आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांना हवेय पंतप्रधान मोदींचे सर्टिफिकेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या प्रेमळ आमंत्रणाला प्रतिसाद देत पवारांची १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीच प्रेमळ भेट होणार असल्याने राज्यातील जनतेच्या डोळ्यासमोर दोन्ही नेत्यांच्या निवडणुकीच्या भाषणांचा फ्लॅशबॅक तरळत आहे. मोदी सरकारची धोरणे कशी शेतकरीविरोधी आहेत याची खात्री पटवून देताना पवारांनी नरेंद्र मोदींवर केलेले शाब्दिक प्रतिहल्ले अन् प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचारवादी संबोधून गाडीभर पुरावे देऊन सत्ता मिळवल्यानंतर अनेक घोटाळ्यांची चौकशी करणारे आता मात्र शरद पवारांची तोंड भरून स्तुती करतात का याकडे लक्ष आहे.
डॉ. मनमोहनसिंग यांनी प्रत्यक्ष बारामतीत न येता माहितीच्या आधारे प्रशंसा करत बारामती विकासाचा पॅटर्न देशभर राबवायला हवा, असे बारामतीकरांना सर्टिफिकेट दिले. याचा उच्चार राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येक भाषणात केला जात आहे. मात्र मोदी पवारांच्या आमंत्रणानुसार बारामतीच्या विकासाची पाहणी करूनच गुणगौरव करणार आहेत. म्हणून बारामतीत लोकसभा निवडणुकीपूर्वीची प्रलंबित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
काँक्रीट फोडून झाडे लावणे, रस्ते सफाई, सार्वजनिक इमारतीची बाहेरून स्वच्छता, मुख्य रस्त्यापासून फुटलेल्या रस्त्याचे डांबरीकरण, मोदींना दिसावे म्हणून काही अंतर डांबरीकरण इत्यादी कामांवर धाकटे पवार जातीने लक्ष देत आहेत. तरी बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांचा प्रश्न अधांतरीच असून उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनानंतर तेथे पाणी आले नाही. अशा असमतोल विकासाची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार नाहीत.

सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार असल्याने बारामतीत नरेंद्र व देवेंद्रांच्या स्वागतासाठी चांगलीच पळापळ सुरू आहे. कोणतेही सरकार असो, सत्ताधा-यांशी जवळीक साधण्यात पवार पटाईत आहेत. अटलबिहारी वाजपेयींच्या सरकार काळात ते वेगवेगळ्या संसदीय समित्यांवर होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी सर्वच समित्या बरखास्त केल्याने मोदींच्या बारामती भेटीतून एखादी समिती ही पवारांच्या गळाला लागू शकते.