आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वबळाच्या दबावतंत्राचे अस्त्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्यानंतर आघाडीतील सत्ताधारी कॉँग्रेस आणि राष्‍ट्रवादीने पुन्हा जनतेची दिशाभूल करण्यास सुरुवात केली असून एकमेकांवर दबावतंत्राचे अस्त्र फेकण्यास प्रारंभ केला आहे. ‘आपण दोघे भाऊ आणि दोन्ही मिळून खाऊ’ हे ब्रीदवाक्य असणा-या आघाडीतील दोन्ही घटक पक्षांनी निवडणुकीतील नाटकी युद्ध बंद करून ‘बोले तैसा चाले’ याची प्रचिती देण्याची गरज आहे. अन्यथा यापुढे राजकारण्यांवरील विश्वास कमी होण्यासच मदत होणार आहे.

2014 मध्ये खरे तर या 2013 च्या अखेरीस लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. कारण 2009 मध्ये मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. आता मात्र त्या 2013 मध्येच होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यात राष्‍ट्रवादीच्या शरद पवारांचाही सहभाग आहे. कॉँग्रेसचे महाराष्‍ट्रातील हीरो पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादीने फेकलेली सर्व अस्त्रे फसलेली स्पष्ट होत आहे. राष्‍ट्रवादीमध्ये अद्याप नैतिकता असल्याचे दाखवण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रयत्नही फसला आहे. त्यांच्या नैतिकतेला छगन भुजबळ, सुनील तटकरे, रमेश देवकर यांनी भयंकर घोटाळ्याच्या आरोपांनंतरही राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर तटस्थ राहून दादांनाही राजीनामा परत घेण्यास भाग पाडले आहे. राजकारणातील भीष्माचार्य शरद पवारही पृथ्वीराज बाबांसमोर निरुत्तर होत असल्याचे चित्र आहे. कारण नुकतेच पवारांना टोला लगावताना बाबा म्हणाले की, विरोधात बसायचे असेल तर खुशाल बसा. यावर पवारांनी बाबांना प्रेमाचा सल्ला देताना फक्त महाराष्‍ट्रापुरतेच लक्ष घाला, असेही सांगितले. निवडणुकीत एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणा-या कॉँग्रेस आणि राष्‍ट्रवादीकडून सत्ता स्थापताना मात्र एकत्र नांदण्याची भूमिका नेहमीच घेतली जाते. स्वाभिमानाच्या मुद्द्यावर राष्‍ट्रवादी पक्षाची स्थापना करणारे पवार मात्र त्यानंतर कॉँग्रेससमोर नेहमीच बॅकफूटवर जाताना दिसून आले आहेत.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वबळाचे अस्त्र फेकण्यास प्रारंभ केलेल्या कॉँग्रेस व राष्‍ट्रवादीने अगोदर गृहपाठ तरी करून बोलले पाहिजे. कारण आघाडी व युतीच्या राजकारणात स्वबळ विसरलेल्या राजकीय पक्षांनी नगरपालिकापासून ते लोकसभेपर्यंत सर्व जागांवर सक्षम उमेदवार तरी पक्षाकडे आहेत का? हे वास्तव एकदा समजून घेतले पाहिजे. दबावतंत्र म्हणून एकमेकांना भीती घालायची आणि निवडणुकीत जागांचे वाटप करायचे. सत्तेसाठी आवश्यक जादुई आकड्यांची जुळवाजुळव झाली की, पुन्हा पाच वर्षे सत्तेतून राजकारण आणि राजकारणातून पैसा उभारताना अंतर्गत वाद जाहीरपणे सुरूच ठेवायचा. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आठवड्याच्या दर बुधवारी होते, पण एक तरी बुधवार असा जातो का की, आघाडीच्या मंत्र्यांमध्ये भांडण झाले नाही? नुकतेच जाहीर झालेल्या उद्योग धोरणावर राष्‍ट्रवादीने कडक टीका केली. हे धोरण बिल्डरांचे असल्याचाही आरोप केला. पण बाबांनी पुन्हा आघाडी सांभाळत नारायण राणेंना पाठिंबा देत राष्‍ट्रवादीवर कुरघोडी केली आणि उद्योग धोरण मंजूर केले. घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या चक्रव्यूहात यंदा मात्र कॉँग्रेस-राष्‍ट्रवादीचा अभिमन्यू बळी जाणार हे निश्चित आहे.

राजकारणातील भीष्माचार्य निरुत्तर
काँग्रेसचे महाराष्‍ट्रातील हीरो पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर राष्‍ट्रवादीने फेकलेली सर्व अस्त्रे फसलेली स्पष्ट होत आहे. राष्‍ट्रवादीमध्ये अद्याप नैतिकता असल्याचे दाखवण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रयत्नही फसला आहे. त्यांच्या नैतिकतेला छगन भुजबळ, सुनील तटकरे, रमेश देवकर यांनी भयंकर घोटाळ्याच्या आरोपांनंतरही राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर तटस्थ राहून दादांनाही राजीनामा परत घेण्यास भाग पाडले आहे. राजकारणातील भीष्माचार्य शरद पवारही पृथ्वीराज बाबांसमोर निरुत्तर होत असल्याचे चित्र आहे.