्धाश्रम असल्याचा आभास होतो. हे चित्र निश्चितच बदलायला हवे. आज तरुण हाच या देशाची शक्ती आहे. त्याला स्वत:लाही समर्थ व्हायचे आहे आणि देशालाही सशक्त बनवायचे आहे. त्यासाठी त्याच्या काही अपेक्षा आहेत. त्याच्या भूमिकेला समजून घेणारे शासक आणि प्रशासक त्याला हवे आहेत.

जगातील प्रगत लोकशाही राष्ट्रांमध्ये अनेक महत्त्वाच्या राजकीय व प्रशासकीय पदांसाठी वयाची अट निश्चित केली आहे. राजकारणी व्यक्तीचे निवृत्तीचे वय ६५ किंवा ७० वर्षे असले पाहिजे. जेणेकरून तरुण राजकारणी त्यांच्या जागा घेऊ शकतील. तरुण राजकारणी म्हणजे २० वर्षांचा तरुण यासाठी योग्य आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जगातील तरुण लोक हे संवाद आणि ग्रहणक्षमतेत सक्षम असतात. तरुण हे नेहमीच कोणत्याही प्रश्नाकडे पाहताना नव्या दृष्टीने विचार करतात. प्रश्न सोडवताना नवनवीन कल्पनांना प्राथमिकता देतात. त्यामुळेच तरुण रक्ताला वाव देण्याचे काम आपण नेहमीच केले पाहिजे; जेणेकरून नवीन संकल्पना, तंत्रज्ञान आणि दृष्टी मिळेल.

मी जेव्हा राजकारण्यांनी निवृत्त झाले पाहिजे, असं म्हणतो. तेव्हा राजकारण्यांना राजकीय वर्तुळाबाहेर ठेवा, असा याचा अर्थ होत नाही. खरे तर राजकारणी माणसांचे अनुभव आणि ज्ञान पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरू शकते. निवृत्त राजकारणी व्यक्तीने भीष्म पितामहाच्या भूमिकेत काम करावे. राजकारणी व्यक्ती जनतेसाठी जे कायदे बनवतात तेच कायदे त्यांनासुद्धा लागू व्हायला हवेत. अन्यथा ते कायद्यापेक्षा मोठे असल्याचा भास होतो. बऱ्याच वेळेस राजकारणी व्यक्तीचे आरोग्य, मानसिक स्थिती, कार्यक्षमता याचा परिणाम कामावर होतो. राजकारण हे जीवनभराचे कार्यक्षेत्र असू शकत नाही. एखादी व्यक्ती सत्तरीपर्यंत पोहोचते तेव्हा सर्वसाधारणपणे कोणत्याही नवीन कल्पना स्वीकारण्यास तयार नसते. आपलीच मते योग्य असल्याचा तोच अट्टहास असतो. अर्थात याला अपवाद असले तरी अपवादाने नियम अधिकच सिद्ध होतात हे लक्षात घेतले पाहिजे.

भारत हा जगातील तरुण देश म्हणून ओळखला जातो. तरीही जुन्या राजकारण्यांचा प्रभाव सर्व क्षेत्रांवर आहे. देशातील महत्त्वांच्या पदांवर मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध राजकारणी ठाण मांडून बसले आहेत. राजकारणात वयोवृद्धांची पिढी कार्यरत आहे, अशी भावना भारतीय तरुणांमध्ये आहे. याचबरोबर वाढती बेरोजगारी आणि अपुऱ्या संधींमुळे तरुणांचा भ्रमनिरास झालेला आहे. भारताच्या प्रगतीच्या मार्गातील वास्तवाशी दोन हात न करणारे वृद्ध नेतेच खरा अडसर आहे, असा गैरसमज तरुण मंंडळींचा होत आहे, ही चिंतेची बाब आहे. मला हे मान्य आहे की राजकारणात अनुभव महत्त्वाचा आहे. राजकीय सत्ता अनुभव नसलेल्यांच्या हाती गेल्यावर होणारा गोंधळ आपण अनुभवतो आहोत. मात्र हे का होते? कारण तरुण पिढी आणि ज्येष्ठांमध्ये समन्वयाचा अभाव दिसतो. या दोन पिढ्या जोपर्यंत हातात हात घालून काम करीत नाहीत, तरुण जोपर्यंत ज्येष्ठांचा आदर, सन्मान करत नाहीत तोपर्यंत राजकारण सशक्त होणार नाही, हेदेखील वास्तव आहे. मात्र या अनुभवाच्या आधारावर सत्तेचा मोह सुटत नसेल तर तेही चिंताजनक आहे.

अमेरिकेत कोणालाही फक्त दोन वेळाच राष्ट्राध्यक्ष होता येते. आपल्या इथे मात्र कुठल्याही पदावर कितीही काळ ठाण मांडता येते. उद्योग क्षेत्रातील सर्वात मोठे नाव म्हणजे रतन टाटा. त्यांनी वयाची सत्तरी पार केल्यावर टाटा समूहाची सूत्रे तरुण तुर्क सायरस मिस्त्रींच्या हातात दिली. दीडशे वर्षांच्या टाटा समूहाचा चेहरा अगदी युवा झाला. हा रतन टाटांचा आदर्श आपले राजकारणी घेतील का?
(प्रदेश उपाध्यक्ष, युवक काँग्रेस)