आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेचात पडलेले सेवा दल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


महाराष्ट्रातला एक काळ निरालस कार्यकर्त्यांचा होता. विचारांशी, नेत्यांशी आयुष्यभर अढळ निष्ठा ठेवणा-या कार्यकर्त्यांच्या पिढ्या महाराष्ट्राने पाहिल्या. स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरच्या काही दशकांमध्ये. ‘भगवा ध्वज हाच गुरू’, ‘अखंड हिंदू राष्ट्र’ अशा विचारांनी भारलेले उजव्या विचारांचे तरुण आपसूक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा हिंदू महासभेकडे खेचले जायचे. ‘जगाला प्रेम अर्पावे’ वगैरे कल्पनांनी ओथंबलेले मवाळ, मध्यममार्गी राष्ट्र सेवा दलाचे पाईक व्हायचे. क्रांतीचे स्वप्न पाहणारे डाव्या चळवळीत पडायचे. आंबेडकरी विचारांनी जागृत झालेली एक कडवी पिढीसुद्धा येथे घडून गेली. एकमेकांशी सख्य न ठेवणा-या या समांतर धारा आपापली ‘स्पेस’ राखून होत्या. संघाचा स्वयंसेवक, सेवा दलाचा सैनिक, कम्युनिस्टांमधला कॉम्रेड किंवा आंबेडकरी कार्यकर्ता यातल्या कोणाच्याच निष्ठा लेच्यापेच्या नसायच्या.

वैयक्तिक लाभ-तोटे खुंटीला टांगून, विचारांशी आजीवन इमान बाळगून राहणारे कार्यकर्ते, हे या चारही प्रवाहांचे वैशिष्ट्य. सत्तेचे राजकारण खेळणा-या राजकीय पक्षांना या विचारधारांची असूयाही वाटायची आणि भीतीही. अर्थात हे दिवस केव्हाच इतिहासजमा झाले. उजवे, डावे, मधले किंवा आंबेडकरी चळवळ, या सगळ्यांचाच ‘केडर बेस’ उखडत चालला आहे. प्रत्येक गोष्ट पैशाशी बांधल्या गेलेल्या आजच्या व्यवस्थेत तरुण कार्यकर्ते मिळवायचे कसे आणि ते टिकवायचे कशाच्या बळावर, हे आव्हान कधी नव्हे इतके अवघड बनले आहे. घोर चिंता आणि चिंतन करण्याचीच पाळी या वैचारिक संघटनांवर आली आहे. हा विचारांचा पराभव, काळाचा महिमा की प्रभावहीन नेत्यांचा दुबळेपणा या कोड्याचे उत्तर शोधावे लागणार आहे.

राष्ट्र सेवा दलाने असा प्रयत्न नुकताच पुण्यात करून पाहिला. सेवा दलाचे पंचाहत्तरवर्षीय अध्यक्ष प्रा. अरविंद कपोले आणि मेधा पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत. ‘सेवा दलापुढची आव्हाने’ हा विषय घेऊनच या मंडळींनी विचारमंथन केले. ‘राष्ट्र सेवा दल म्हणजे बिनभिंतीची शाळा. हे केवळ सांस्कृतिक संघटन नव्हे, तर राजकीय विचार आहे. लोकशाही समाजवाद हा या विचाराचा आधार आहे,’ असे सेवा दलाचे ज्येष्ठ अध्वर्यू एस. एम. जोशी सांगत. आता मात्र या बिनभिंतीच्या शाळेत कोणी यायला तयार नसल्याची खंत सेवा दलाला जाचते आहे. गेल्या वीस वर्षांत एकही पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला नसल्याचे दलाच्या सहमंत्र्यांनीच सांगितले. दिवसेंदिवस सेवा दलाची शक्ती आकुंचन पावते आहे.निवडणुकीचे राजकारण समांतर असले तरी सार्वजनिक जीवनात वावरणा-यांना त्यापासून अलिप्त राहता येत नाही.

सेवा दलाला कोणाच्या बाजूने खेळायचे याचे उत्तर सापडत नाही. हिंदुत्ववादी शक्तींचे प्राबल्य वाढतेय. विकासाचा अजेंडा घेऊन नरेंद्र मोदींसारखा कडवा हिंदुत्ववादी वेगाने दिल्लीच्या दिशेने सरसावत असल्याची भीती त्यांना वाटते. भांडवली अर्थव्यवस्था आणि कॉर्पोरेट जगताच्या तालावर चालणारी काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा त्यांचा अनुभव आहे. तिसरी आघाडी नेमके म्हणावे कोणाला, हे कोणीच सांगू शकत नसल्याने हा प्रश्नच निकाली निघतो. ज्यांच्या नावात ‘समाजवाद’ आहे त्यांनी केलेला अपेक्षाभंग सेवा दलाच्या जिव्हारी लागणारा आहे. माओवाद्यांच्या हिंसक आंदोलनाला सेवा दलाचा पाठिंबा असूच शकत नाही. सेवा दलाने कोणाच्या पाठीशी राहावे, हा प्रश्न विचारमंथनातून सुटू शकला नाही. शेतकरी, असंघटित कामगार, झोपडपट्टीवासीय, विद्यार्थी, महिला या वर्गाला झोंबणा-या शेकडो प्रश्नांना तोंड देण्याची वैचारिक बैठक असूनही निर्णायक काही घडवता येत नसल्याची बोच सेवा दलाच्या धुरीणांना आहे. घटणारी शक्ती पाहता आगामी काळात संघर्षापेक्षाही समाजनिर्मितीच्या कार्यातच राष्ट्र सेवा दलाला अधिक गुंतवून घ्यावे लागेल, अशी चिन्हे आहेत.

‘चळवळीचे अंग’ वाढणार का?
कार्यकर्ते केवळ शिबिरे किंवा बैठकांमधून घडत नाहीत. सक्रिय आंदोलनांची तितकीच आवयकता असते. वेगवेगळ्या प्रश्नांवरचे मोर्चे उभारावे लागतात. प्रा. कपोले यांनी याच अनुषंगाने अपेक्षा व्यक्त केली, ‘सेवा दलाच्या चळवळीचे अंग वाढवण्याची अपेक्षा ‘एसएम’नी’ व्यक्त केली होती. ती गरज आजही कायम आहे. भूतकाळात रमण्यापेक्षा आळस झटकून काम करत राहिले पाहिजे.’